चुणचुणीतपणामागे दडलेलं व्यंग !

चुणचुणीतपणामागे दडलेलं व्यंग !

चुणचुणीतपणामागे दडलेलं व्यंग !

मुलं चुणचुणीत असतात. बुद्धिमान असतात. त्यांना एखादा मेंदूचा आजार असू शकतो, हे आपल्या ध्यानीमनीही येत नाही. पण सुक्ष्म निरीक्षण मुलांमधील बदल हेरू शकतं आणि वेळीच उपचार होऊ शकतात ! अशा आजाराची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय सांगताहेत, डॉ. साधना अमोल पवार ! त्यांना आलेल्या एका अनुभवाच्या निमित्ताने...

एका हिल स्टेशनला फिरायला गेलो होतो . छान थंडी होती .
दिवसभर इकडेतिकडे भटकून ,जेवण करून ,रात्री गप्पा मारायला बसलो होतो .रोज कामाच्या व्यापात घरच्यांशी मनसोक्त गप्पा होतंच नाहीत म्हणून बाहेर गेलं की सगळे व्याप विसरून छान गप्पा मारतो आम्ही. हाऊसकिपींगवाल्याने आमच्या रूमच्या बाहेर मस्त बॉनफायर (शेकोटी ) पेटवून दिलेलं ...आमच्या गप्पा भरात आल्या होत्या .

इतक्यात...‘तो’उड्या मारत मारत बाहेरून आला ,आमच्याकडे पाहिलं आणि आईचा हात सोडून शेकोटीकडे पळाला .
त्याची आई त्याला अडवत होतीच पण तो जुमानतोय कसला ....

तो ....आमच्या शेजारच्या रूममधला तात्पुरता शेजारी !

पहिल्या सेकंदात त्याने बॉनफायरची सिस्टिम समजून घेऊन लाकडं इकडं तिकडं हलवून फ्लेम ठीक केली. दुसऱ्या सेकंदाला दीदीशी बोलून झालं ,आणि तिसऱ्या सेकंदाला आमच्या छोट्याशीही ......
आपण चौथीत आहोत हे सांगून लगेच आम्हाला प्रश्नही विचारला ..
"नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिला पाय टाकला" ......बरोबर ?
तर मग सांगा,दुसरा कुणी टाकला ?

आम्ही त्या दुसऱ्या अंतराळवीराचं नाव काय ते आठवतोयच ,तोवर स्वतःच म्हणाला ...अरे ....नील आर्मस्ट्रॉंगला 'दोन' पाय होते. मला वेडीला तरीही कळलं नाही मग म्हणाला, अहो ऑंटी ,नील आर्मस्ट्राँग काय दुसरा पाय स्पेस शटल मध्येच ठेवेल का ??

डोळ्यात पाणी येईपर्यंत हसले मी या जोकला !

काहीही ओळख नसताना ,असं मिसळून जाण्याचा त्याचा स्वभाव आवडला. मग काय, त्यांनतर पठ्ठयाची गाडी सुसाटच ..महाबळेश्वर मध्ये कुठला खडक आहे सांगा बघू ? पासून आय पी एल मधल्या टीमपर्यंत सगळे प्रश्न विचारून ,स्वतःच त्याची उत्तरेदेखील देऊन झाली त्याची ..त्या दिवशी सुपरमून होता म्हणून आमच्या मुलांना बरोबर घेऊन छोटीशी चक्कर पण मारून आला चंद्राबद्दल सुद्धा बरीच माहिती देत होता ..

संकलित चित्र : गुगलवरून साभार

काय ‘चुणचुणीत’पोरगं आहे असा मी विचार करत होते तोवर आईची हाक आल्याने पळाला. पळताना अंधुक प्रकाशात लंगडताना दिसला ...काहीतरी लागलं असेल,धडपडला असेल ..असं वाटलं .

तो गेल्यावर मी मुलांना म्म्हणाले, बघा बघा, कसं बोलकं पोरगं आहे !

मुलगी म्हणाली ,hmm,he is cute ! अगं मम्मा ,त्याला सेरेब्रल पाल्सी आहे...हृदयात, मस्तकात कळ आली ऐकून ..!

वाईट वाटलंच...पण थोड्या वेळाने त्याने त्याच्या व्यंगावर किती छान मात केली आहे असा विचार करून मग ठीक वाटायला लागलं.

सेरेब्रल पाल्सी ....मराठीत काय म्हणतात नाही खरंतर .'मेंदूघात' म्हणता येईल. सेरेब्रल पाल्सीमध्ये आपल्या मेंदूमध्ये प्रॉब्लेम होतो. पेशीय लोच्या ! आईच्या पोटात असताना,प्रसूतीदरम्यान ,किंवा नवजात अवस्थेत मेंदूला काही इजा झाली तर सेरेब्रल पाल्सी होते .
कोणाला कमी प्रमाणात तर कोणाला अतिशय जास्त प्रमाणात !

असं होण्याची कारणं कधी अनुवांशिक अपघात ,किंवा आईच्या उदरात असताना झालेले काही जंतुसंसर्ग किंवा पोटात असताना मंदावलेली वाढ ,जन्म होत असताना मेंदूत झालेला रक्तस्त्राव , नवजात बाळाला झालेली कावीळ अथवा जंतुसंसर्ग अशी अनेक !

सी पी च्या काही मुलांमध्ये हातपाय आखडलेले असतात तर काहींमध्ये लुळे असतात .काहींचा सतत एखादा स्नायू आपोआपच आकुंचन आणि प्रसरण पावत असतो .

सेरेब्रल पाल्सी जन्माच्या वेळी पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यानेच होते असा पूर्वी समज होता ,पण आता संशोधनानंतर हे सिद्ध झाले आहे कि सगळ्याच सेरेब्रल पाल्सी जन्मप्रक्रियेदरम्यान बाळ गुदमरल्याने होत नाहीत ,कित्येकांची सुरुवात आईच्या पोटातच झालेली असू शकते ,किंवा जन्मानंतरही काही बऱ्याच कारणांमुळे सेरेब्रल पाल्सी उदभवू शकते.

सेरेब्रल पाल्सी पूर्णपणे टाळता येणं शक्य नसलं तरी काही अंशी टाळता येणं शक्य आहे .

त्यासाठी आपण काय करू शकतो ?

नात्यात लग्न करणं टाळायला हवं. सर्व जोडप्यांनी 'गर्भधारणापूर्व समुपदेशन' करून घ्यायला हवं. गर्भवती स्त्रियांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.,काही पाळीव प्राण्यांच्या जवळ फारसे जाऊ नये. वेळच्यावेळी सर्व तपासण्या ,सोनोग्राफी वगैरे करून घ्याव्या. डॉक्टरनी सांगितलेली औषधे व्यवस्थित घ्यावीत .आहार परिपूर्ण घ्यावा. बाळ मुदतीअगोदर जन्माला येऊ नये यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी. अनावश्यक प्रवास ,अतिश्रम टाळावे. प्रसूती,योग्य स्त्री रोग तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करून घ्यावी. नवजात बालकांमध्ये जंतुसंसर्ग, अपघात होऊ नयेत याची काळजी घ्यावी .

मुलांमध्ये बसणे ,रांगणे ,उभे राहणे असे नेहमीचे मेंदूच्या विकासाचे काही मैलाचे दगड असतात (deleopmental milestones ) ते जर उशिरा दिसले किंवा दिसलेच नाहीत तर सी पी ची शंका घेऊन त्यानुसार तपासण्या व उपचार सुरु केले जातात .

मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सीचे निदान झाल्यास पालकांनी घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत .या मुलांचा आय क्यू चांगला असतो. काही औषधे आणि फिजिओथेरपी याने या मुलांचे आयुष्य सुसह्य होऊ शकते .

'तो'मात्र असे व्यंग असूनही आनंदी राहण्याचा जगण्याचा एक मंत्र आम्हाला देऊन गेला. जिथे कुठे असेल 'तो 'तिथे आयुष्यभर असाच आनंदी रहावा आणि खूप मोठा कोणीतरी बनवा हीच सदिच्छा .

 

 

 

डॉ. साधना अमोल पवार

स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, पलूस ( महाराष्ट्र )
( कायद्याने वागा लोकचळवळीच्या सावित्री पुरस्कार, २०१९ च्या मानकरी )

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!