मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
२०१९-२०२० ह्या चालू वर्षात संकटाची साखळीच शेतक-यांच्या वाट्याला आली. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामावर महापुराचं संकट तर आता येणा-या खरीब हंगामावर टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या समस्या. टाळेबंदीतील आर्थिक नुकसानाचा विषय जेव्हा येतो तेव्हा प्रामुख्याने व्यापार, उद्योग आणि सेवा क्षेत्र ह्यांचाच उल्लेख प्रामुख्याने येतो, पण आपल्या देशातील सर्वात मोठा घटक शेतकरी आणि त्यांच्यावर झालेल्या परिणामांची आणि आर्थिक नुकसानाची उघड चर्चा करताना कोणी दिसत नाही.
भाग पहिला
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश पूर्णतः टाळेबंद झाल्यानंतर घरात पडून असलेल्या पीकांच्या वाहतुकीची साखळी सगळ्या बाजूने बंद झाली. टाळेबंदीच्या आठवडाभर अगोदर शेतक-यांकडून कवडीमोल भावात शेतीमालाची खरेदी करून टाळेबंदीत अव्वाच्या सव्वा किंमतीला विकणा-या व्यापारी वर्गाला मात्र सोन्याचे दिवस आले आणि जे पीक डिसेंबर-जानेवारी ह्या काळात काढणीला येते, असे सर्व पीक अनेक अडथळ्यामुळे शेतातच पडून राहीले.
पीक काढणीसाठी परराज्यातून विशेषतः आंध्रप्रदेश मधून महाराष्ट्रात येणारे काढणीयंत्र येऊ शकलं नाही. पुणे-मुंबई-औरंगाबाद सारख्या शहरात शिक्षणाला गेलेल्या भूमिपुत्रांनाही ह्या काळात कामं करण्यासाठी घरी परतता आले नाही.त्यामुळे मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा सोबत यंत्राची वाहतूक ठप्प अशा दुहेरी संकटात शेती उद्योग सापडला. अर्धा माल घरात आणि अर्धा शेतात.
केळीच्या बागा शेतक-यांना स्वत:च्या हाताने तोडाव्या लागल्या. कापसाच्या पीकालाही वाहतुकीचा फटका बसला. वाहतूकीची सोय झाली तर टाळेबंदीतही योग्य हमी भाव नाही ह्या मुळे ब-याच शेतक-यांनी आपला कापूस शेतातच जाळल्याच चित्र आपल्याला पाहायला मिळालं.
भाजीपाला, फळे, फुलं, दूध ह्यांना ताबडतोब बाजार उपलब्ध नाही झाला तर हे दिवसभरात नाश पावणारे उत्पादन आहेत. पाडव्याचा मुहूर्त टाळेबंदीत गेल्यामुळे फुलं व्यवसायांना इतिहासातला सर्वात मोठा फटका बसला.भाजीपाल्यासाठी शहरातील बाजारपेठा बंद झाल्यामुळे व्यापारी गावात येऊन भाजीपाला कवडीमोल भावात खरेदी करु लागले. हॉटेल व्यवसाय ठप्प असल्यामुळे दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली. शितगृह, बेकरीज्, प्रक्रिया उद्योग बंद असल्यामुळे दुग्ध व्यवसायालाही मोठा फटका बसला. आज घडीला राज्यात चार हजार टन दुधाची पावडर पडून आहे.
शासन पातळीवर मोठ्या घोषणा झाल्या, पण त्या बांधावर पोहचल्याच नाहीत. हॉटस्पॉट क्षेत्रात असलेले मोठे अडतदार घरातच अडकून पडले.
शेती उद्योगासाठी टाळेबंदीत सुट शासनाने दिलीय; पण शेतीसाठी लागणारे यंत्राची,अवजारांची निर्मिती करणारे मध्यमउद्योग बंदच होते. शेतीसाठी सर्वात उपयोगी वाहन ट्रॅक्टरला टाळेबंदीत पूर्ण सुट दिल्याचा उल्लेख केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये नाही. औद्योगिक क्षेत्र ठप्प असून त्यासाठी करण्यात आलेला पाण्याचा साठा शेतीकडे वळवण्याची मोठी संधी शासनाला होती पण तसं झालेलं नाही.
झाडून सगळ्या व्यवस्था ह्या करोनाला नियंत्रित करण्यासाठी कामाला लागल्या. एवढंच काय देशाचे कृषीमंत्रीही घरातच राहून काळजी घेत आहेत. राज्य कृषीमंत्रालयही आरोग्य मंत्रालयातच विलीन झालय की काय असं वाटू लागलं आहे. सगळ्यांचं लक्ष करोनावर पण देशातील सगळ्यात मोठ्या क्षेत्रफळावर जो उद्योग आहे, त्या शेती उद्योगाकडे कोणाचेही गांभिर्याने लक्ष नाही.
कंपन्यातील मनुष्यबळासाठी, सेवा क्षेत्रातील व्यवसायासाठी शासनाने थोडीअधिक पाऊले उचलली; पण शेतीची पुरवठा साखळी रुळावर आणण्यासाठी शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करायची कल्पना सुचली नाही. निमलष्करी, Rapid action force, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने शेती उद्योग तारला जाऊ शकत होता, पण असं झालेलं नाही.
आता खरीप हंगाम तोंडावर आलाय. मृग नक्षत्राची चाहूल लागायला सुरुवात झाली. पण शेतक-यांच्या हातात पुरेसा पैसा नाही. पीक कर्जासाठी शेतक-यांचे हेलपाटे सुरुच आहेत. भ्रष्ट व्यवहार सत्र अशा काळातही शेतक-याप्रती माणुसकीच्या भावनेतून पाहू शकलं नाही.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (२९) अरबी समुद्रातून पुढे चाल कायम ठेवत कोमोरीन आणि मालदिवच्या आणखी काही भागांत वाटचाल केली आहे. रविवारपर्यंत (ता.३१) मॉन्सूनची अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील शाखा आणखी वाटचाल करण्याची शक्यता आहे.
सोमवारपर्यंत (ता.१) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केलेले असतानाही शेतक-याच्या शेतीची मशागत अवजाराविना, यंत्राविना, मनुष्यबळाच्या तुटवड्यासह,सक्षम पुरवठा साखळी नसल्यामुळे पुरेशी झालेली नाही.
आपल्या संपूर्ण शेतीपैकी अर्धी शेती ओसाडच ठेवण्याची वेळ शेतक-यावर आलेली आहे. जेवढी मशागत झालीय तेवढ्यासाठी बी-बियाणे आणि खतांची व्यवस्था काय? हा प्रश्न शेतक-यांसमोर अजूनही आ वासून उभा आहे.
आपली शेती सोडून कामाच्या शोधात शहरात गेलेल्या शेतक-यांच्या मुलाचेही हाल दुस-या बाजूला सुरु आहेत. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास त्यांच्या वाट्याला आला आहे. आता ते शेतीकाम करण्यासाठी सक्षम नाहीत.
( क्रमश : )