इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी ट्वीट करून एक धक्कादायक माहिती दिली आहे. अर्थात ही धक्कादायक माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी आहे. राजकारणाची ज्यांना पुरेशी समज आहे त्यांच्यासाठी ही माहिती अपेक्षित अशीच आहे.
सुर्यवंशी यांनी लिहिलंय : उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार ब्रिज भूषण यांनी असं सांगितलं की त्यांनी राज ठाकरे यांच्या आयोध्या भेटीला केलेला विरोध भाजपाच्या सुचनेवरूनच केलेला होता. मी पक्षाचंच काम करतोय असं ब्रिजभुषण बोलताना एका विडिओत ऐकूही येतात.
राज ठाकरे यांनी पुण्यातील भाषणात ही शक्यता अप्रत्यक्षपणे बोलूनही दाखवली होती, परंतु भारतीय जनता पार्टीवर थेट हल्ला चढवणं त्यांनी टाळलं होतं. उलट ब्रिजभूषण सिंग यांचा शरद पवारांसोबतचा चार वर्षांपूर्वीचा फोटो प्रसारित करून सापळ्याचा आरोप पवारांवर ढकलून मनसे अजूनही भाजपाला झुकतं माप देण्याचा खटाटोप करताना दिसतेय.
उत्तरप्रदेशातून बघून घेण्याची उघड भाषा आणि मराठी लोकांना शरयू नदीत फेकून देण्याची चिथावणीखोर धमकी दिली गेल्यानंतरही मनसेकडून साधी पोलिस तक्रारही झाली नाही. रोखठोक बोलणारा वक्ता अशी ओळख असलेल्या राज ठाकरेंनी भाजपा आपल्याला सापळ्यात अडकवू पाहतेय, हे स्पष्ट झाल्यानंतरही त्यावर स्पष्ट मत व्यक्त करायचं का टाळलं, हे केवळ तेच सांगू शकतात !
भारतीय जनता पार्टीने आधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसविरोधात राज्याराज्यात प्रादेशिक पक्षांना बळ देणारं राजकारण केलं. राष्ट्रीय राजकारणातून काॅंग्रेस पार कमजोर करून टाकल्यावर भाजपाने प्रादेशिक पक्षांना लक्ष्य केलं. भाजपाच्या सत्ताकांक्षी भस्मासूरी राजकारणातून भाजपाचा एकमेव हिंदुत्ववादी मित्रपक्ष शिवसेनाही सुटली नाही. गल्लोगल्लीतली मंडळं, संस्था अगदी वाॅटस्एप ग्रुप्समध्येही तेढ निर्माण करून 'फोडाझोडा' राजकारणाचा मार्ग भाजपा देशभर खुलेआम वापरत आहे.
भाजपाने महाराष्ट्रातलं राजकारण कायम शिवसेनेला क्रमांक एकचा शत्रू मानून केलं ही गोष्ट त्या पक्षांतर्गत नेत्यांना ज्ञात आहे. त्यामुळे मोदीशहा आल्यानंतर युतीतील संबंध बिघडले, यात तथ्य नाही. युतीमागे राजकारणातील शिवसेनेची २५ वर्षे बरबाद झाली, हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य वस्तुस्थितीला धरूनच आहे. ही वस्तुस्थिती इतकी वर्षं शिवसेना नेता म्हणून वावरलेल्या राज ठाकरेंना माहित नसेल का ?

भाजपाला युती तुटल्याचं दु:ख नाहीये. पण युती तुटूनही शिवसेनेचं सत्तेत येणं आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं भाजपाच्या जिव्हारी लागलंय.
महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाने जंगजंग पछाडले. केंद्रीय यंत्रणांचा निर्लज्ज वापर केला. महाराष्ट्रात जातीयधार्मिक विद्वेष पेटवण्यासाठी कुरघोड्या केल्या. पण यश न आल्याने भाजपाची चीडचीड वाढलीय. आता मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण भाजपा करू पाहतेय. त्यासाठी मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवली गेलीय. भाजपासोबत युती करून मनसेला तात्पुरती संजीवनी मिळेल पण भाजपाचं राजकारण घातकी आहे, हेही राज ठाकरे जाणून आहेत. पण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राज ठाकरेंच्या डोळ्यासमोर आहे.

महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यातही मुंबई महानगर पालिकेतील राजकारण म्हटलं तर मराठी माणूस हा त्याचा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे. पण मुंबईसारखी महाराष्ट्रात जिथे जिथे शहरं, महानगरं आहेत तिथे तिथे भारतीय जनता पार्टी मराठी भाषिकांचं राजकीय प्रतिनिधित्व करते हे सर्वश्रुत आहे.
महाराष्ट्रातल्या कुठल्याही छोट्यामोठ्या शहरांमधल्या राजकारणात भारतीय जनता पार्टीचे निर्वाचित लोकप्रतिनिधी पाहिले किंवा पदाधिकारी पाहिले तर ते सहज लक्षात येतं ; त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं भस्मासुरी राजकारण मुंबई किंवा महाराष्ट्रात वाढणं हे मराठी भाषिकांच्या हिताचं नाही हे राज ठाकरे यांच्यासारखा अनुभवी नेता चांगलेच ओळखून आहेत ; तरीही राजकीय स्वार्थासाठी ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत असं सध्यातरी लोकांसमोरचं चित्र आहे.
त्यांची मराठी अस्मितेवरून अचानक बदललेली हिंदुत्वाची भूमिका, पक्षध्वज, आकस्मिक अतार्किकरित्या घेतलेला भोंग्यांचा विषय हा असाच संशयास्पद ठरला होता. महाराष्ट्रात राजकारण करताना मारुती स्तोत्रही त्यांना घेता आलं असतं, पण हनुमान चालीसा पठनाचा मार्ग हा त्यांच्यावरचा भाजपा पुरस्कृत राजकारण करत असल्याचा किंवा भाजपाच्या दबावाखाली असल्याचा संशय अधिक गडद करणारा ठरला.

त्यातच हनुमान चालीसाचं राजकारण भारतीय जनता पार्टीने राणा दाम्पत्याच्या नौटंकीतून आपल्या कब्जात ठेवण्याचा प्रयत्न केला. भाजपा समर्थकांनी आगीत तेल ओतत मनसेला महाविकास आघाडीशी आणि त्यातही प्रामुख्याने शिवसेनेशी भिडवण्याचा सातत्याने खटाटोप केला. पण मनसेतूनही आश्चर्यकारक समंजसपणा दाखवला गेला. तो महाराष्ट्रहिताचा ठरला.
बाहेरच्या राज्यांतून अनेक 'भक्त' महाराष्ट्रात येवून पोचले होते आणि ते मनसेच्या गर्दीत मिसळून आपलं 'काम' दाखवणार होते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तशी चर्चा होती. त्यामुळे मनसेही बहुतेक सावध होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा करण्याचा राणा दाम्पत्याचा आटापिटा राज ठाकरेंनाही पचनी पडलेला दिसला नाही हे त्यांच्या पुण्यातील भाषणातून स्पष्ट झाले. त्या भाषणात राज ठाकरेंनी कितीतरी असे संकेत दिले जे भारतीय जनता पार्टी त्यांच्याविरोधात करत असलेल्या कटकारस्थानांकडे अंगुलीनिर्देश करणारे होते ; मात्र तरीही उसनं अवसान आणून ते पुण्यातल्या सभेत महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेंना झोडत राहिले.

मनसेचं राजकारण सध्याच्या टप्प्यावर तरी गोंधळलेलं आणि कोंडीत सापडलेलं असल्याचं चित्र आहे. भाजपासोबत जावं तर महाराष्ट्र पणाला लागतो आणि न जावं तर पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो.
खरं तर थोडा संयम राखून राज ठाकरेंनी स्थापनेवेळचा पॅटर्न सुरू ठेवायला हवा होता. मंत्रालय स्तरावरची पक्षीय रचना, समांतर सरकारसारखे मार्ग सोडायला नको होते. गेल्या तीन वर्षात तर जनतेच्या प्रश्नावर रान उठवून महाविकास आघाडीविरोधातील प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभारून येण्याची, भाजपाची जागा बळकावण्याची मनसेला संधी होती. पण अपयशाने निराश होऊन मनसेने आपला रंगच बदलला. मराठी अस्मितेच्या राजकारणाची जागा रिकामी असताना भरकटून हिंदुत्वाकडे जाण्याचा आत्मघातकी मार्ग मनसेने का पत्करला असावा, हे एक कोडंच आहे.

दहा वर्षे झाली मनसेला महिला अध्यक्ष नाही. सामाजिक न्यायाबाबतची राज ठाकरेंची मतं ढोबळ आणि बऱ्याचदा कातडीबचाऊ असतात. शाहु, फुले, आंबेडकर, आगरकर, प्रबोधनकारांचा महाराष्ट्र ही संकल्पनाच अजून राज ठाकरेंनी मनापासून स्वीकारलेली दिसत नाही.
चित्र, रेषा, कला, साहित्य, नाटक, सिनेमा, संगीताची जाण असलेला, प्रभावी वक्ता असलेला नेता पण मराठी भाषा दिनासाठी असो की इतर प्रयोजनासाठी कार्यकर्त्यांना मराठी संवर्धनाचा कल्पक कार्यक्रम राज ठाकरे आजवर देऊ शकलेले नाहीत.
वाॅटस्एप, फेसबुक चाळून पाहा, कार्यकर्त्यासोबतच्या फोटोत राज ठाकरे फार अभावाने हसताना सापडतात. या गोष्टी लहान असल्या तरी महत्त्वाच्या आहेत.

राज ठाकरेंना महाराष्ट्राने अगदीच संधी दिली नाही, असंही नाही. पण मिळालेलं यश त्यांना राखता आलेलं नाही. राज ठाकरेंकडे ते 'ठाकरे' असल्याचा एक वैयक्तिक अहंकार आहे. तो 'ग्लॅमर' देणारा असला तरी त्यानेही मनसेचं मोठं नुकसान केलंय. मनसेच्या राजकीय घसरणीला प्रामुख्याने राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांमधली दरी कारणीभूत आहे, हे त्यांना ऐकवायची हिंमत कोणीतरी करायला हवी.
अर्थात, राजकारण कसं करावं, कोणत्या दिशेने करावं हा अर्थातच मनसे आणि राज ठाकरे यांचा अंतर्गत मामला आहे ; परंतु तरीही ते जे काही करतील ते कळतनकळत महाराष्ट्रहिताच्या विरोधातलं असू नये एवढी अपेक्षा आपण त्यांच्याकडून करायला काहीच हरकत नाही.
जां निस्सार अख्तर यांचा एक शेर इथे मांडावासा वाटतो,
ये क्या है के बढते चलो, बढते चलो आगे
जब बैठके सोचेंगे तो कुछ बात बनेगी !
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com