गावातल्या बायकांच्या आपापसात चर्चा चालू होत्या. कुणी म्हणत होतं, यावर्षी खूप उन्हाळा आहे. काय माहित, ह्यावेळेस पाऊस पडतो की नाही? की नुसतंच कोरडं नक्षत्र जातंय. नक्षत्र कोरडं गेलं की शेतकऱ्यांना आपल्या पिकाची चिंता लागते. वर्षभर आपल्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवावा ह्या एकाच प्रश्नाने मन व्याकुळ होऊन जातं.
ज्याच्याकडून थोडी फार अपेक्षा असते त्यानेच जर ती पूर्ण केली नाही, तर दुसऱ्या कोणाकडून ती पूर्ण करणार ? असे होऊन जाते.
व्यक्ती तितक्या प्रकृती. कुणीही कुणासारखे नाही हेच खरे. काही तरी फरक हा आहेच. तसेच काहीसे काही लोकांच्या बाबतीत घडते. एखाद्याबद्दल आपण ठेवलेली आशा, अपेक्षा त्या पूर्ण होतच नाहीत आणि मग उरतात त्या फक्त वेदना.

कधीकधी यासाठी गावाकडे एक प्रचलित म्हण आहे. भरवशाच्या म्हशीला टोणगा.
त्या व्यक्तीवर आपण एवढा विश्वास ठेवतो, की तो काहीही झालं तरी पूर्ण करणारच, असं वाटत राहतं. पण छे, असं काही होत नाही आणि असं केल्याने आपण त्याला दुसरा पर्यायही ठेवलेला नसतो त्यामुळे तर आणखीनच पंचायत होते.

अपेक्षा पूर्ण करणारी माणसे बऱ्याचदा समोरच्याला आशेला लावतात. भली मोठी - मोठी स्वप्नं दाखवतात. खरोखर ज्यावेळेस ती पूर्ण करण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र काढता पाय घेतात. इतके नामानिराळे होतात की, आपलेच आपल्याला आश्चर्य वाटावे. ही तीच व्यक्ती ना, जिने आपल्याला काही आश्वासन दिलं होतं.
"गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा". कायमच अशीच राहणारी माणसंसुद्धा आहेत.
यावरून एक गोष्ट आठवली.
भयंकर थंडी पडलेली असते. रस्त्यावरील भिकारी असाच एका आडोशाला शरीराचे मुटकुळे करून झोपलेला असतो. तिथून रोज एक श्रीमंत व्यक्ती गाडीने प्रवास करत असतो. त्या भिकाऱ्याला पाहून त्या माणसाला त्याची दया येते. त्या भिकाऱ्याला तो श्रीमंत माणूस थंडीपासून वाचण्यासाठी पांघरून आणून देण्याचे आश्वासन देतो.
तो गरीब भिकारी बिचारा आशा लावून बसतो की, मला आता पांघरुण मिळेल. जेव्हापासून त्याला अशी आशा लागते तेव्हापासून जणू त्याची प्रतिकारशक्तीच कमी होऊ लागते. त्याला अधिकच थंडी वाजू लागते.
हा श्रीमंत व्यक्ती मात्र आशा लावून गायब झालेला असतो. तो साफ विसरून गेलेला असतो की, आपण कोणाला तरी आश्वासन दिलं आहे.
दोन-चार दिवस निघून जातात. चार दिवसानंतर तो श्रीमंत व्यक्ती पुन्हा त्याच रस्त्याने जात असतो. जाताना त्याला रस्त्यात खूप गर्दी दिसते. म्हणून तो खाली उतरतो. बघतो तर काय? आपण ज्याला आश्वासन दिलं होतं तोच मरून पडला आहे. आजूबाजूला चर्चा सुरू असते, प्रचंड थंडीने त्याचा जीव गेला.

मित्रांनो, आशा-अपेक्षा खरंच वाईट आहेत म्हणूनच निस्वार्थ सेवा करत राहणं चांगलं !कोणाकडूनही अपेक्षा ठेवून जर कृती करत राहिलो, तर बऱ्याचदा निराशाच पदरी पडते.
कोरड्या नक्षत्रांसारखी असलेली माणसं कधीच कोणाचीच कोणतीच गरज भागवू शकत नाहीत. कोरडे नक्षत्र पापणीला पूर आणल्याशिवाय राहत नाही. आपल्याला मात्र उगीचच आस लागून राहते भरलेल्या मेघांची.
काळे मेघ कधी बरसतील किंवा कधीही दूर जातील हे काही सांगता येत नाही. तेव्हा वेळीच सावध असलेलं केव्हाही बरंच.
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com