मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
बलात्काराच्या घटनेला दोन महिने होत आलेत. घटना उघड होऊन गुन्हा दाखल झाला, त्याला महिना उलटलाय. घटना घडलेल्या परिसरातलं सगळं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. नव्हती ती केवळ तत्परता. आधीच दुर्धर आजार होता, त्यात मुलीवर इतके अत्याचार झाले की तिच्या योनीभागावर गंभीर जखमा झाल्या, तिला बोलताही येत नव्हतं. शरीर पांगळं पडत चाललं होतं. कदाचित ती कोमात गेली असती, पण तत्पूर्वीच तिने देह सोडला. पोलिस अजूनही आरोपींपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखातं असलं तरी एखाद्या युवतीवरच्या सामुहिक बलात्काराचा गुन्हाही प्राधान्याने तत्परतेने संवेदनशीलतेने व गांभीर्याने हाताळण्याचा वचक मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर दिसून आलेला नाही. उलट, सदर प्रकरणात न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांचीच मुस्कटदाबी सरकारने सुरू केलीय. कोणताही बॅनर न घेता, प्रवीण ढोणे, स्वप्नील जवळगेकर, प्रसाद देठे, नितीन पगारे निलेश दुपटे, अतुल खरात इत्यादी युवकांनी आंदोलनात उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतला होता.
मुलगी मुंबईतच भावासोबत राहत होती. आईवडिल जालन्यात राहणारे. मुलीवर बलात्काराची घटना आहे ७ जुलैची. ती वाढदिवसाच्या पार्टीसाठी मित्रांकडे गेलेली होती. घरी परतली तेव्हा तिची स्थिती चांगली नव्हती. शुध्द हरपलेली होती. तिला लगेच एका स्थानिक डाॅक्टरांकडे नेण्यात आलं होतं. तब्येत सुधारत नाहीये हे पाहून वडिलांनी तिला जालन्याला नेलं व एका खाजगी रूग्णालयात दाखल केलं. तिथून दहा दिवसांनी म्हणजे २५ जुलैला तिला औरंगाबादला घाटी सरकारी हाॅस्पिटलात हरवलं. तिथे वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाला असल्याचं डाॅक्टरांचं मत बनलं आणि त्यांनी ते बेगमपुरा पोलिस ठाण्याला कळवलं. त्यावरून २६ जुलैला पोलिसांनी मुलीवर बलात्कार झाला असल्याची वडिलांची रीतसर तक्रार शून्य क्रमांकाने नोंदवून घेतली व पुढील तपासासाठी मुंबईला स्थानांतरित केली.
एका बातमीनुसार, मुलगी चुनाभट्टीतील लाल डोंगर येथे नातेवाईकांकडे आली होती. तिथून ती एका मित्राच्या वाढदिवसाला जाणार होती. पण वाटेत तिच्यासोबत अप्रिय प्रसंग घडला, तर अनेक ठिकाणी आलेल्या वृत्तानुसार, वाढदिवसाच्या ठिकाणीच तिच्यावर बलात्कार झाल्याचं म्हटलं गेलंय.
वास्तविक, या संदर्भातलं वृत्त १ आॅगस्ट रोजी इंडिया टुडेने दिलं होतं. या वृत्तानुसार, घटना घडल्यापासून पीडिता मानसिक धक्क्यात होती. २५ जुलैला वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचं कळून आलं. ३० जुलैला मुलीने स्वत: वडिलांना घडलेली घटना सांगितली, त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
न्यूज१८ नेटवर्कने ३ आॅगस्ट रोजी दिलेल्या बातमीनुसार, लैंगिक अत्याचारामुळे मुलीला अर्धांगवायूचा झटका आलेला होता व ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. कदाचित ती कोमात जाऊ शकते, अशी भीती डाॅक्टरांनी व्यक्त केली होती. या बातमीत वाढदिवसाहून परतताना घटना घडल्याचं म्हटलं आहे.
द हिंदू ने दिलेल्या मुलीने वैद्यकीय तपासणीवेळी डाॅक्टरांना झाला प्रकार सांगितल्याचे म्हटलंय. त्याच दिवशी दिलेल्या वृत्तात, एशियन एज ने मुलीने पोलिस जबाब दिल्याचा दावा केलाय. भावाच्या घरून सकाळी वाढदिवसासाठी निघाले, तेव्हा चार जणांनी बलात्कार केल्याचं मुलीने म्हटल्याचा वृत्तांत उल्लेख आहे.
झोन सहाचे डीसीपी शशी कुमार मीना यांनी एशियन एजला माहिती दिलीय की तपासासाठी चार टीम बनवण्यात आल्या आहेत व सदर भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. अर्थात, या वक्तव्याला महिना होत आला तरी पोलिस आरोपीपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. गेल्या महिनाभरात मुंबईतील चुनाभट्टी पोलिस या प्रकरणाचा छडा लावू शकलेले नाहीत.
सात जुलैला घटना घडली, त्याच्या मागेपुढे एका व्यक्तिचे मुलीला सतत काॅल व मेसेज येत होते, अशी माहिती मुलीच्या भावाने पोलिसांना दिली, पण संबंधित व्यक्तिचे काॅल रेकाॅर्ड तपासले असता, सदर व्यक्तिचा घटना घडली, त्यावेळी परिसरात वावर दिसून येत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिस तपासात टंगळमंगळ करीत असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनीही केलाय. इतके दिवस हे प्रकरण दाबून होते, पण बुधवारी २८ आॅगस्ट रोजी मुलीचा मृत्यू ओढवल्यावर आता घटनेला वाचा फुटली व सामाजिक-राजकीय स्तरावरून पोलिसांवर प्रचंड टीका झाली, त्यानंतर राज्य सरकार जागं झालं.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सदर घटनेचा अहवाल पोलिसांकडून मागवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या असंवेदनशीलता आणि उदासीनतेवर जोरदार टीका केलीय. आम्ही मोर्चा काढेपर्यंत महिला आयोग झोपला होता काय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय.