ओळख जी काही क्षणांपूर्वी अनोळखी होती !

ओळख जी काही क्षणांपूर्वी अनोळखी होती !

ओळख जी काही क्षणांपूर्वी अनोळखी होती !

मॉर्निंगवॉक करता करता मागून धावत धावत एक मध्यम वयाची स्त्री गोड आवाजात माझ्याकडे बघून, हसत मला हाय म्हणाली. तिला धाप लागली होती. तरीही तिचं बोलणं थांबत नव्हतं. खूप फास्ट चालता तुम्ही. माझी दमछाक झाली. मग मी सुध्दा तिला हॅलो केलं.

नेहमीच आम्ही मॉर्निंगवॉकच्या वेळी एकमेकींना पाहत होतो. पण बोलणं तर दूर, कधी एकमेकींना स्माईलसुध्दा दिलं नव्हतं. फक्त आम्ही एकावेळीच चालायला बाहेर पडतो, त्यामुळे एकमेकींना नेहमीच पाहू शकतो. बस्स इतकंच काय ते नातं...!

 

आज एकदम ती माझ्याकडे धावत येऊन चक्क हाय म्हणाली. मला पण छान वाटलं. अनोळखी म्हणावी की ओळखीची ? प्रश्न होता. खूप ओळखीची म्हणावी तर तिच्या बद्दल मला काहीच माहिती नव्हती. पण खूप अनोळखी म्हणावी तर मी तिला नेहमीच पाहते...या वेळेत इथेच !

'खूप दिवसांपासून मला तुमच्याशी बोलायचं होतं. पण धीरच होत नव्हता.' असं ती बोलायला लागली. मला कळेचना, हिला नेमकं काय बोलायचं आहे आपल्याशी जे खूप दिवस तिने मनात ठेवलं आहे आणि ते बोलण्यासाठी अगदी धीर वगैरे आणावा लागतोय? इतकी तर मी भयावह नाही की माझ्याशी बोलायला तिला खूप दिवस द्यावे लागतील आणि खूप धीर आणावा लागेल.

 

बोला ना, काय म्हणता? पुढे मी बोलायला सुरुवात केली. तिलाही थोडं बरं वाटलं. ती खुलून गेली. थोडी मोकळी झाली. माझ्याशी बोलू लागली.

अनेक वर्षे मी तुम्हाला इथे भटकंती करताना पाहते. कधी शांत तर कधी मिस्टरांशी गप्पा मारता मारता तुमचं चालणं चालू असतं. तुमचा नेमस्तपणा आवडतो मला. प्रेरणा मिळते त्यातून मला. मग खूप घरगुती गप्पा झाल्या.

आपल्याही नकळत आपण कोणाला तरी प्रेरणा देतोय हे ऐकून मलाही खूप मस्त वाटलं. जवळ जवळ एक तास आमच्या दोघींच्या छान गप्पा रंगल्या. घर कधी जवळ आलं ते कळलंही नाही.

आता आम्ही एकमेकींसाठी अनोळखी नव्हतो. आम्ही एव्हाना बरीच माहिती एकमेकींबद्दल गोळा केली होती. खूप जुनं नात आहे आणि खूप दिवसांनी भेटत आहोत असं वाटत होतं. जणू काही इतक्या वर्षांची कसर आम्ही भरून काढत होतो.

 

एक छान नवी मैत्रीण मला तिच्या रुपात मिळाली. आता आम्ही भेटलो की गप्पांचा फड रंगतोच‌ रंगतो. जाणता अजाणता आम्ही एकमेकींशी घट्ट मैत्रीच्या नात्याने बांधले गेलो आहोत. कदाचित तिने थोडंसं धाडस केलंच नसतं तर आमची अशी गट्टी जमलीच नसती. रोज एकमेकींना पाहूनही अनोळखीच राहिलो असतो एकमेकींसाठी.

बऱ्याचदा आपण एकमेकांना बघतो, भेटतो. पण बोलणं तर दूरच साधी स्माईल सुध्दा देत नाही. एक नातं तयार होता होता लगेचच संपुष्टात येतं. अनोळखी कधी ओळखीचे होऊन जातात ते कळतही नाही. माझ्या आयुष्यात एक नवीन ओळख फुलली. मनापासून धन्यवाद सखे तुझ्या अनोख्या अंदाजाला...!!

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

 

 


 

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!