मोहम्मद रफी : एक अघोषित भारतरत्नच !

मोहम्मद रफी : एक अघोषित भारतरत्नच !

मोहम्मद रफी : एक अघोषित भारतरत्नच !

आज ३१ जुलै म्हणजे पदमश्री रफी साहेबांचा स्मृतिदिन …खरं पाहता रफी म्हणजे एक अघोषित भारतरत्नच, गव्हर्मेंटने जरी भारतरत्न दिला नसला आणि फक्त पद्मश्री ने त्यांची बोळवण केली असली तरी तमाम भारतीयांनी त्यांना भारतरत्न केव्हाच बहाल केलेला आहे,

लता मंगेशकर किंवा भूपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्कार मिळू शकतो, पण रफी साहेबांना नाही, यातच इथल्या व्यवस्थेचा वैचारिक दरिद्रीपणा समोर येतो, नाही का ? परंतु रफी या कचकड्यांच्या पुरस्कारांत बांधता येणार रत्न नाही, तो ध्रुव तारा आहे ! सिनेविश्वाच्या आकाशातील अढळ, तेजपुंज ध्रुव तारा …

शून्यातून विश्व् निर्माण करणारे किंवा मिळालेल्या संधीचं सोनं करणारे फार कमीतकमी असतात त्यापैकी एक म्हणजे रफी साहेब. आज ९० च्या नंतर जन्मलेल्या मुलांना रफी माहित नसतील कदाचित पण ६०-७०-८० या तीन दशकांत आपल्या आवाजाच्या जादूने देशभरात लोकांच्या मनात घर करून राहिले होते, राहिले आहेत, रेडिओ एफएम किंवा कुठलाही सांगीतिक कार्यक्रम रफींनी गायलेल्या गाण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही,

प्रसिद्धीचं वलय लाभलेल्या आणि त्याची नशा डोक्यात भिनलेल्या कित्येकांनी रफींना डावलले, दूर केले तरी आपले ध्येय कायम ठेऊन, गायनाला आपली पुजा मानून रफी चालत राहिले, चालत राहिले, इतके कि तथाकथित गानकोकिळा आणि डोक्यात हवा गेलेल्या कित्येक गायकांच्या ते खूप पुढे निघून आले, आज ४० वर्षानंतर सुद्धा त्यांनी गायलेल्या गाण्यांची पारायणे होतात, रिमिक्स होतात, गायनांत आपले करिअर करणारे नवोदित गायक त्यांना देव मानतात.

रफी साहेबांची गायनाची स्वतःची वेगळी शैली होती, पट्टी होती, ज्या अभिनेत्याला आवाज द्यायचा आहे त्याच्या स्वभाव, देहबोलीला शोभेल अशा आवेशात ते गाणे गायचे ! असं म्हणतात, देव आनंद, शम्मी कपूर हे स्वतः त्यांचे रेकॉर्डिंग पाहायला हजार असत, पुढे किशोर कुमार यांच्या उदयाने देव आनंद यांनी रफींपेक्षा किशोर यांना पसंती दिली, तीच वागणूक राजेश खन्ना यांनी आराधनानंतर दिली ; तरीही रफी हरले नाहीत, हिरमुसले नाहीत.

गानकोकिळा म्हणून नावाजलेल्या लता मंगेशकर यांनीसुद्धा गाण्यांच्या रॉयल्टी वरून वादंग निर्माण केला आणि तो इतका वाढला कि त्यांनी रफींसोबत न गाण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे रफींना अतीव दुःख झाले, याच वेळी सुमन कल्याणपूरकर (लता यांच्यापेक्षा सुंदर गळा असलेल्या) यांची गायनाची साथ रफींना मिळाली

के एल सैगल आणि जी एम दुर्रानी यांचा प्रभाव असलेले रफी १९४४ साली मुंबईत आले
आणि भेंडी बाजारातील १० x १० च्या खोली राहू लागले, पण त्यानंतर मात्र रफी देशातील लोकांच्या मनात राहायला लागले. महात्मा गांधींच्या खुनाची दखल सिनेविश्वाने सुद्धा घेतली, रफींनी याच काळात “सुनो सुनो ओ दुनियावालो बापूजीकी अमर कहाणी” हे गीत गायले जे खूप गाजले होते, तात्कालिक प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी रफींना खास आमंत्रण देऊन घरी बोलावले होते

हिंदी चित्रपटांतील अभिनेते त्यांच्या अभिनयामुळे ओळखले जात असले तरी प्रदीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात ते त्यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांमुळे आणि या लाखो गाण्यांचा आत्मा असतात गायक ! अशा कित्येक गाण्यांचा आत्मा रफी साहेब झाले आहेत जे त्या गाण्यांना आजही अजरामर करून आहेत. सुमारे ७००० पेक्षा जास्त गाण्यांच्या माध्यमातून रफी साहब आप हमेशा याद आते रहेंगे … क्यू कि “चुरा लिया है तुमने जो दिल को … !”

पदमश्री मोहम्मद रफी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

 

अमोल गायकवाड

सिनेनाट्य समीक्षक, राजकीय अभ्यासक, कायद्याने वागा लोकचळवळीचे मुंबई समन्वयक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!