आजच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी संघाला थेट अंगावर घेतलं. इतरवेळी उद्धव ठाकरे भागवत यांना आमचे मोहनराव भागवत म्हणत. आज मात्र त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचीही पिसं काढली. पाणी डोक्यावरून गेलं म्हणून ही उशिरा भूमिका घेतली, या सर्वांना त्यांनी विकृत म्हटलं !
त्यांनी जो काश्मीर पंडितांचा मुद्दा मांडला तोही महत्वाचा होता. ज्याची गोळ्या घालून हत्या केली, तो राहुल भट (सरकारी अधिकारी) 'माझी बदली करा, माझ्या जीवाला धोका आहे', म्हणत होता, मात्र त्याला संरक्षण दिले गेले नाही. दुसरीकडे राज्य सरकारच्या विरोधात आणि समाजात असंतोष दुफळी माजवणाऱ्या लोकांना मात्र केंद्र सरकार जनतेच्या पैशातून संरक्षण यंत्रणा झेड प्लस वाय झेड वगैरे पुरवते..
काश्मीर फाईल बनवून त्यावर भाजप आणि देशातील सरकारी (प्रधानमंत्री) यंत्रणा राबवून करोडो छापणारे लोक आज काश्मिरी पंडितांच्या हत्येवर मूग गिळून गप्प आहेत. हीच हत्या जर महाराष्ट्रात झाली असती तर देशभरात हिंदू ,पंडित खतरे में आला असता. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या धडपडी सुरू झाल्या असत्या. अक्षरश: नंगा नाच सुरू झाला असता !

पण हत्या झालीय भाजपच्या राज्यात ! भले राष्ट्रपती राजवट आहे. नियंत्रण सरकारचेच, निर्णय यंत्रणा सरकार म्हणून भाजपच राबवणार आहे. 370 कलम सुद्धा हटवलं त्याचं यांनी क्रेडिटसुद्धा ओरपलं, परंतु गेल्या तीन महिन्यात म्हणजे काश्मिर फाईल चित्रपट प्रदर्शित होऊन त्यानंतर मागे पुढे 27 काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या, असं संजय राऊत भाषणात म्हणलेत. यावरून काश्मिरी पंडितांच्या टाळूवरील लोणी खाणारे कोण हे लक्षात येत आहे. त्यांच्या अन्याय अत्याचारांचे भांडवल केवळ राजकीय फायद्यासाठी उपटणे सुरू होते हे आता स्पष्ट झालंय.
लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजप केवळ लोकांचा वापर करून घेत असते. प्रत्यक्षात चित्र असं आहे.
मिलिंद धुमाळे
संपादक, जागल्या भारत