मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
प्रत्येक रुग्णांसाठी कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यायलाच हवी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
मनसे नेते अमित ठाकरे ह्यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे ह्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली व चर्चेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
करोना व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी ह्यासाठी शासनाने एक अॅप विकसित करावं, ही मनसेची एक प्रमुख मागणी अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे मांडली.
बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका ह्यांची वेतनकपात रद्द करुन त्यांचा पगार पूर्ववत करावा, प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यायलाच हवी व प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचा-यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत आणि त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा, याही मागण्या अमित ठाकरेंनी केल्या.
आरोग्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हे विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं, असं मनसेने म्हटलं आहे.