मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसच्या कार्यकर्त्या महिलांनी गरजूंसाठी वाढीव स्वयंपाकाचा निर्धार केलाय. घरच्या गृहिणी घरी रोज स्वयंपाक करत असतात. त्याच स्वयंपकात प्रत्येक कार्यकर्तीने दहा ते बारा चपात्या अधिक करून एका केंद्रामार्फत गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याची योजना महाराष्ट्र महिला काॅंग्रेसने आखली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आणि राज्य महिला काँग्रेस च्या प्रभारी प्रणिती शिंदे व प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला.
या बैठकीत महिलांच्या इतरही अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
‘शिवभोजन थाळी केंद्र महिलांना मिळावं, अशी मागणी केली. शासकीय समित्यांमध्ये महिलांना स्थान, महिलांना स्वयंरोजगार, स्वतंत्र लसीकरण केंद्र अशा मागण्या सरकारकडे करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी सर्व महिलांना दिली.
महिला या संवेदनशील असतात. त्यांना परिस्थिती अधिक चांगली समजून घेता येते. त्यांना सर्वांच्या पोटाची चिंता असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने ‘एक हात मदतीचा, एक घास मायेचा’ हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या माध्यमातून गरजू लोकांना पोटभर जेवण मिळेल आणि राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा घडून येईल, असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी झूम बैठकीत केलं.