वेळ म्हणजे आयुष्याच्या क्षणाक्षणाचा हिशोब !

वेळ म्हणजे आयुष्याच्या क्षणाक्षणाचा हिशोब !

वेळ म्हणजे आयुष्याच्या क्षणाक्षणाचा हिशोब !

वेळच नाही हो ! ही सबब सांगून आपण बऱ्याच गोष्टी टाळतो. दिवसाचे चोवीस तास असतात .ते सर्वांना सारखेच; मग काही व्यक्ती मात्र सतत कार्यमग्न दिसतात आणि काहींना वेळच वेळ असतो, असं कसं?

वेळ म्हणजे दिवसाच्या क्षणाक्षणाचा हिशोब आणि मानलं तर वेळ म्हणजे आपल्या आयुष्यातला बरा किंवा वाईट काळ. एखादी व्यक्ती सुखात असेल तर आपण म्हणतो त्याची वेळ चांगली आहे आणि एखादे संकट आले की, म्हणतो त्याची वेळ चांगली नव्हती. पण काहीही म्हणा, योग्य वेळ खरं तर आपण गाठायची असते.

वेळ कोणासाठीही थांबत नाही . तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता ?यावरच तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. जरा विचार करा ,जर वेळेची वाट शिवराय पहात बसले असते तर, इतक्या लहान वयात एका यशस्वी राज्यकर्त्याचे कसब त्यांनी कसे अवगत केले असते ?वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत आपण फक्त दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा शिक्का मिळवतो. पण त्याच वयात ज्ञानेश्वरांनी व शिवरायांनी जे मिळवलं ते किती असामान्य होतं!!! हे सर्व त्यांच्या अचूक वेळेच्या नियोजनातून, श्रमातून व पराकाष्ठेच्या प्रयत्नातून साध्य झाले आहे. मिळालेल्या क्षण अन क्षणाचे त्यांनी सोनं केलं हेच खरं!...

सह्याद्रीच्या पर्वतराजीत दिमाखात उभे असलेले साडेतीनशेच्यावर गड किल्ले ,आरमार दल, सागरी किल्ले पाहिले की आपण अचंबित होतो ! इतक्या कमी वेळात केवढं मोठं साम्राज्य उभं केलं महाराजांनी !

उद्याची वाट न बघता हातात असलेली वेळ, तोच क्षण साधून त्याला कृतीची जोड दिली की, अपयश आपल्या जवळ सुद्धा फिरकत नाही याची खात्री बाळगा.

कोणतेही काम मी यावेळी करू की नंतर करू? असा प्रश्न पडत असेल तर आपले एक मन नेहमी सांगते कि,' प्रत्येक काम वेळेवर कर. मिळालेल्या संधीचे सोनं कर.' आणि आपला आळस मात्र सांगतो कि,' करू नंतर फार काही बिघडणार नाही.' पण आपण आपल्या सोयीचे सांगणाऱ्या आळशी मनाचे न ऐकता, आपल्या मनाचा आतला आवाज च ऐकला पाहिजे . बरेचदा आपलं अंतर्मन च आपल्याला योग्य सूचना देत असतं .

जीवनात आनंदी व यशस्वी व्हायचं असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं ठरतं .इंग्रजीत एक म्हण आहे ," stitch in time ,saves nine." म्हणजेच योग्यवेळी जर एक टाका घातला ,तर पुढचे नऊ टाके घालण्याचे काम वाचते , नुकसान टळते .खरोखर किती मोठा अर्थ आहे यात! मग हा वेळेवर घालण्याचा टाका कपड्याची उसवलेली शिवण दुरुस्त करतोच पण दुसर्‍या अर्थाने एखाद्या व्यक्‍तीच्या मनाची जखम ही दुरुस्त करू शकतो .फक्त 'वेळ 'तेवढी साधली गेली पाहिजे म्हणजे 'नाते 'ही सांधले जाऊ शकते'.

बरेचदा आपण आपल्या अनेक नात्यांमध्ये आलेली दरी वेळेवर न बोलण्यामुळे किंवा वेळकाढूपणामुळे ओलांडतच नाही. वेळीच मायेची हाक दिली तर आपली माणसं दुरावत नाहीत दुसऱ्यांनी हाक मारण्याची वाट पहात आपण आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया तर घालवत नाही ना? हेही जरूर पाहिलं पाहिजे .

आपण आपल्या जीवनात आपल्याकडे खूप वेळ पडला आहे ,या भ्रमात जगतं असतो. विचार करा पैसे आपण अधिकाधिक कमवू शकतो .ते तिजोरीत बँकेत साठवून हवे तेंव्हा वापरू शकतो. वेळ आपल्याला फुकट जरी मिळत असला तरीही तो खूप अमुल्य आहे. तो साठवता येत नाही व परत पुन्हा फिरून अनुभवता हि येत नाही. वर्तमानात जगणं च आपल्या हातात असतं .

पुढच्या क्षणाला कोणासोबत काय होईल हे कोणी ज्योतिषी सुद्धा अचूक सांगू शकत नाही .म्हणून भविष्याची चिंता न करता योग्य नियोजनाद्वारे आपल्या आयुष्याचे क्षण भरभरून जगावे. वेळेवर झोपणे, उठणे ,व्यायाम व आहार यांचे नियोजन केले पाहिजे. कुटुंबात घर ,शाळा ,ऑफिसची सर्वांनी आपापली जबाबदारी व कामे वेळेवर पार पाडणं महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यातील आपलं ध्येयं ठरवून त्यासाठी वेळेवर मेहनत आतापासूनच केली पाहिजे .

आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर वेळेचं योग्य नियोजन करून कार्य केलं ,तर यशाचा वाटा मिळतोच. ध्येयपूर्तीही होतेच .यामुळे जीवनात जे 'समाधान' मिळतं त्याला कशाचीही सर नाही.

 

 

 

लीना तांबे

leena.adhalrao.tambe@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!