ऑफिसच्या भिंतीवर एका फलकावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, "मोठेपणा करण्यासाठी खोटेपणा कधीच करू नये".वाक्य साधंसुधं..पण अर्थ मात्र अतिशय गहन..अनेकदा मोठेपणा करण्यासाठी लोक खोटेपणा करतात. समाजाला दाखवायचं एक असतं आणि प्रत्यक्षातलं चित्र काही वेगळंच चित्र असतं. घरात एक आणि घराबाहेर एक..खायचे वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. बरं मोठेपणा तरी किती करावा माणसाने, दुसर्याच्या गळ्याला फास लागेपर्यंत ? छे, असं चित्र मुळीच बरोबर नाही. मोठेपणा मिळविण्यासाठी खोटेपणा का करायचा? असा ताण घेऊन का जगायचं? कोणासाठी हा देखावा करायचा ?

पैसे नसताना पैशांचा आव आणणं चुकीचं आहे. मग कधी वेळ आल्यावर माघारही घ्यावी लागते. भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेतला की तो निभावण्यासाठी चुकीची पावलं उचलत राहावी लागतात. एक खोटं बोलणं इतकं महागात पडतं की ते लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलणं भाग पडतं.
खोट्यावर खोटं बोलावं लागतं. खोट्याची एक मालिकाच सुरू होते.. जी डेलिसोपप्रमाणे सुरू राहते..सगळ्यांना बोअर करत राहते. जसा मालिकांमध्ये काही काळानंतर रटाळपणा सुरू होतो. मग तिच्याकडे बघावसंसुद्धा वाटत नाही किंवा पाहिलं तरी तितकीशी रुची राहत नाही.

मोठेपणा मिरवणाऱ्या माणसांचं देखील सुरुवातीला लोक कोडकौतुक करतात पण नंतर मात्र त्यांना टाळतात. माणसं एकदा-दोनदा भुललात तरी पुन्हा पुन्हा फिरून तीच चूक करत नाहीत. बडेजाव करणाऱ्या लोकांपासून चार हात लांब राहिलेलंच बरं असं लोकांना वाटतं.
"बडा घर पोकळ वासा" ही म्हण अशाच लोकांमुळे प्रसिद्ध झाली असावी. गप्पा मोठमोठ्या मारायच्या; प्रत्यक्षात मात्र सारं फोल !

तुम्ही कसे आहात हे तुमच्या वागण्यातून, कृतीतून इतरांना समजणारंच असतं. वायफळ बडबड करण्यात काहीच अर्थ नसतो. कृतीतून माणूसपण सिद्ध होत असतं. ती नुसती बोलून दाखवण्याची गोष्ट नाही.
आपण जसं आहोत तसंच जगासमोर यावं. आपली परिस्थिती, आपला स्वभाव जसा आहे तसा राहू द्यावा. अर्थात स्वभाव चांगला असेल तर तो जगासमोर आणायला काहीच हरकत नसावी. पण जर तसं नसेल तर मात्र आपल्याला बदलण्याची गरज आहे, असं समजावं.

परिस्थिती आहे तशीच सांगण्यात लाज वाटून घेऊ नये. आपण प्रामाणिकपणे काम करून आपल पोट भरतो, ही गोष्ट खूप छान आहे. त्यात खूप मोठं समाधान आणि रात्रीची शांत झोप आहे.
एकंदरीत काय तर आपणच आपल्याशी प्रामाणिक असावं. खोटेपणा करून मोठेपणा मिळत नसतो. तो मिळतो स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहून. असत्याला मार्ग नाही आणि सत्याला पर्याय नाही. सत्याची वाट अवघड असली तरी त्याचा शेवट खूप सुंदर आहे. सुंदर असं काही गवसायचं असेल तर थोडे कष्ट पडणारच आहेत. त्या कष्टात सुद्धा समाधान असणार आहे.
नंदा संजय गवांदे
लेखिका शिक्षक आहेत.
gawandenanda784@gmail.com