लेखक / छायाचित्रकार सुहास मळेकर यांची फेसबुक पोस्ट वाचनात आली आणि कोकीळ-कोकिळेच्या अजब पालकत्वाची माहिती कुतुहलाने नव्याने चाळली.
कोकीळ हा पक्षीवर्गातील क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी कुलामधील पक्षी. या कुलात १२५ हून अधिक जाती आहेत. हे पक्षी जगात सर्वत्र आढळतात. भारतात कोकिळ सर्वत्र आढळतो. हिमालयात तो आढळत नाही, परंतु त्याच्या पायथ्याच्या टेकड्यांत काही वेळा दृष्टीस पडतो. भारतात आढळणार्या कोकिळ पक्ष्याचे शास्त्रीय नाव युडिनॅमिस स्कोलोपेशियस आहे. हा वृक्षावासी पक्षी झाडांची दाट राई, गर्द पालवी असणारी मोठी झाडे, बागा इ. ठिकाणी राहतो.
छायाचित्र : सुहास मळेकर
मार्च ते ऑगस्ट हा कालावधी कोकिळ पक्ष्यांचा विणीचा हंगाम असून तो कावळ्यांच्या विणीच्या हंगामाशी जुळणारा आहे. या काळात नर कोकिळ कुऽऽऊ, कुऽऽऊ अशी साद घालतो. कोकिळेचा आवाज नरापेक्षा वेगळा असतो, ती बुड, बुड, बुड असा आवाज काढते किंवा एका झाडावरून दुसर्या उडत जाताना झाडावर किक्, किक्, किक् असे सूर काढते.
कोकिळ पक्ष्यांच्या जवळपास ५० जातींमध्ये वीण परजीविता दिसून येते. हे पक्षी कधीही घरटे बांधत नाहीत. आश्रयी पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालून ते पिलांची वाढ करतात. यासाठी त्यांनी विविध लक्षणीय युक्त्या विकसित केलेल्या आहेत.
कावळा हा कोकिळ पक्ष्याचा आश्रयी आहे. कोकिळा आपली अंडी बहुधा कावळ्यांच्या घरट्यात घालते. कावळ्यासारख्या हुशार पक्ष्यांवर बुद्धिचातुर्याने मात करताना कोकिळ सोपी क्लृप्ती लढवतो. कोकिळा कावळ्याच्या घरट्याजवळ लपून बसते आणि कोकिळ घरट्याजवळ येतो, मोठ्याने शीळ घालतो, कावळ्याला स्वत:चा पाठलाग करायला लावतो आणि हुलकावण्या दाखवीत तो कावळ्याला घरट्यापासून दूर नेतो.
छायाचित्र : सुहास मळेकर
मधल्या काळात कोकिळा शिताफीने घरट्यात शिरून अंडे घालते आणि त्याचवेळेस कावळ्याचे एक अंडे बाहेर फेकते. अशा प्रकारे कावळ्यांच्या कित्येक घरट्यांत ती अंडी घालते. साधारणपणे कावळ्याच्या एका घरट्यात ती एक किंवा दोन अंडी घालते.
कोकिळेची शरीररचना अशी असते की तिच्याहून आकाराने लहान असलेल्या आश्रयी पक्ष्यांच्या ढोलीत व कपारीत लपलेल्या घरट्यांत ती अंडी घालू शकते. कोकिळेच्या अंड्याचे कवच जाड असते. काही जातीच्या कोकिळांची अंडी दुहेरी आवरणांची असतात. त्यामुळे आश्रयी पक्ष्याच्या घरट्यात अंडी घालत असताना अंडी फुटण्याची शक्यता कमी होते. कोकिळेचे अंडे आश्रयी पक्ष्याच्या अंड्याच्या आकारमानाचे आणि रंगाचे असते.
छायाचित्र : सुहास मळेकर
कोकिळेच्या दोन जातींची पिले जवळजवळ कावळ्यासारख्या आश्रयी पक्ष्यांच्या पिलांसारखी दिसतात. कोकिळेचे नर पिल्लू काळ्या रंगाचे असते, मादी पिल्लूदेखील प्रौढ कोकिळेपेक्षा जास्त गहिर्या रंगाचे जवळजवळ काळे असते. आश्रयी कावळयांसारखे पक्षी आपल्या पिलांबरोबरच कोकिळेच्या पिलांचेही लालन-पालन करतात. मात्र, पिलांमधील फरक लक्षात आला तर ते कोकिळेच्या पिलांना हुसकावून लावतात.
अशी माहिती आपणांस मराठी विश्वकोशात वाचायला मिळते. पण सुहास मळेकर यांचं छायाचित्रे टिपतानाचं निरीक्षण वेगळं आहे.
ते म्हणतात,
कोकीळ कावळीच्या घरट्यात अंडी घालते आणि वेडी कावळी ती उबवेल म्हणून निश्चिंत होऊन वाट पहात राहाते.
आपण म्हणतो कावळीला बिचारीला कळत नाही यातील काही अंडी कोकीळेची आहेत आणि नंतर पिल्लंही तशीच दिसतात म्हणून ! सर्वात हुशार आणि चाणाक्ष पक्षी कावळा... त्यामुळे कावळीला कळत नाही हे पटत नाही. कावळीआईला समजत असणार पण समजलं तरी ती अंडी फोडून फेकून देईल का?
छायाचित्र : सुहास मळेकर
पिल्लं बाहेर पडून मोठी झाल्यावर,
"जा गं बाई तुझी पिल्लं घेऊन...मोठी झाली आता"
असे ती या कब-या कोकिळेला म्हणत असेल.
आपण उगीच कावळीला वेडी समजतो.
आई आहे ती, लोकांना वेडे समजत असेल !