२०१४ ला राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसक आंदोलन केलं. त्यावेळी तोडफोड केल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या श्रीकांत ढगे पाटील या मनसे कार्यकर्त्याची व्यथा मांडणारी प्रतिक्रिया एका पोस्टवर वाचली. याचा विडिओ आहे का म्हणून संबंधिताला विचारलं तर झी२४तासच्या बातमीची युट्यूब लिंक मिळाली. श्रीकांतला अटक झाल्यानंतर पक्षाने कसं दुर्लक्ष केलं आणि श्रीकांतच्या कुटुंबावर कसं आर्थिक संकट कोसळलं, याची ती बातमी होती. पण आता आठ वर्षांनंतर श्रीकांतचं काय चाललंय ? मीडिया भारत न्यूज ने घेतलेला आढावा -
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ? ...हे गाणं पार्श्वभूमीवर वाजत बातमीची सुरुवात होते. तोडफोडीचा विडिओ पाहायला मिळतो. श्रीकांतला अटक झाली होती, हे आपल्याला कळतं. जामीनासाठी भरायला २५ हजार नव्हते, हे ऐकून आपल्याला वाईट वाटतं. आईचं डोरलं, बायकोचा दागिना विकून, लहान भावाने उसनवारी करून पैशाची जमवाजमव करावी लागली, हे ऐकून आपलं मन हेलावतं.
अटक झाली तेव्हा श्रीकांतचा वाढदिवस होता. तो म्हणतो, मी पाचेक दिवस आत होतो. पण माझ्यामुळे माझी आई, बायको, लहान भाऊ आणि मुलीला त्रास झाला. पक्षाच्या आंदोलनामुळे मी वाढदिवसाला तुरुंगात गेलो, पण पोलिस बरे, त्यांनी पेढा तरी भरवला, असं श्रीकांत म्हणाल्याचं बातमी सांगते, तेव्हा आपले डोळे नकळत ओले होतात.
हा विडिओ शेअर केला पाहिजे. राजकीय पक्षांच्या नादाला लागणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत श्रीकांतची व्यथा गेली पाहिजे, असं आपल्या मनात येतं..
पण...दुसऱ्या क्षणी आपण सावध होतो ! श्रीकांतचं सध्या काय चाललंय, ते आधी पाहायला हवं, असं वाटतं. त्याचं गेल्या आठ वर्षांत मनपरिवर्तन झालं असण्याची शक्यता असतेच की - नेत्यांनी डोक्यावरून हात फिरवला, गोड गोड बोलले की स्वतःला शहाणे समजणारे भले भले फशी पडतात.
श्रीकांतची फेसबुक वाॅल शोधली. केसमधून निर्दोष सुटल्याची पोस्ट दिसते. आपल्याला बरं वाटतं...पुढच्याच क्षणी राज ठाकरेंचे सध्याचे विडिओ, लाईव्ह शेअर केलेले आपल्या दृष्टीस पडतात आणि लक्षात येतं...की मागच्या घटनेतून त्याने काहीच धडा घेतलेला नसतो...भारतीय राजकारणात सगळ्याच पक्षात असे कितीतरी श्रीकांत आहेत !
मीडिया भारत न्यूज ने श्रीकांत ढगेशी थेट संपर्क सा़धला. ते आजही म्हणतात की त्यावेळी मला मनसेने मदत केली नाही, हे सत्यच आहे. पण त्याचा दोष ते स्थानिक नेतृत्वाला देतात. ' चांगल्या लोकांना पुढे येऊ दिलं जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
अटकेनंतर आपण पुरेसे सावरलो असल्याचं व आपल्या प्राॅपर्टी डिलींगच्या कामधंद्यात लक्ष वाढवल्याचं व त्यामुळे स्थिरावलो असल्याचं ढगे सांगतात. आता राजकारणात प्रत्यक्ष सक्रीय नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
तुमच्या फेसबुक वाॅलवर राज ठाकरेंचे ताजे विडिओ कसे, या प्रश्नावर ते म्हणतात की मी राज ठाकरेंचा चाहता आहे.
आम्हाला इतकंच जाणून घ्यायचं होतं की राजकारणात, राजकीय पक्षात, नेत्यांत असं काय असतं कार्यकर्त्यांच्या हिताचं की ते कितीही वाईट वागले तरी कार्यकर्ते पक्ष-नेता धरून राहतात ! असं विचारल्यावर ढगे यांनी भाष्य करण्याचं टाळलं.
श्रीकांत ढगे पाटील यांच्यावर एकंदरीत हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव जाणवतो.
राज ठाकरेंनी घेतलेला भोंग्यांचा ताजा विषय श्रीकांत ढगे यांना पटलाय. राजकारणात प्रत्यक्ष सक्रीय नाही म्हणताहेत, राजकारणात त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता सावरलं गेलंय ; पण धर्मभावना त्यांना राजकारणात पुन्हा कधी खेचून आणेल सांगता येत नाही ! कदाचित भोंगे उतरवण्याच्या निमित्तानेही त्यांची नवी सुरुवात होऊ शकते.
झी२४तास च्या बातमीचा विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ