…आणि ती सोन्याच्या पावलांनी येणारी नसेल तर…?

…आणि ती सोन्याच्या पावलांनी येणारी नसेल तर…?

…आणि ती सोन्याच्या पावलांनी येणारी नसेल तर…?

कोण आली, लक्ष्मी आली, कशी आली, सोन्याच्या पावलांनी आली… असं म्हणत आई महालक्ष्मी बसवायची. तिला सर्व घर, धान्याच्या कोठ्या, कपाटं, स्वयंपाक घर, बाग सगळीकडे फिरवून मग बसवलं जायचं. तोवर कोण आली, लक्ष्मी आली सुरू राहायचं.

ते काहीही असो, एखाद्या स्त्रीच्या आगमनाची इतकी आस आणि ह्या ‘कोण आली’ मधली गेयता मला फार आवडायची.

सख्ख्या दोन बहिणी असतील, तर त्या माहेरी आल्यात पोराबळांसकट…त्यात सोन्याच्या पावलांनी आल्यात… जयजयकार होणारच. जरा वेळाची गंमत म्हणून बघायला छानच असतात असे सोहळे.

प्रश्न हा आहे की सोन्याच्या पावलांनी न येणाऱ्या घरादारच्या मुलींचं असं स्वागत करतो का आपला समाज? की तो तिला दारं बंद करतो?

आई वडिलांच्या संपत्तीतील वाटा जुजबी भाऊबीज देऊन नाकारतो. पुरुषाशी जोडली गेलीये, लग्न बंधनात आहे आणि सोन्याच्या पावलांनी कडेवर पुरुष पिल्लू घेऊन आली म्हणून स्वागत. मातीच्या पावलांनी आली, तथाकथित माती खाऊन लग्न बंधनाबाहेर राहून कडेवर मूल घेऊन आली, मूल न होणारी आली, अविवाहित आली, माहेरच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न करून आली, घटस्फोट झाल्यावर आली, परित्यक्ता, विधवा झाल्यावर आली, तर तिला नको येऊस बाई, असंच सुचवलं जातं. तिचं असं सोन्याच्या पावलांनी अधीर, जंगी स्वागत होत नाही. ती असते नकोशी. जा बाई, जिकडे गेलीस तिकडेच जा, नाहीतर जीव दे, मोकळी हो, हेच तर तिचं प्राक्तन असतं…

कोण गेली, लक्ष्मी गेली, कशी गेली, मातीच्या पावलांनी गेली…. समाजाची रीत भाळावर ठोकून गेली…तिच्या आणि तुमच्याही!

हिला पुजायला “सवाष्ण” “ब्राह्मण” बाई लागत नाही…

ती स्वतःलाच उजवून घेते आयुष्यातून…

हे सगळं समजत असूनही सगळ्या शिकल्या सवरल्या बाया उद्या सुट्ट्या घेऊन घेऊन आउट डेटेड कर्मकांडं करत बसतील, दुसऱ्या कोण्या पुरुषाच्या घराण्याचं… कारण, तिथे त्यांना लक्ष्मी म्हंटलं असतं…जेवायला अशीच स्ववाष्ण बाई बोलवतील परवा. आता आम्हीही मॉडर्न झालो म्हणत मुख्य सवाष्ण झाली की दुसरी एखादी कामवाली मावशी, कोणी नात्यातली अशीच घरी येऊन बसलेली विधवा बसवतील जेवायला. आम्ही आता असं काही पाळत नाही, हे दिमाखात मिरवतील सुद्धा…

लक्ष्मी आलेली कोणाला नको असणार? त्यांना सरस्वती सुद्धा नकोय… लक्ष्मीच हवी…व्यवहारच आहे तो!

कोण आली, बुद्धी आली…कशी आली, विचारांची कास धरून आली…

इथवर ती घराणी कधीही पोहचू शकणार नाहीत…

 

——-प्राची पाठक——-

यांच्या फेसबुक खात्यावरून साभार

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!