कोविड रुग्णालयातले ” ते ” दिवस ! भीतीवर सकारात्मकतेची मात !

कोविड रुग्णालयातले ” ते ” दिवस ! भीतीवर सकारात्मकतेची मात !

कोविड रुग्णालयातले ” ते ” दिवस ! भीतीवर सकारात्मकतेची मात !

लाॅकडाऊनमुळे कामगार वर्गाचे अतोनात हाल झाले…उपासमार झाली. पण आपण समाजाचं देणं लागतो ह्या तत्वानं सामाजिक कार्यकर्ते संजय अभ्यंकर आणि अस्मिता अभ्यंकर यांनी रेशन किट्स गरजूंना वाटण्यास सुरूवात केली. ते काम करताना आवश्यक काळजी घेऊनही कोरोनाने त्यांना गाठलंच. पण स्वत:ला जराही विचलित होऊ न देता दोघेही कोविडबाधेला सामोरे गेले. सरकारी उपचारांवर विश्वास ठेवला. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी उपचार कालावधी पार पाडला आणि ते दोघेही सुखरूप घरी परतले. त्याला दोन आठवडे उलटून गेलेत ; पण त्यांनी लोकांसमोर आणलेला स्वानुभव सद्याच्या निराशेच्या काळात उर्जा देणारा आहे.

कोरोना आजाराची लक्षणं जेव्हा जाणवू लागली त्या क्षणापासून आम्ही एक काळजी जबाबदारीने घेतली, ती ही की आम्ही त्या काळात इतरांशी संपर्कच बंद केला. कोविडची लक्षणं आणि कोविड चाचणीचा निकाल यात जवळ-जवळ सहासात दिवस गेलेत आणि हा काळ आमच्या करीता खरंच एखाद्या युद्धा सारखा गेला.

दोघांनाही ताप असायचा. सरांना तर जरा जास्तच ताप असायचा…मी तापात असतांनाच दोन्ही वेळचा स्वयंपाक एकदाच करून पडून राहायची. झोप येत नव्हती रात्री बेरात्री काढा करायचा तो प्यायचा सपाटा लावला….रात्रीचीही झोप येत नव्हती. (माझ्या लहान दिराला एकदाच घरातील आवश्यक गोष्टीची मागणी फोनवरच सांगून ती दारात अडकवायला सांगितली.)

दरम्यान औषधांकरिता , डाॅक्टरांकडे फेरी आणि कोविड चाचणीकरिता इमारतीतून ये – जा करतांना इमारतीच्या कोणत्याही भागाला आमचा स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घेतली. केवळ पायातील पादत्राणेच इमारतीच्या पायऱ्यांना लागली असतील तितकीच ! घरी परतल्यानंतर भरपूर प्रमाणात सॅनिटाईझर पादत्राणं आणि तत्सम जागांवर मारायचो !

आणि अखेर आमची शंका खरी ठरली…आम्ही कोविडबाधित आहोत हे समजलं. पायाखालची वाळू सरकली…जराही विचलित न होता मी स्वयंपाक करायला घेतला. सरांनी घरातील एक दोघांनाच ही बातमी सांगितली. कुणालाही सांगू नये असं बजावलं. आम्ही जेवण घेतलं. महानगर पालिकेतून आयुक्त समीर ऊन्हाळे सरांनी आमच्याशी संपर्क केला. त्यांनी आम्हाला धीर दिला…आणि कुणालाही न भेटताच आम्ही उपचारांसाठी रवाना झालो.

उल्हासनगर- ४ च्या कोविड रूग्णालयात आम्ही दोघे दाखल झालो. तिथे सुरुवातीलाच रुग्णांच्या..काही प्राथमिक चाचण्या व्हायच्या. त्यात जो अत्यवस्थ असायचा, त्याला ताबडतोब आयसीयूत दाखल केलं जायचं. आमची प्राणवायूची पातळी योग्य होती. परिणामी आम्हाला सामान्य वार्डात दाखलं केलं गेलं. तो वार्ड सामान्य नव्हताच. उत्तम सोय होती. प्रत्येक बेडजवळ प्राणवायूची व्यवस्था.. एसी सुद्धा होता.

जेवणाची सुविधा होती. सकाळी न्याहरीत उकडलेली अंडीही असायची. दुपारचं जेवण सायंकाळी चार-पाच वाजता. पुन्हा फलोपहार, चहा, रात्रीचे जेवण, बिसलरीचं पॅकबंद पाणी आणि हवी तेवढी बिस्कीटं ! परिचारिका, डाॅक्टर खूप काळजीपूर्वक विचारपूस करायचे. जेवण झालं का ? चहा घेतला का? औषधं घेतली का?

एका रूग्णाने काही न खाता औषध घेतलं. तिला त्रास व्हायला लागला…परिचारिकेच्या लक्षात येताच तिला सलाईन लावलं. तरीही तिला नीट बसता येत नव्हतं, तेव्हा तिन एक छोटं सलाईन पिण्यास दिलं. इतकी काळजी घेतली जात होती. रात्री अगदी बारा वाजताही डाॅक्टर रुग्णांजवळ येऊन काळजीपूर्वक तपासणी करत होते. प्राणवायू सुरू आहे की नाही…रुग्णांची स्थिती कशी आहे ? ताप असेल ताबडतोब औषध दिलं जायचं.

मी रात्री बेडवर बसून होते. डाॅक्टरांनी विचारपूस केली. ताप पाहिला. घशाचा त्रास सांगितला. ताबडतोब औषध दिलं. ते घेताच आराम पडायला सुरूवात झाली.

एका गरोदर स्त्रीला रा्त्री त्रास व्हायला लागला. रात्री दोन वाजता तिला रुग्णवाहिकेतून ठाण्याला पाठवलं…एका वृद्धाला डाक्टरांनी तपासलं… डाॅक्टरांनी त्याला ताबडतोब आयसीयूत पाठवलं. त्याचं सर्व सामान कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक खाली नेलं. इतकी सुरेख व्यवस्था आणि काळजी घेतली जात होती. स्वच्छताही होती. एक दिवस तर वार्डातील सगळे पंखे पुसून काढले गेले. स्वच्छता टापटीपपणा पाळण्यासाठी रुग्णांना विनंती केली जायची.

अगदी पहिल्या दिवशी एकमेकांच्या काळजीपोटी दोघांनाही झोप येत नव्हती. अभ्यंकर सरांना १०२ पर्यंत ताप असायचा. माझा संपूर्ण घसा जणू ओरखडल्यागत झाला होता. भयंकर वेदना व्हायच्या ! डोक्यात वेदना..थकवा…पायात वेदना ! ती अवस्था भयंकरच होती. पाण्याच्या घोटासोबत घास ढकलावा लागायचा…जेवण जात नव्हतं. घरी अंगात ताप असतांनाच सुक्यामेव्याचे लाडू केले होते. मग तो खायचो…कारण सकाळ आणि संध्याकाळ मिळून जवळजवळ १८/१९ गोळ्या आणि जोडीला दोन्ही वेळेस इंजेक्शन्सचाही सामना करायचा होता. …

परिचितांचे फोन यायचे. विचारपूस व्हायची मात्र आम्ही प्रत्येकाला हेच सांगायचो की आम्ही
विलगीकरण कक्षात आहोत. जेवण आणू का, असंही विचारलं जायचं. मात्र आम्ही स्पष्ट नकार दिला. आमच्यामुळे आजाराचा संसर्ग कुणालाही होऊ द्यायचा नव्हता.

हळूहळू आम्हाला बरं वाटू लागलं. अनेक रुग्ण अत्यवस्थ, थकलेले होते. काही वयस्क होते. काहींना जेवण घेण्यास जमत नव्हते. मग आम्ही जे थोडे फार बरे झालेले एकदोन रुग्ण होतो, इतरांना जेवणाचं ताट त्यांच्या बेडजवळ नेऊन द्यायचो. तोंडाला कुणाच्याच चव नव्हती… मात्र एखाद्या क्षणभराच्या का होईना, कुटुंबासारखी रूग्ण एकमेकांची काळजी घेत होते. एखादा रडायला लागला तर त्याला समजावलं जायचं ! एकमेकांना गरम पाणीही करून द्यायचो.

तिथल्या प्रत्येकाची एक स्वतंत्र कहाणी होती. कुणाच्या कुटुंबातील १५ लोक तर कुणाच्या २० लोक विलगीकरणात…तर कुणाचे वडील वरच्या वार्डात…तर कुणाचा मुलगा दुसऱ्या दवाखान्यात तर पत्नी तिसऱ्याच दवाखान्यात..! कोणताही नातेवाईक प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं. बहुतेक कुटुंबं विखुरली गेली होती. एकाची तर पत्नी मृत झाली होती. मात्र त्यांना सांगू नका, असं विलगीकरण कक्षात असलेल्या त्याच्या सुनेनं सांगितलं. त्या व्यक्तीचा मुलगाही कोरोनाबाधित.होता.‌तोही उल्हासनगरच्या कामगार हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत होता. प्रत्येकाची अशी मन खिन्न करणारी कथा होती.

आमच्या वार्डात ९०% रुग्णांना कृत्रिम प्राणवायू लावलेला होता. मात्र माझी प्राणवायूची पातळी ९९ % आणि सरांची ९८% होती.

आम्ही आजारातून सुखरूप पोहोचलो…त्याचं प्रमुख कारण सकारात्मक विचार ! त्याचबरोबर आम्ही दोघेही नियमित व्यायाम करतो. हे तर आहेच, पण उल्हासनगर महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना विसरून चालणार नाही ! सरकारला मायबाप सरकार का म्हणतात त्याचा प्रत्यय तिथे आम्हाला क्षणाक्षणाला आला. विशेष म्हणजे सरकारची ही सगळी उपचारसुविधा मोफत आहे.

जनतेनं महानगरपालिकेला सहकार्य करावं. आपण जर रुग्णाच्या संपर्कात आलो असू अथवा एकाद्या रुग्णाला माहीत असतं की गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात कोण -कोण आलं त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. स्वत:ला विलगीकरण कक्षात दाखल करून घ्यावं, कारण तिथे राहिल्यानंतर एक बाब लक्षात आली की विलिगीकरण कक्षात कोविडचाचणी होते. त्याच बरोबर तुम्हाला लक्षणं जाणवू लागली की ताबडतोब तुमच्या अवस्थेनुसार बेड उपलब्ध केला जातो.

आमची विनंती आहे की शारीरिक अंतर ठेऊन राहा…थोडीशीही लक्षणं आढळल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्या. योग्य व्यायाम, योग्य आहार आणि सकारात्मक विचार याने आपण ही कोरोनाची लढाई जिंकू !

 

अस्मिता संजय अभ्यंकर

शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या

MediaBharatNews

Related Posts
comments
  • धन्यवाद… राज सरजी…

  • leave a comment

    Create Account    Log In Your Account    Don`t copy text!