घृणास्पद मेन-स्ट्रीम मीडिया आणि लोकमाध्यमांचा पर्याय !

घृणास्पद मेन-स्ट्रीम मीडिया आणि लोकमाध्यमांचा पर्याय !

घृणास्पद मेन-स्ट्रीम मीडिया आणि लोकमाध्यमांचा पर्याय !

आजच्या मेन स्ट्रीम मिडियाकडे पाहून कोणाही सजग आणि समजदार नागरिकाच्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत, माझ्याही मनात निर्माण होत आहेत. आज मेन स्ट्रीम मीडियामध्ये नक्की काय चालले आहे ? तुम्ही तिथे काय काय बघता? खरे तर तुम्हाला तिथे काय काय दाखवले जाते? हे विचारणे योग्य होईल. ते सर्व पाहून तुम्हाला काय वाटते?

आज देशासमोर आर्थिक प्रश्न अक्राळविक्राळ रूप घेऊन उभा आहे. उणे २३.९ पर्यन्त घसरलेला जीडीपी, कोरोनाचे संकट, प्रचंड बेरोजगारी, महागाई, वस्तूंचा तुटवडा, आरोग्य समस्या, सामाजिक दुफळी या भयानक समस्या देशातील प्रत्येक नागरिकाला भेडसावत आहेत ; शिवाय, भारत-चीन सीमेवरील तंटा हे देशासमोरील एक मोठे आव्हान होऊन बसले आहे ; परंतु या प्रश्नांवर हा मीडिया अगदी गांधारीसारखी पट्टी डोळ्यावर लावून बसला आहे, तोंडाला सायलेन्सर लावून बसला आहे.

मग हा २४x७ मीडिया करतोय तरी काय? तर तो सुशांत आणि रिया यांच्यावरील तथाकथित वृत्तांतांचा बेसुमार भडिमार करीत आहे. त्यांच्यानुसार देशासमोर फक्त आणि फक्त सुशांत-रिया हाच ज्वलंत प्रश्न आहे, बाकी सारे आलबेल आहे. नार्कोटिक्स विभागाशी संबंधित समन्सनुसार रिया चक्रवर्ती तिकडे जात असताना ज्या पद्धतीने मीडियाने तिला घेरले आणि जी वागणूक दिली ती पाहून आपला हा मीडिया किती किळसावण्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे, याची जाणीव होते. हा मास मीडिया म्हणजे सार्वत्रिक मोठा मीडिया खरे तर बडा घर पोकळ वासा झाला आहे. अत्यंत कोडगा, निर्लज्ज, घाणेरडा झाला आहे. हे चॅनेल्स बघवतसुद्धा नाहीत. अर्णब गोस्वामी सारख्या मनोरुग्णाने पत्रकारितेस अत्यंत घाणेरडे वळण लावले आहे. कलंकित करून टाकले आहे.

मला वाटतं कोणाही सर्वसामान्य, विचारी माणसाला सुद्धा हे जे काही चालले आहे, ते पाहून किळस येत असणार आणि प्रश्न पडत असणार, आपण यासाठी ही बातम्यांची चॅनेल्स पाहतो का? तेही पैसे देऊन!

आपण या चॅनेल्ससाठी जे पैसे मोजतो, त्याच्या बदल्यात आपल्याला वस्तुनिष्ठ, सत्य बातम्या शांतपणे ऐकायला मिळाव्यात, हा आपला अधिकार नाही का? परंतु आज आपल्या या अधिकाराचे अपहरण केले जात आहे. केवळ या अधिकाराचेच नव्हे तर आपल्या स्वतंत्र विचारशक्तीचे, निर्णय क्षमतेचे आणि विवेकाचेसुद्धा अपहरण केले जात आहे.

मीडिया कोर्टाची भूमिका स्वतःच करून आपल्या ‘मालकाला’ हवे तसे निर्णय घेत आहे आणि ते निर्णय आपल्यावर मारून मुटकून लादत आहे. ते तुम्ही मानलेच पाहिजेत, म्हणून पराकाष्ठा करीत आहे. तुम्ही कितीही स्थितप्रज्ञ असलात तरी कुठे ना कुठे तुमच्या मनात संशयाचे बीज ते पेरीत आहेत. हे तुमच्या अधिकाराचे, विचाराचे अपहरण तुम्हाला मंजूर आहे का? नाही ना? ठीक आहे मग तुमचा प्रश्न असणार याला पर्याय काय? बातम्या तर आपल्याला कळायलाच हव्यात! होय, आपल्याकडे पर्याय आहेत.

पत्रकारितेचा चांगला अनुभव असलेले माझे मित्र राज असरोंडकर यांच्याशी मी या विषयावर बोललो. त्यावेळी त्यांनी असा मुद्दा मांडला की आजची मेन स्ट्रीम मीडियाची अवस्था पाहता, कोणत्याही चळवळीला स्वतःचा मीडिया असला पाहिजे. हा मीडिया अन्य बाबतीत मेनस्ट्रीम मीडिया सारखा असला तरी तो तुमच्या हातात असला पाहिजे.

राज यांनी एका लाईव्ह प्रसारणात सांगितले होते की बातम्यांच्या रूपाने आपले प्रश्न मांडणारे महाराष्ट्रभर एक लाख लोक निर्माण तयार व्हायला पाहिजेत. स्मार्टफोनचा वापर करून, आपआपल्या गावात उभे राहून, एक रिपोर्टर म्हणून त्यांनी प्रश्न मांडायचे आहेत. यासाठी तुमची भाषा ‘शुद्ध’ वगैरेच पाहिजे, असे काही नाही. इथे गरज चांगल्या भाषेची नाही, इथे प्रश्न महत्वाचा आहे.

मोबाइलमधील कॅमेर्‍यात प्रश्न दिसतो, तो जमेल तसा मोडक्या थोडक्या भाषेत का होईना, मांडला गेला पाहिजे आणि या मीडियातून प्रश्न मांडले जाऊ लागले तर मेन स्ट्रीम मीडिया संपुष्टात येईल, त्याची कोणी दखलही घेणार नाही. असा पर्यायी मीडिया निर्माण करण्यासाठी राज असरोंडकर झपाटून गेलेले आहेत.

असा प्रयोग त्यांनी मीडिया भारत न्यूजच्या माध्यमातून सुरू केला आहे. मी स्वतः मीडिया भारत न्यूजचा सबस्क्रायबर आहे आणि गेल्या काही दिवसांच्या अनुभवातून त्यांचा हा प्रयोग मला उजवा वाटतो आहे.

राज हे स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्रातील आहेत, या कामाचा त्यांना अनुभव आहे, भाषेचा अभ्यास आहे आणि चांगले वक्तृत्वदेखील आहे. त्यांना सामाजिक, राजकीय विषयांची चांगली समज आहे. हेच त्यांच्या कामात प्रतिबिंबीत होत आहे, मग ते काम ‘कायद्याने वागा लोकचळवळ’ असो की ‘मीडिया भारत न्यूज’ वरील बातम्या असोत.

ते बातम्यांची निवड विचारपूर्वक करतात, त्यात कसलीही लपवछपवी नसते. जसे आहे तसे या न्यायाने ते बातम्या देतात. त्यांच्याकडे चांगली टीम आहे, जिच्यामध्ये प्रफुल केदारे, वृषाली विनायकसारखे जाणकार लोक आहेत. राज यांनी कॉलेजच्या मुलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. या चांगल्या टीमचा इंपॅक्ट चांगला पडत आहे.

‘मीडिया भारत न्यूज’च्या व्यतिरिक्त अशीच वस्तुनिष्ठ आणि सत्य बातम्या देणारी, चर्चा करणारी प्रस्थापित वायर, स्क्रोल, प्रिंट, अक्षरनामा आणि आपले हक्काचे मॅक्स महाराष्ट्र ही चॅनेल्स आहेतच. हे वेगवेगळे लोक आपल्याला आपले विचार मांडता येण्याचं ऑप्शन देत आहेत. महाराष्ट्र अंनिस, राष्ट्र सेवा दल यांची स्वतःची यूट्यूब चॅनेल्स आहेत. कोविड-१९च्या काळात आपण मजबूरीने का होईना झूमचा वापर केला आहे आणि अन्य सर्व मिडियांचा वापर आपण करू लागलो आहोत. त्यांना प्रोफेशनल टच देणे गरजेचे आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन एकमेकांचा मीडिया उचलून धरणे गरजेचे आहे.

‘मीडिया भारत’ला सुद्धा उचलून धरले पाहिजे, वाढविले पाहिजे. राज यांच्यासारखी जी जी मंडळी असतील, त्यांची ही कामे सगळीकडे पसरवली पाहिजेत. आपण व्हाट्सअॅप मार्फत वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असतो. तशाच या गोष्टीही मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, सर्कल्स, ग्रुप्समध्ये शेअर केल्यास आपल्याला हे पर्यायी आणि हक्काचे माध्यम, हक्काचे चॅनेल मिळेल.


हेही वाचा : हे विषारी डंख कशासाठी ?


राज असरोंडकर सांगतात, मोबाइल, सेल्फी स्टिक आणि माइक ही तुमची वर्तमान काळातली हत्यारे आहेत. त्यांना चांगलीच धार काढा.

तुम्ही आम्ही लोक काही टपोरी लोक नाहीत, आपल्याकडे डिग्नीटी आहे. आपण एखाद्या सार्वजनिक जागी, स्टेशन, बस स्टॉप किंवा समस्या असलेल्या जागी ही हत्यारे काढून समस्या कॅमेर्‍यात पकडायच्यात आणि बातमी बनवायची आहे आणि ही बातमी बनली की सगळी यंत्रणा हलते. आमदार, खासदार, हलतात हा अनुभव आहे.

हा ट्रेंड आपल्याकडे सुरू करायचा आहे. त्यासाठी प्रशिक्षण द्यायचीसुद्धा राज यांची तयारी आहे. अशी निदान दोनशे जरी माणसे तयार झाली आणि कुठे तरी बीड, नांदेडला एखादी घटना घडली तर आपण जवळच्या आपल्या माणसाला सांगून खात्रीलायक बातमी मिळवू शकतो.


एखादा मृत्यू हत्या की आत्महत्या कसं ठरवतात ?


राज असरोंडकर बातमीसाठी सर्व माहिती स्वतः मिळवतात. आमदार, कार्यकर्ता वगैरे सर्व संबंधितांना फोन करतात. झारखंड, उत्तर प्रदेश येथील पोलिसांना फोन करून तिथल्या घटनांची शहानिशा करून घेतात. आज मीडिया भारतचे रोज दोन बुलेटीन निघत आहेत. पुढे अजूनही वाढतील.

‘मीडिया भारत’, मॅक्समहाराष्ट्र आणि वर उल्लेख केलेला पर्यायी मीडिया आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त त्यांचे चॅनेल सब्स्क्राईब करायचे आहे. कसली फी किंवा चार्जेस भरायचे नाहीत. तर, या माजलेल्या मेनस्ट्रीम मीडियापासून मुक्ति मिळविण्यासाठी, शुद्ध, सत्य बातम्या ऐकण्यासाठी, तुमचेआमचे हे कर्तव्य बनते आहे की मीडिया भारत आणि मॅक्स महाराष्ट्र, वायर, प्रिंट अशा चॅनेल्सना तुम्ही उचलून धरले पाहिजे.

तिथे तुम्ही त्यांच्या चुका दाखवू शकता, त्यांना मार्गावरून ढळण्यापासून रोखू शकता. कारण हा पर्यायी मीडिया तुमचा असणार आहे. त्यांना उचलून धरल्यास मेन स्ट्रीम मीडिया डायल्युट होऊन जाईल, त्यांचा डोलारा कोसळून पडेल. तुम्ही तो पाहता म्हणून तो टिकून आहे आणि तुमच्याच डोक्यावर मिर्‍या वाटतो आहे. मित्रांनो त्याला हटवणे तुमच्याच हातात आहे. तर आताच सुरू करा हे पर्यायी चॅनेल्स पाहणे आणि त्यांचा प्रचार/प्रसार करणे! धिक्कारा तो मेन स्ट्रीम मीडिया! अमलात आणा तुमचा खर्‍या बातम्या ऐकायचा अधिकार आणि मुक्त करा तुमचा मेंदू यांच्या आक्रमणातून.

 

 

उत्तम जोगदंड

सेवानिवृत्त बँक अधिकारी. अंनिस कार्यकर्ता


मिडिया भारत न्यूजचं मुडमाॅर्निंग दुनिया भाग ३० हे न्यूज बुलेटीन ऐकण्यासाठी टिचकी मारा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!