मल्लिका, तू जगण्याला भिडलीस गं…!

मल्लिका, तू जगण्याला भिडलीस गं…!

मल्लिका, तू जगण्याला भिडलीस गं…!

आधीच तुझी माफी मागते, तुला वाचलं आणि तुझ्याशी बोलावसं वाटलं. तुझा उल्लेख एकेरीच करेन, कारण तसं बोलताना तू मला जास्त जवळची वाटते…प्रत्येक स्रीच्या जवळची वाटलीस.

तू जगण्याला भिडलीस गं.. तुझ्या वेदनेला ठोकरलंस..खरंच तू उंच उडी मारलीस..तुझ्या इतकं धाडस तुलाच जमलं.. तुझ्या वैयक्तिक आयुष्याची चामडं तूच सोललीस..साऱ्या कुंठित झालेल्या स्रीयांच्या चपराक मारलीस..तुझं खवल्या खवल्यांचं आयुष्य वाचताना हादरे बसत होते..स्रीचं दुःख गृहीत धरलं जातं हेच सत्य सांगणारं वास्तव तू मांडलंस.

तू कम्युनिस्ट विचारसरणीच्या कुटुंबात मोठी झालीस. बंड, विद्रोह शिकलीस. आई, वडील,आणि दोघी बहिणी यांच्यासोबत सुखाची आणि आयुष्याची गाणी, कविता केल्यास. शालेय वयात अनेक विषय आवडीचे असले तरी गायन, निबंध, वकृत्व यात तू अव्वल असायचीस. तुझ्या आयुष्यात अनेक माणसं आली आणि निघून गेली. कॉरोनर कोर्टात तुझ्या दीदीने माणुसकी धर्म सांगून समाजाला मोठी शिकवण दिली ; कारण तो धर्म फक्त तोंडी मानला जातो. अजुन तरी कुठे कॉलममध्ये भरला गेल्याचं वाचण्यात आलं नाही.

तारुण्याच्या उंबरठ्यावर जसे सगळे खुलतात, तशी तूही खुलायला लागलीस. शेरोशायरी तुला आवडायला लागल्या. तशातच तुझ्या आयुष्यात विजेच्या वेगाने नामदेव ढसाळ नावाचं वादळ आलं.

गोलपीठ्यात मरणासक्त जिणं ज्यानं विषासारख भिनवून, पचवून टाकणाऱ्या अशा पँथरच्या कविता तुला आवडायला लागल्या. तो तुझ्या प्रतिमेत फिट बसणारा मर्दानी, कलंदर तरी हळवा आणि तुझ्यावर प्रेम करणारा कवी होता. सगळं कसं सुखासुखी चालू होत. पँथरवरची चर्चा, समाज, समाजवाद, राजकारण सगळं सगळं…..

नामदेवच्या गोलपिठामध्ये तू अनेक वेळा भटकली. रंजलेलं, गांजलेलं, दुःखी कष्टी, भयावह, वेदनादायी आयुष्य जगताना अनेक लोक जवळून पाहिले. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीत मिळणाऱ्या सुखाचे क्षण तू वाचलेस.

सत्तरच्या दशकातही तू कुठल्याही पद्धतीने लग्न करण्याचं नाकारलं. नामदेव च्या पुस्तकात, साहित्यात तू रमू लागली, हळू हळू तुला तो समजू लागला. त्याचं संघटन, वकृत्व, गुंडगिरी त्यामुळे तो माणसं पटकन जमवू लागला. तो सेन्सिटिव्ह आणि वैचारिक तल्लख बुद्धीचा तर तू हळवी..नामदेववर अतोनात प्रेम करणारी…दिवस कसे आनंदात चालले होते.

पण नव्याचे नऊ दिवस झाले कि भांड्याला भांडं लागत तसं झालं. तुमची भांडण व्हायला लागली. त्या तीव्र संतापाच्या, दुःखाच्या भावनेतही तुला जगावं अस वाटायचं. अशा अनेक जगण्याच्या घटनांतून तू अंतर्बाह्य बदलत गेलीस.

पराभवातून तू ओळखायला शिकलीस. पराभवात तू श्रीमंत झालीस. तू मार खाऊनही ताठ मानेने जगत होतीस. तुझ्या स्वभावातला बदल तुलाच जाणवायला लागला. चळवळीत समरस होऊनही तू अलीप्तच राहिलीस. तुझी होणारी कोंडी तूच फोडलीस. जातीव्यवस्था तर आहेच, पण मानसिक गुलामगिरी जशीच्या तशी आहे.

तुझं अगदी खरं आहे, प्रत्येक स्त्रीला स्वतःचं अस्तित्व, अस्मिता या गोष्टी असायलाच हव्या. पण आजही स्त्रिया मानसिक गुलामगिरीत जगतायंत….आणि त्यातच आनंद मानतात. त्या पुरुषांच्या इगोला खतपाणी घालतात. कदाचित कोणतीही स्री सामाजिक, पारंपरिक बंधनापेक्षा मनाचं बंधन मानते.

कवी सुरेखा पैठणे यांचे कवितेचे शब्द आठवतात.

साहब प्यार तो तुमसे बेझिझक है..मगर बात अब आत्मसन्मान की है…

हो नक्कीच, तू लढलीस सत्तेसाठी नाही तर स्वत:च्या आत्मसन्मानासाठी…

तू तुझ्या संकोच, लज्जा अन् त्यागाची वस्रं झुगारून दिलीस. तू तुझ्या प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवलास. खूप वादळं आली, गेली. तुला फक्त निस्सीम,निखळ प्रेम करणारा हवा होता. प्रेम ही भावना असते, व्याकुळता असते. तू नामदेवाचे कर्तृत्व मान्यही केलेस. पण जेव्हा तुझा आत्मविश्वास ठोकरला गेला, तेव्हा तू त्याला विरोधही केलास. खरंच जगण्याला भिडलीस ग..

 

शालिनी आचार्य

शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, कायद्याने वागा लोकचळवळीच्या रायगड जिल्हा समन्वयक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!