माळी रिश्तेधागे : रंगरुपाच्या पलिकडचं नातं जोडणारा दुवा !

माळी रिश्तेधागे : रंगरुपाच्या पलिकडचं नातं जोडणारा दुवा !

माळी रिश्तेधागे : रंगरुपाच्या पलिकडचं नातं जोडणारा दुवा !

माळी समाजात प्रथमच ऑनलाईन अँप व झूमद्वारे आधुनिक पध्दतीने ऑनलाईन मेळावे व घरबसल्या वधुवरांच्या अनेक मुलाखती यशस्वीपणे आयोजित केल्या गेल्या व त्यानंतर 1000 हून अधिक विवाहेच्छूक वधुवरांची माहिती उपलब्ध झाली. ती आता पालकांच्या व समाजातील अनेक मान्यवरांच्या आग्रहानुसार माळी रिश्तेधागे या नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या अॅपमध्ये संकलित झाली आहे. इलेक्ट्रॉनिक व कॉम्पुटर इंजिनिअर रवी चौधरी यांच्या संकल्पनेतून हे अॅप तयार करण्यात आलंय. ३ जानेवारी २०२१ रोजीचा सावित्री उत्सव व महिला शिक्षण दिनाच्या निमित्ताने अॅपचा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी कमलताई ढोले पाटील, रश्मी पांढरे, मंजिरी धाडगे, शारदा लडकत, रोहिणी रासकर, मधुकर राऊत, कैलास काठे व गायत्री चौधरी उपस्थित होते. त्याच संदर्भाने रवी चौधरी यांचा माळी रिश्तेधागेमागची भूमिका मांडणारा लेख …

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक देशात, प्रत्येक समाजात बदल झाले. आपले राज्य देखील त्यास अपवाद नाही. कोरोना विषाणूच्या परिणामामुळे जीवनातील प्रत्येक बाबीवरच अनिष्ठ परिणाम झाला. विवाह ही अशीच अनिष्ठ परिणाम घडविणारी बाब ठरली. विवाह जमविणे, त्यासाठीची वधु वर सुचक मंडळे, लग्नपत्रिका, पोशाख व साडी खरेदी, दागिने, कार्यालय, सजावट, बॅण्ड, केटरर, व्हिडीओ व फोटोग्राफी, हॉटेल्स अशा असंख्य बाबींवर कोरोना काहात परिणाम झाला आहे.

यातून मार्ग काढण्यासाठीच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असणार्‍या माळी समाजाचा वधु वर मेळावा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला, ही विशेष कौतुकाची बाब मानावी लागेल. आंतरजातीय विवाह समाजात होत असतातच, त्यासोबत स्वतःच्याच समाजात विवाह करण्याचा प्रघात अजूनही कायम आहे.

सुमारे 30-40 वर्षांपूर्वीपर्यंत एकमेंकाकडे जाणे – येणे असायचे, वडिलधारी मंडळीदेखील आस्थेने परिचिताकडे जायचे, त्यातूनच उपवर मुलगा अथवा मुलगी यांची माहिती घेऊन एकमेंकाना द्यायचे. एकप्रकारे ती चालती -बोलती वधु वर सुचक मंडळेच होती.

आता मात्र काळ बदलला आहे. उपवर मुला मुलींची माहिती सहजतेने मिळणे शक्य होत नाही. त्यातूनच व्यावसायिक पातळीवर सर्व समाजामध्ये वधु वर सुचक मंडळे सुरू झाली.

अनेक टिव्ही चॅनेल्सने देखील वधु वर सुचक मंडळे विविध नावांनी सुरू केली. या सर्वांना प्रतिसादही मिळत राहिला. महाराष्ट्रात माळी समाजातही गेल्या 10-20 वर्षात वधु वर सुचक मंडळे काही प्रमाणात निघत राहिली. वधु वर मेळावेेदेखील आयोजित व्हायचे. काही स्थानिक अथवा राज्यपातळीवरील वधु वर मेळावे झाल्याचे मला स्मरते.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मात्र सर्व घडामोडी ठप्प झाल्या. मुले अथवा मुलींचे शिक्षण पूर्ण झाले आहे, नोकरी व्यवसाय अथवा शेतीदेखील करू लागल्या आहेत. लग्नाचे वयही झाले आहे. अशा वेळी कोरोना परिस्थितीत उपवर मुले अथवा मुली यांचा शोध तरी कसा घ्यायचा ? हा प्रश्न निर्माण झाला.

जर मुलगा अथवा मुलगी एकमेंकांना पंसत पडले तर छोेटेखानी घरगुती विवाह करणे, शक्य होऊ शकते. तो युवक अथवा युवती विवाह करून संसार करू शकतात. मात्र उपवर मुला मुलींचा शोधच थांबला, मुलामुलींची वयं वाढत राहिली, तशा पालकांच्या चिंताही वाढू लागल्या.

त्यासाठीच किमान कोरोना काळात तरी ऑनलाईन शिवाय पर्याय उरला नाही. रविवार ११ ऑक्टोबर २०२० रोजी माळी समाजाचा ऑनलाईन पद्धतीने झालेला महाराष्ट्रातील कदाचित पहिलाच वधु वर मेळावा असावा. यामध्ये उपवर मुला मुलींनी आपल्या माहीती सोबत आधारकार्ड देणेही सुचवलेले होते. यामुळे नाव, वय, पत्ता आदींबाबत अधिकृतता येते.

याशिवाय जे उपवर मुले मुली फोटो व माहिती बघून संपर्काची इच्छा व्यक्त करतील, त्यांचा ’झुम’ द्वारा देखील परस्पर संवाद घडून आणला जाणार आहे. यामध्ये लग्न ठरविणे हा हेतू नसून वधु वरांची माहिती फोटोसह उपलब्ध करून देणे, प्राथमिक निवड केलेल्या स्थळांचा एकमेकांशी झुम द्वारा सामोरासमोर संपर्क साधून देणे इतपत हेतू आहे.

वधु वरांची परस्परांची निवड ही तशी खुपच नाजुक बाब असते. आयुष्याचा जोडीदार निवडताना खुपच काळजी घेणे गरजेचे असते. एवढे करूनही घटस्फोट होताना दिसतात, तेव्हा निश्चितच वाईट वाटते.

सद्याच्या काळात मुली शिकलेल्या आहेत. त्यांना करीयर करायचे असते, स्वतःपेक्षा जास्त शिकलेला व जास्त कर्तृत्ववान पती हवा असतो. एकत्रित कुटुंबात नांदण्यास अनेकदा मुली नाखुष असतात, असे दिसून आले आहे. मुलगा कर्तबगार असेल तर भविष्यात आर्थिक स्थिर होईल हा विश्वास न बाळगता आर्थिक संपन्न कुटुंबातच विवाह जमविण्याचा मुलींच्या पालकांचा अनेकदा कल दिसून येतो.

शहरी आणि ग्रामीण असा फरकही मोठा आहे. शहरात वाढलेल्या मुली विवाहानंतर ग्रामीण भागात जाण्यास नाखुष असतात. याप्रमाणेच मुलांना देखील मुलगी सुंदर व गोरी हवी असते.

मुलीचे चेहर्‍याचे सौंदर्य व गोरेपणा यापेक्षाही तिच्या स्वभावातील समंजसपणा कुटुंबातील सर्वांची काळजी घेण्याची वृत्ती, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोण, अंधश्रद्धांना खतपाणी न घालण्याची मानसिकता, मुलीचे उत्तम शिक्षण व करीयर, मुलगी काळी -सावळी-गहुवर्णिय असली तरी तिच्यात असणारा स्मार्टपणा, अशा अनेक बाबींचा वास्तविक विचार व्हायला हवा, मात्र मुलगी गोरी व सुंदर हवी हाच पहिला आग्रह धरला जातो. त्यात बदल होणे आवश्यक वाटते. .

मध्यतंरी ’फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ या उत्पादनांच्या जाहिरातीतील ’फेअर’ म्हणजे गोरेपणा हा शब्द काढून टाकला पाहिजे, यासाठी 21 वर्षाची मुलगी न्यायालयात गेली. त्यानंतर केवळ आपल्या देशातच नव्हे तर सार्‍या जगात ’फेअर’ या शब्दाविरूद्ध समाजमन तयार होऊ लागले आणि अखेरीस हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीला ’फेअर’ हा शब्द बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला.

भारतासारख्या उष्ण कटीबंधातील देशात प्रामुख्याने स्त्रिया आणि पुरूषही काळे, सावळे, गहुवर्णिय आहेत. युरोपातील गोरेपणा प्रमाणे गोरेपणा आपल्या इथे नाही.

आपण गोरे अथवा सुंदर नसलो तरी पत्नी मात्र गोरी व सुंदर हवी, ही समाजात दृढ झालेली मानसिकता झपाट्याने बदलली पाहिजे. कारण लाखो युवतींना आपण गोरे नाही, याबद्दलचा न्यूनगंड दिसून येतो. वधु वर मेळाव्यात ही बाब निश्चितच महत्वाची असते.

त्यामुळेच मुलगा व मुलगी कर्तबगार, शिक्षीत, संमजस, कुटुंंबाला एकत्र राखण्याची, घरातील वृद्ध मातापित्यांची काळजी घेणारी अशी असायला हवी. मुलाची श्रीमंती आणि मुलीचे सौंदर्य हाच एकमेव निकष विवाहप्रसंगी बघितला जाऊ नये, त्यासाठीच प्रत्येक समाजाच्या वधु वर मेळाव्यात अशा विचारांवर चर्चा जरूर व्हावी.

माळी समाजाच्या 11 ऑक्टोबरला झालेल्या ऑनलाईन वधु वर मेळाव्यात असा समाज प्रबोधनाची झालर देण्याचा प्रयत्न आमचा निश्चित होता.

 

रवी चौधरी, पुणे

संकल्पना व मुख्य संयोजक
मोबाईल: 9922431974 व 9822435090
www.Mahatmaphule.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!