मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
सर्वसाधारणपणे प्रवास म्हंटलं, की एका ठिकाणाहून दुस-या ठिकणी जाणं वा भौगोलिक सीमा ओलांडणं असं अभिप्रेत असतं. परंतु प्रा. नीतिन आरेकर यांनी लोकमान्य टिळकांची ३६५ दिवसांतली अंदाजे २०० दिवसांची भ्रमंती सांगताना, लोकमान्यांच्या चौसष्ट वर्षांच्या आयुष्यातला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रवास जीवंत करून सांगितला.
‘लोकमान्य टिळकांचे प्रवास’ या विषयावर प्रा. नीतिन आरेकर यांचे व्याख्यान काल महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांनी आयोजित केले होते.
बाळ गंगाधर टिळक इथपासून बळवंत टिळक व नंतर ‘लोकमान्य’ टिळक हा प्रवास अधोरेखित करताना टिळकांची असामान्य बुध्दी आणि राजकारणातली निर्णयदृष्टी विविध जीवनप्रसंगांच्या आधारे आरेकर यांनी उलगडून दाखवली.
लोकमान्य परंपरावादी असले तरी रूढीप्रिय नव्हते हे परंपरा आणि नवता यांच्या पुरोगामी प्रवासातून त्यांनी विशद केले.
टिळकांची पत्रकारिता ही सर्वसामान्यांची होती. दरवेळी तुरुंगवासात एकवटलेली उर्जा उपयोगात आणून टिळकांनी नवनवीन ग्रंथांची निर्मिती केली. ‘गीतारहस्य’ हे टिळकांच्या साहित्यिक प्रवासातील मानबिंदू म्हणता येईल. भारतीय राजकारणातील सगळी सूत्रे हाती घेणारे, तितक्याच समर्थपणे तिला दिशा देणारे आणि संपूर्ण भारतीय समाजाचा प्रतिनिधी मानले जाणारे टिळक हे पहिले नेता होते यात मुळीच शंका नाही.
टिळकांचा हा राजकीय प्रवास निश्चितच सोपा नाही. लोकमान्य टिळकांचा प्रवास समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत होता. लोकमान्य टिळकांनी सदैव समाजहित लक्षात घेतले. ते कधीच विशिष्ट समाजात बंदिस्त राहिले नाहीत. त्यांचा प्रवास तीनशे साठ डिग्रीच्या परिघातला होता. सूर्याची किरणे जशी एकाचवेळी परिघातून बाहेर येत असतात तसाच लोकमान्यांचा प्रवास तेजस्वी होता. प्रखर होता. लोकमान्य टिळकांनी स्वप्रज्ञेने नवी पायवाट स्वीकारली जिचा पुढे राजमार्ग झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात लोकमान्य टिळकांचा सबंध प्रवास समजून घ्यायचा असेल तर ऐतिहासिक घटनांचा बिटविन दि सीनमधला अवकाश आधी समजून घ्यावा लागेल. प्रवास म्हणजे विकास !! समाजोद्धाराचा !!! अशी प्रा. आरेकर यांची मांडणी होती.
प्रा. नीतिन आरेकर यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत एक महत्त्वाचा विषय उपस्थितांना समजावून सांगितला. विषयाचा सखोल अभ्यास, मुद्देसूद मांडणी, भाषेवरील प्रभुत्व यामुळे उपस्थित सर्वच श्रोते भारावून गेले होते.
– वृषाली विनायक, कवी