कोहोजगड : विस्तीर्ण पठार लाभलेला पालघरमधला किल्ला

कोहोजगड : विस्तीर्ण पठार लाभलेला पालघरमधला किल्ला

कोहोजगड : विस्तीर्ण पठार लाभलेला पालघरमधला किल्ला

कोहोजगड किल्ला हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिसरात अजुनही लहान मोठे गडकिल्ले आपले अस्तित्व टिकवून उभे आहेत. वाडा पालघर रस्त्यावरील हा एक प्रमुख किल्ला असून वाड्यापासून तो अवघे दहा किलोमीटर बसलेला आहे,

माचीवरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोगता आल्याने आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होते.

मागील रविवारी किल्ले संवर्धनाची पोस्ट बघितली व किल्ला पाहण्याचे निश्चित केले. किल्ल्याच्या पायथ्याशी गुगल मॅपच्या आधारे शेलटे गावाच्या पायथ्याशी पोहोचलो. गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. शेलटे, गोऱ्हे, नाणेगाव ! नाणेगाव मार्ग हा सोपा असल्याचे स्थानिकांकडून कळाले.

शेलटे गावातून किल्ल्यावर जाण्यास सुरुवात केली. जंगलातली वाट असल्यामुळे व दाट धुके असल्यामुळे प्रवास सुखकर झाला. जाताना जंगलातील पक्ष्यांचा आवाज अनुभवता आला. किल्ल्यावर पोचल्यावर प्रथम किल्ल्याचा अंदाज येत नव्हता. मळलेल्या पायवाटेने सुळक्यापाशी जाऊन पोहोचलो. सदर सुळका हा मानवनिर्मित असावा, असे भासत होते.

आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहत कुसुमेश्वर देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. तिथेच बाजूला पाण्याच्या दोन टाकी आहेत व मंदिरासमोरील झाडाच्या पायथ्याशी किल्ल्यावरील ऐतिहासिक अवशेष व वास्तू ठेवण्यात आले आहेत. मंदिरापासून डावीकडे असलेल्या पायवाटेने गेल्यास पाण्याचे सात स्त्रोत उपलब्ध आहेत.

मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असलं तरी पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ जमा झालेला आहे. या टाक्यांच्या संवर्धनाची गरज आहे. या टाक्यांच्या समोर अजून एक दगडामध्ये कोरलेले पाण्याचे टाके आहे. तेथून किल्ल्याचे सुंदर दृश्य पाहण्यास मिळते.

किल्ल्याचा विस्तार खूपच मोठा आहे. स्थानिक नागरिकांकडून तिथे वृक्ष संवर्धनाचे काम सुरू आहे, मंदिराकडून पुढे चालत गेल्यास किल्ल्यावरील प्राचीन अवशेष दिसतात. तिथून पुढे दहा मिनिटांवर पाण्याचे टाके असून तेथे संवर्धन कार्य चालू आहे व त्याला लागून वाड्याचे पडके अवशेष देखील उपलब्ध आहेत. हे अवशेष नेमके कशाचे, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही.

बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पुन्हा मंदिराकडे येऊन उजव्या बाजूने जावे लागते. पंधरा ते वीस मिनिटांमध्ये किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्यावर जाताना वाटेत प्रथम बुरुज लागतो. त्यामध्ये श्री हनुमानाची मूर्ती आहे. पुढे गेल्यावर डोंगरामध्ये कोरलेले तीन पाण्याचे टाके आहेत. सदर पाण्याची टाकी हे मोठी असून त्यामधील एक पाण्याचे टाके हे स्वच्छ आहे, तरीदेखील त्यांचे संवर्धन करून ते जतन करणे गरजेचे आहे.

किल्ल्यावर जाताना दातेगड संवर्धन संस्थेमधील सागर कदम यांची भेट झाली. सागर कदम हे गड संवर्धन कार्यामध्ये सदैव चर्चेत असलेले नाव आहे. त्यांच्या टीम कडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे तटबंदीचे व प्रवेशद्वारात पडलेल्या मोठ्या दगडाला तोडून बाजूला करण्याचे संवर्धन काम मोठ्या प्रमाणात दर रविवारी येथे चालत असते.

प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला बुरुज असून वर गेल्यावर श्री हनुमानाचे मंदिर आहे. येथून वर जाण्यास पायवाट असून किल्ल्याच्या वर गेल्यावर वाडा शहराचे सुंदर दृश्य पाहण्यास मिळते. येथून समोर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी एक गुंफा दिसून येते. या गुहेत आधी येथे ध्यानधारणेसाठी साधू व महाराज येत असत, असे स्थानिकांकडून कळाले.

किल्ल्याच्या वर निसर्गनिर्मित व वार्‍याने तयार झालेले दोन सुळके आहेत, ते आपले लक्ष वेधून घेतात. ही किल्ल्यावरील एक प्रेक्षणीय गोष्ट आहे. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो. त्या ठिकाणी उभे राहून वाऱ्याचा परिपूर्ण आनंद घेता येतो.

त्यातील एक दगड हा मानवाच्या आकाराचा दिसतो. दगड पाहून पुढे गेल्यास श्रीरामाचे मंदिर पाहण्यास मिळते या मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर अजून एक पाण्याचे टाके उपलब्ध आहे. सदर टाक्यात पाणी जरी नसले तरी देखील त्याचे संवर्धन काम चालू आहे. येथून समोर भलामोठा सुळका पाहण्यास मिळतो. असे वाटते की कोणीतरी आपल्या हाताने त्या प्रशस्त शिळा एकमेकांवर ठेवल्या आहेत. किल्ल्यावरती येणाऱ्या काही लोकांनी बहुतेक ठिकाणी आपापली नावे कोरून किल्ल्याच्या सौंदर्याला गालबोट लावल्याचे दिसते,

गड किल्ले हे आपले ऐतिहासिक वारसा आहे ते पाहताना आपल्याकडून काही चुकीची कृती होणार नाही, कचरा होणार नाही याची काळजी प्रत्येक किल्ल्यावर जाताना नागरिकांनी घेतली पाहिजे. किल्ल्यावर संवर्धन कार्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा खूप कमी प्रमाणात दिसला, परंतु हे आपले ऐतिहासिक वारसे टिकवणे व भविष्यातील पिढीसाठी जतन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन स्तरावर देखील प्रयत्न व्हायला हवेत.

 

 

दीपक परब

कोकण संघटक, कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!