आमच्या हद्दीत कोणत्याही रिक्षाचालकाचा एखादा हप्ता थकला असेल तर त्याची रिक्षा फायनान्स कंपनीवाले ओढून नेऊ शकणार नाहीत. कमीत कमी तीन हप्ते थकलेले असतील तरीही त्यांना आधी पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती द्यावी लागेल व विना माहीती देता जर कुठल्या रिक्षाचालकाची रिक्षा नेल्यास त्यांच्यावर राॅबरीचा गुन्हा दाखल करू. तसंच कोणत्याही फायनान्स कंपनीचा रिकवरी एजंट ओळखपत्राशिवाय रिक्षाचालकांकडे कर्जवसुलीसाठी आला तर सरळ खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी सक्त ताकीद कोळसेवाडी पोलीसांनी आज रिकव्हरीसाठी आल्याचा दावा करणाऱ्या दोघां जणांना दिली. कल्याण पूर्व शिवसेना उप शहर संघटक आशा रसाळ यांनी ही माहिती 'मीडिया भारत न्यूज' ला दिली.
कल्याण पूर्वेतील एक रिक्षाचालक गणेश चौधरी ( रिक्षा क्रमांक MH05D Z7885) यांचा बजाज फायनान्सचा चालू महिन्याचा केवळ एक हप्ता थकला असताना बजाज फायनान्सचं नाव सांगत दोघे अनोळखी युवक रात्री नऊ वाजता वसुलीसाठी कल्याण पूर्व येथील चेतना शाळेजवळील त्यांच्या घरी आले होते. कल्याण पूर्वेकडील शाखाप्रमुख कमलाकर इंदलकर यांनी ही माहिती आशा रसाळ यांना दिली.
वसुली एजंटांकडे ओळखपत्र नव्हते !
घटनास्थळी पोचल्यावर आशा रसाळ यांनी दोन्ही युवकांची ओळख विचारली व ओळखपत्राची मागणी केली. स्वराज रिकव्हरी एन्टरप्राईजेसकडून आल्याचं दोघे सांगत होते ; पण दोघांकडेही बजाजचं किंवा स्वराज्यचं ओळखपत्र नव्हतं. इतक्या रात्री लोकांच्या घरी जाऊन दमदाटी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असं विचारल्यावरही ते उत्तर देऊ शकले नाहीत. शेवटी त्या दोघांना कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आलं.
कोळसेवाडी पोलिसांचा कडक पवित्रा
पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक डी. एन. पवार यांनी दोघांकडे आधी ओळखपत्रासाठी विचारणा केली. ओळखपत्र नाही म्हटल्यावर पवार संतापले आणि त्यांनी दोघांना चांगलंच धारेवर धरलं. एखाददुसऱ्या थकलेल्या हप्त्याच्या वसुलीसाठी रिक्षाचालकांना, त्यांच्या कुटुंबियांना नियमबाह्य पद्धतीने त्रास देण्याचा, शिवीगाळ, दमदाटी करण्याचा, सतावण्याचा प्रकार खपवून घेणार नाही, असा सज्जड दम पवार यांनी दिला.
इथेही माणुसकी दिसली !
दोघांपैकी रवी गुप्ता नावाचा युवक एमबीए झालेला होता. नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी त्याला रात्री दहाच्या गाडीने गुजरातला जायचं होतं. त्याने तिकीटही दाखवलं व झाल्या प्रकाराबाबत माफी मागून जाऊ देण्याची विनंती केली. त्यावर त्याचं करीअर खराब होऊ नये, असा विचार करून आशा रसाळ व त्यांच्या सोबतच्या शिवसैनिकांनी त्यास जाऊ देण्याची विनंती केली व पोलिसांमार्फत स्वराजच्या मालकाला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले.
ओळखपत्राशिवाय कोणी जर वसुलीसाठी आलं तर सरळ खंडणीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा पोलिसांनी त्याला दिला. कर्जवसुलीची कायदेशीर प्रक्रियाच पार पाडून या, दमदाटीचे प्रकार आमच्या हद्दीत चालणार नाहीत, असं पोलिस उपनिरीक्षक पवार यांनी बजावलं.
आशा रसाळ यांनी आवाहन केलंय की फायनांन्स कंपन्यांकडून जर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना फोन काॕल्सवर वा प्रत्यक्षात शिवीगाळ करत असतील किंवा पूर्वसूचना / नोटीस न देता तुम्हाला रस्त्यात अडवत असतील वा रात्री अपरात्री तुमच्या घरी येत असतील तर सरळ पोलिसात तक्रार करा. सोबत 8422999975 या क्रमांकावर मला संपर्क करा. शिवसेना तुमच्या सोबत आहे.