परराष्ट्रदौरा नव्हे, मोदींची निवडणूक रॅलीच…तीही जनतेच्या पैशातून !

परराष्ट्रदौरा नव्हे, मोदींची निवडणूक रॅलीच…तीही जनतेच्या पैशातून !

परराष्ट्रदौरा नव्हे, मोदींची निवडणूक रॅलीच…तीही जनतेच्या पैशातून !

सध्या देशभरातल्या सर्व राजकीय विश्लेषकांचे, मिडिया संस्थांचे लक्ष पश्चिम बंगाल विधान सभा निवडणूकीकडे लागलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूक मतदानाचा पहिला टप्पा २७ मार्च रोजी सुरु होतं आहे त्याच्या दोन दिवस आधी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बांग्लादेश दौऱ्यावर निघाले आहेत. हा दौरा वरवर जरी आंतरराष्ट्रीय हितसंबंध जपण्याचा आणि दोन देशातल्या परराष्ट्रीय संबंधाचा एक अध्याय वाटत असला तरी या दौऱ्यामागे एवढं एकच कारण नाही आहे.

कोरोनामुळे देशातच अडकलेल्या प्रधानमंत्र्यांनी आपला ५०० दिवसानंतरचा पहिला दौरा करण्यासाठी बांग्लादेश निवडला यामागे पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणूकांची पाश्वभूमी आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमागे निवडणूक आणि त्यासंबंधीच्या प्रचाराचा एक नियोजनपूर्व प्लान आखलेलाच असतो. टायमिंग साधण्यात आजही त्यांचा हात कोणी धरु शकत नाही हे सर्वमान्य आहे.

यावेळीही त्यांनी अचूक टायमिंग साधलय.कागदोपत्री हा दौरा बांग्लादेश आपल्या स्वातंत्र्याची ५० वे वर्ष साजरा करतोय तसेच बांग्लादेशच्या विद्यमान प्रधानमंत्री शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबउर रहमान यांच जन्म शताब्दी वर्ष आहे त्यामुळे मोदी बांग्लादेश दौऱ्यावर निघालेत.

हा दौरा प्रशासकीय पातळीवर ठरवल्या गेला तेंव्हाच बांग्लादेश मधील स्थानिक लोकांचा मोदींना विरोध होता. बांग्लादेशातील महाविद्यालयीन विद्यार्थी ‘Modi go back’ चे फलक घेऊन रस्त्यावरही उतरले होते तरीही मोदी यांना या दौऱ्यात इतक सारस्य का असा प्रश्न सहाजीक निर्माण होतो. याचं उत्तरही तितकच सरळ आहे- बंगाल विधानसभा निवडणूक.

मोदी आपल्या या दौऱ्यात बांग्लादेशची राजधानी ढाका व्यतिरिक्त आणखी दोन ठिकाणी भेट देणार आहेत ज्याचा थेट संबंध बंगालशी आहे. प्रधानमंत्री मोदी मतुआ महासंघाचे संस्थापक हरिचंद्र ठाकुर यांनी ओरकांडी येथे स्थापन केलेल्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.

प्रधानमंत्र्यांनी २०१५ सालीही बांग्लादेश दौरा केला होता त्यावेळी मात्र या मंदिरात गेले नव्हते हे विशेष. बंगाल मध्ये मतुआ समुदायाची लोकसंख्या प्रचंड आहे. मतुआ समुदायाचे सर्वोच्च धार्मिक स्थळ म्हणजे हरिचंद्र ठाकुर यांनी स्थापन केलेलं हे मंदिर आहे.

हा समुदाय बंगाल मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की बंगालच्या निवडणूकांमध्ये या समुदायाच्या नागरिकांचं मतदान थेट बंगालच्या मुख्यमंत्री पदाची खूर्ची कोणाची हे ठरवू शकतं. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार मतुआ समाज अनुसुचित जातीच्या एकूण लोकसंख्येचा पाचवा हिस्सा होता म्हणजे यांची लोकसंख्या तब्बल २३.५१% इतकी प्रचंड होती आता १० वर्षानंतर त्यात प्रचंड वाढही झाली असणार हे सहाजिक आहे.

या समुदायाला खुश करण्यासाठी मोदींना बांग्लादेश दौरा अपरिहार्य होता. याअगोदरही मोदींनी या समुदायाच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लोकसभेच्या निवडणूकांवेळी हरिचंद्र ठाकूर यांच्याच परिवारातील तसेच मतुआ समुदायाची माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीनापाणि देवी यांची भेट घेतली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणूकांच्या वेळी भाजपाने याच परिवारातील मंजुल कृष्ण ठाकुर यांना उमेदवारी देऊन बनगांव मतदार संघातून निवडूनही आणले. या अगोदर मतुआ समाज संपूर्ण पणे डाव्या पक्षांच्या पाठीशी उभा रहायचा कालांतराने तो ममता बॕनर्जी यांच्या बाजूने झुकला पण आता भाजपाने साम दाम दंड भेद वापरुन समुदायाला दोन गटांत विभागुन नेहमीचे राजकारण करीत यातील एक गट आपल्या गळाला लावला.

यात सीएए आणि एनआरसी कायद्याचीही मदत भाजपाने घेतली. आता ही विधानसभा निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे समोर ममता बॕनर्जी सारखं खंबीर नेतृत्व आहे त्यामुळे यावेळी भाजपने कोणत्याच समुदायाला नाराज न करता त्यांची मन जिंकण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले त्याचाच भाग म्हणून प्रधानमंत्र्यांनी थेट बांग्लादेश दौरा जाहीर केला.

या दौऱ्यातून त्यांना मतुआ समुदायाची मतं मिळवायची आहेत हे स्पष्ट आहे. प्रधानमंत्र्यांसोबत या दौऱ्यावर खासदार शांतनु ठाकुर हेही जाणार आहेत.

प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्यातील दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे बांग्लादेशातील बरीसाल जिल्हा स्थित सुगंधा शक्तिपीठ जे हिंदु धर्मातील ५१ वे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. याठिकाणी भेट म्हणजे बंगाल मधील हिंदु मतदारांना आकर्षित करणे.

बांग्लादेश दौऱ्यातून परराष्ट्र हित संबंध,रोजगार, देवाण घेवाण,दळणवळण इ. काहीही साधलं जाणार नाही. बंगालमध्ये आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही थेट बांग्लादेशाच्या मैदानावर मोदींनी केलेली ही एक प्रचारसभाचं ठरणार आहे तेही जनतेच्या करातून….

 

 

 

 

अंकुश हंबर्डे पाटील

वृत्तसंपादक, मिडिया भारत न्यूज तथा नांदेड जिल्हा समन्वयक, कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!