लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या वेळेस अजय मिश्राच्या गाड्यांनी ज्यांना जबर ठोकर दिली होती, ते तेजेंद्र सिंग विर्क दोन आठवडे इस्पितळात अत्यवस्थ होते, पण दिलासादायक हे की ते बचावले. २८ नोव्हेंबरच्या मुंबईतील आझाद मैदानावरील विजय व निर्धार किसान महापंचायतसाठी परिषदेला विर्क आवर्जून येणार आहेत.
१९ नोव्हेंबर रोजी भारतातील शेतकरी आंदोलनाने एक ऐतिहासिक विजय मिळवला. एक वर्षाच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या परिणामी तिन्ही काळे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधानांना करावी लागली. यापूर्वी बेकायदेशीर भूसंपादन अध्यादेश मागे घ्यावे लागल्यानंतर आता शेतकरी विरोधी जुलमी कायदेही केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले आहेत.
हा ऐतिहासिक संघर्ष यशस्वी करण्यासाठी दिल्लीच्या आसपासच्या राज्यांनी तर गौरवशाली पुढाकार घेतलाच पण देशभरातही या आंदोलनाचे लोण गेले वर्षभर पसरले. सर्व जातीधर्मांचे लाखो शेतकरी, शेतमजूर, असंघटित व संघटित कामगार, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, महिला, युवा आणि विद्यार्थी या सर्वांचा या विजयात मोलाचा वाटा आहे.

रास्त आधारभावासाठी कायदा करणे, चारही श्रम संहिता व वीज विधेयक रद्द करणे, खासगीकरणाला, महागाईला व बेरोजगारीला आळा घालणे या अन्य ज्वलंत मागण्यांच्या संघर्षाला या शेतकरी आंदोलनाच्या विजयामुळे बळ प्राप्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर २८ नोव्हेंबरला मुंबईत होणारी महाराष्ट्रव्यापी शेतकरी कामगार महापंचायत यशस्वी करण्यासाठी आता शेतकरी संघटनांनी कंबर कसली आहे. केंद्र सरकारशी संबंधित वरील मागण्या परिषदेमध्ये लावून धरल्या जातील, तसेच महाराष्ट्र सरकारने विधानसभेत केंद्राच्या धर्तीवर मांडलेली तीन कृषी विधेयके मागे घेण्याची मागणीही उठवली जाणार आहे.
२८ नोव्हेंबरच्या मुंबईतील महापंचायतीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या राकेश टिकैत, डॉ. दर्शन पाल, युद्धवीर सिंह, हनन मोल्ला, अतुल कुमार अंजान, राजाराम सिंह, योगेंद्र यादव आणि तजिंदर सिंह विर्क येणार आहेत.