नात्यात लग्न नकोच !!!

नात्यात लग्न नकोच !!!

नात्यात लग्न नकोच !!!

बरेच जणांचे फोन येतात, लग्न ठरलंय. मुलगा आणि  मुलगीचा रक्तगट एक आहे, असं असेल तर पुढे मुलं होत नाहीत असं ऐकलंय. असं होतं का? रक्तगट एक असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही खरंतर, तरीही विनाकारणच कोणीतरी एक रक्तगट असला तर मुलं होत नाहीत असं ‘पिल्लू’ सोडून दिलेले आहे. त्यापेक्षाही जास्त महत्वाचं मला वाटतं, ते लग्नाअगोदर डॉक्टरांशी बोलून ‘नात्यातील लग्नं’ टाळणं.

मी ज्या भागात ‘स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ’ म्हणून  प्रॅक्टिस करते तिथे ‘नात्यात लग्न होणे’ अजूनही खूप कॉमन आहे आणि त्यामुळे संततीमध्ये उद्भवणाऱ्या दोषांचे, व्यंगाचेही प्रमाण बरेचसे आहे.

मुळात नात्यात लग्नं होण्यामागे कारणे ही सामाजिक कारणे आहेत. सासर ओळखीचेच असल्याने, आपल्या मुलगीचा जाच होणार नाही…संपत्ती /इस्टेट आपल्याच जवळच्या नातेवाईकांमध्येच राहील…आपल्या चालीरीती परंपरा मुलीला नव्याने समजावून सांगाव्या लागणार नाही…मुलगा बघण्यातल्याच असल्यामुळे फसवणूक होणार नाही…असा विचार करून, सख्ख्या मामाशी, आत्याच्या मुलाशी, मामाच्या मुलाशी,आणि मुस्लिमांमध्ये तर अगदी सख्ख्या  चुलत,  मावस भावंडांशीही मुलींची लग्ने होतात. खूप साऱ्या सुशिक्षित कुटुंबांमध्ये देखील,म्हणजे ज्यांनी विज्ञान थोडंफार शिकलेलं आहे त्यांच्यामध्येही असे विवाह अजूनही पार पाडले जातात.

आमच्या भागातील मराठा समाजात तर, अश्या नात्यातल्या लग्नाचे प्रमाण इतके आहे की आत्याच्या, मामाच्या मुलाला दादा भैया असं म्हणण्याऐवजी लहानपणापासूनच  ‘दाजी’ आणि मुलीला ‘वैनी’ अशी हाक मारली जाते, शिवाय पिढ्यानपिढ्या दोन कुटुंबांमध्ये नात्यात लग्नं होत राहतात…साटंलोटं ही होतं….

अरब देशांमध्येही, अगदी जवळच्या नात्यातले लग्नाचे प्रमाण खूप आहे.आणि त्यामुळे उद्भवणारे  गर्भातील दोष याचेही प्रमाण खूप आहे. पाश्चिमात्य देशात असे विवाह जवळ जवळ नाहीतच. आपल्याकडे सगोत्र विवाह हे ब्राह्मण समाजात टाळले जातात. जे अनुकरणीय आहे.

आता ह्या ‘नात्यात लग्नाचा’ आणि  संततीमध्ये दोषाचा काय संबंध? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल.

नात्यात लग्नं ही ढोबळमानाने तीन प्रकारची असतात.अगदी जवळच्या नात्यात, लांबच्या नात्यात आणि समाजातल्या समाजात ..

नात्यातील लग्नामुळे गर्भामध्ये मतिमंदत्व,मेंदू आणि मज्जारज्जूचे व्यंग (बाळाचे डोके तयार न होणे,मणक्यामध्ये फट असणे) हृदयाचे जन्मजात व्यंग ,अन्ननलिका तयार न होणे, अन्ननलिका आणि श्वासनलिका जन्मजातच जोडली गेलेली असणे, बहिरेपणा(आणि त्यामुळे मूकबधिर )अंधत्व, फाटलेले ओठ आणि दुभंगलेले टाळा, गर्भपात,गर्भाची वाढ मंदावणे असे बरेच प्रॉब्लेम उद्भवतात.

असे का होते हे समजण्यासाठी यामागचे विज्ञान, अनुवंशशास्त्रीय कारण (genetics )समजून घ्यावं लागेल.

आपले शरीर हे अब्जावधी पेशीनी बनलेले आहे,या सर्व पेशींमध्ये एकसमान अश्या गुणसूत्रांच्या 23 जोड्या(46 गुणसुत्रे)असतात. या सर्व पेशी ह्या एका मूलपेशी पासून विभाजन होऊन बनलेल्या असतात. त्या मूळपेशीमध्ये 23 गुणसूत्रे स्त्रीबीजाकडून आणि 23 गुणसूत्रे  पुरुष शुक्राणू पेशीकडून आलेली असतात. गुणसूत्रांमध्ये काही दोष हे सुप्तावस्थेत असतात. जोडप्यातील दोघांकडूनही सुप्तावस्थेत दोष असणारी अशी गुणसूत्रे फलनाच्या वेळी एकत्र आली तर ‘दुर्बल गुणसूत्र’ तयार होते आणि तो दोष संततीमध्ये प्रकट होतो. (ऑटोसोमल रेसेसिव्ह आजार)

आता, ज्यांची अगोदरच नात्यात लग्न झाले आहे त्यांनी यामुळे अगदी हवालदिल होऊन जाण्याचे कारण नाही. प्रत्येकच जोडप्यात आणि प्रत्येकच संततीमध्ये दोष  असेल असे नाही, पण इतर जोडप्यांच्या तुलनेत व्यंग किंवा काही विकार जास्त होण्याची शक्यता मात्र त्यांनी ध्यानात ठेवावी लागेल. यासाठी त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गर्भधारणा पूर्व समुपदेशन (preconceptional counselling) करून घ्यावे.गर्भारपणात काही सोनोग्राफी आणि टेस्ट्स द्वारे बऱ्याच व्यंगाचे,मतीमंदत्वाचे निदान आपण खात्रीशीररित्या करून त्या दोषयुक्त गर्भाचा गर्भपात करू शकतो.

तर या सर्व बाबी आणि धोके लक्षात घेता, इथून पुढे नात्यात लग्न टाळून आपण अधिकाधिक उन्नत आणि समृद्ध नवीन पिढ्या निर्माण व्हाव्या यासाठी प्रयत्नशील राहूया.


 

डॉ. साधना पाटील-पवार

लेखिका पलूस (सांगली) येथे डाॅ. पवार हाॅस्पिटल चालवतात. त्या स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ आहेत.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!