वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी कोवळ्या बालपणातच ज्यांचं मातृछत्र हरवलं होतं, बालवयातच ज्या राजवटीने त्यांच्या आईचा व कुटुंबातील नातेवाईकांचा बळी घेतला, त्या जुलमी रझाकारी अन्यायी राजवटीचा सामना करावा लागला होता आणि आपलं जन्मगाव सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होऊ लागलं होतं, त्या नव्या जागेत मिलमध्ये काम करता करता शिक्षण पूर्ण करत, सामाजिक, कामगार चळवळींचं नेतृत्व करत 'सोल इल्लादा सरदार' म्हणजेच 'अजिंक्य असा नेता' हे लोकांनी दिलेलं नामाभिधान मिरवणारा नेता म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे !
गुलबर्गा म्हणजेच आत्ताच्या कलबुर्गीमधून पदवीचं आणि कायद्याचं शिक्षण घेत असताना मल्लिकार्जुन खर्गे कॉलेजात विद्यार्थी नेता होते. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यात ते अग्रेसर होते. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री देवराज अर्स यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनीच खर्गे यांना काँग्रेसमध्ये आणलं.

वास्तविक मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धीजमचा प्रभाव आहे. ते सुरुवातीला काही काळ आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातही कार्यरत होते ; परंतु आंबेडकरी विचारानुसार प्रभावी परिणामकारक काम करायचं असेल आणि तळागाळातील वर्गाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर मुख्य प्रवाहात म्हणजेच काँग्रेससारख्या पक्षात कार्यरत होऊन राजकारणात पुढे जाणं गरजेचे आहे हे देवराज अर्स यांनी खर्गेंवर बिंबवलं आणि त्यांच्यामुळेच खर्गे यांचा काँग्रेसमधला प्रवास सुरू झाला.
१९७२ मध्ये खर्गे यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले. तिथून सलग नऊ वेळा त्यांनी आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. पुढे ते दोन वेळा सलग खासदार झाले. २०१९ ला लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यावर काँग्रेस पक्षाने त्यांचा मागील पक्षनिष्ठेचा प्रवास लक्षात घेऊन खर्गे यांना राज्यसभेवर घेतलं. ते लोकसभेत असताना आणि राज्यसभेत गेल्यानंतरही विरोधी पक्षनेता म्हणून कार्यरत राहिले.

गांधी नेहरू घराण्यासोबत त्यांची जितकी जवळीक आहे, काँग्रेस पक्षासोबत त्यांच्या निष्ठा जितक्या पक्क्या आहेत, तितकंच धर्मनिरपेक्षतेशी खर्गे यांचं मजबूत आणि प्रामाणिक नातं आहे. देशातील सध्याच्या वातावरणात म्हणूनच खर्गे यांची निवड महत्त्वपूर्ण ठरते आहे.
आपल्या भूमिकेवर ते सुरूवातीपासून ठाम आहेत. कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपली वकिली कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वापरली होती. जेव्हा जेव्हा राज्य सरकारात विविध खात्यांचे म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्यांनी तळागाळातील समाजघटकांसाठी नावीन्यपूर्ण योजना आणल्या, अनेक लोकाभिमुख धोरणं आणली, संधी मिळेल तिथे मागासांचा अनुशेष भरून काढण्याचं काम केलं. भूमीहीनांना न्याय मिळवून दिला.

खर्गे दक्षिणेकडील द्रविडीयन राजकारणाचे प्रतिनिधी आहेतच, ते दलित समाजातले आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावाखाली आहेत, बुद्धीजमचा पुरस्कार करणारे आहेत ; शिवाय उत्तरेतही आंबेडकरी विचारांचा नेता म्हणून त्यांची लोकप्रियता आहे तसंच हिंदी पट्ट्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीत दोन उमेदवार होते. ते दोघेही दक्षिणेतील होते. कोणीही निवडून आलं असतं तरी काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व दक्षिणेकडेच राहिलं असतं. त्यातही शशी थरूर हा उच्चभ्रू समाजाचं प्रतिनिधित्व करणारा नेता आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखा दलित समाजातून पुढे आलेला नेता, यात काँग्रेस मधून खर्गे यांना मोठं समर्थन मिळाल्यामुळे काँग्रेसने आपल्या पुढील वाटचालीचे संकेत देण्यात आणि पक्ष समर्थक व हितचिंतकांना नेमका संदेश देण्यात बाजी मारली आहे.
खर्गे कब्बडीपटू आहेत. फुटबॉल खेळाडू आहेत. क्रिकेटर आहेत. घरी ते शिस्तप्रिय असतात. अन्न, पाणी वीज यांचा अपव्यय रोखण्याबाबत ते जागरूक असतात. स्वभावाने मनमिळाऊ आणि बरेचसे खोडकरही आहेत. उपरोधिक विनोदात ते माहिर आहेत. मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, इंग्रजी भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. गांधीनेहरू घराण्याचा एकनिष्ठ तसंच दलित नेता म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची जी मर्यादित प्रतिमा रंगवली जाते, त्याहून त्यांचं व्यक्तिमत्त्व कितीतरी वेगळं आहे.

गांधी नेहरू कुटुंबावर सतत हल्ला चढवून तिथून काॅंग्रेसचं नेतृत्व बाहेर काढलं तर दुसरं सक्षम कोणी नाही आणि काॅंग्रेस कमजोर होईल, अशी अटकळ काॅंग्रेस विरोधकांची नेहमीच असते. पण, एका बाजूला राहुल गांधींच्या भारतजोडो पदयात्रेने देश ढवळून निघत असताना मल्लिकार्जुन खर्गे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड काॅंग्रेसला नवसंजीवनी देणारी ठरेल ! अर्थात, ते सिद्ध होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल.