युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलाच्या आईला खूप बोलायचंय, पण…

युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलाच्या आईला खूप बोलायचंय, पण…

युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलाच्या आईला खूप बोलायचंय, पण…

'त्या' केंद्रीय मंत्र्याला NEET चा फुलफाॅर्म तरी माहितीये का? रशिया मित्र ना तुमचा ! मग ती जवळची बाॅर्डर सोडून हजार किमी लांब जोखीम घेऊन यायला का सांगताय मुलांना? एका आईचे सवाल !! ....नुकतंच बोललो !!!

खरं तर प्रत्यक्ष भेटून विडिओ शूटींगच करायचं होतं, पण त्यांनी फोनवरच सांगितलं, ' आम्ही बोलायच्या मनस्थितीत नाही. काय बोलायचं ते मुलगा घरी आल्यावरच बोलू.'

आज सकाळी त्यांचा १८ वर्षांचा मुलगा 'सिनिअर'च्या मार्गदर्शनाखाली खारकीवमधील विद्यापीठ प्रांगणातून बाहेर पडलाय. जवळपास १२०० विद्यार्थांचा समूह आहे. जवळच्या मेट्रो स्टेशनकडे त्यांनी कूच केलीय, इतकाच सकाळचा संदेश सोबत घेऊन ही 'आई' डोळ्यात प्राण आणून पुढच्या संदेशाच्या प्रतिक्षेत आहे.

सुरक्षेसाठी काही क्षेत्रात तसंच मेट्रो स्टेशन परिसरात, बंकर्समध्ये मोबाईल बंद ठेवावे लागतात. पुढच्या 'सुरक्षित' टप्प्यावर 'पुढची स्थिती' मुलगा कळवणार आहे. तोवर या 'आई'चा जीव टांगणीला असेल. सोबत इतकं भय मनात दाटलेलं आहे की अधिक माहिती देण्याचं ती टाळते. आपल्याकडून कळतनकळत गेलेल्या माहितीतून कोणत्याही टप्प्यावर मुलगा 'असुरक्षित' स्थितीत येऊ नये, म्हणून एका 'आई' ची ही काळजी युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांचे पालक कोणत्या मनस्थितीतून जाताहेत, हे समजून घ्यायला पुरेशी आहे.

आठवडा होत आला. आईवडिलांची झोप उडालीय. भारतीय वृत्तवाहिन्यांवर त्यांना भरवसा नाही. उलट वस्तुस्थिती दडपली जात होती, याचा राग आहे. जो स्वाभाविक आहे.

समाजमाध्यमातून मुलांचा आवाज भारतात पोचला तेव्हा सरकार जागं झालं. त्यातही मुलं थंडीवाऱ्यातून उपाशीतापाशी, मिळेल त्या साधनांनी किंवा बहुतांशी चालतच पश्चिमेकडील सीमांवर पोचताहेत, तेव्हा तिथे भारत सरकार मिरवायला उभं आहे. युक्रेनच्या आत भारताची कुठलीही मदत मुलांपर्यंत पोचलेली नाही की पोचत नाहीये. मुलं भारताची बदनामी करताहेत, अशी एक सुनियोजित प्रचारमोहीम सुरू झालीय, पण मुलांनी समाजमाध्यमांचा आधार घेतला नसता तर सरकार हाललं तरी असतं का, याचीच पालकांना शंका आहे.

एअर इंडियाच्या विमानांची टूम काढली होती, तोवर युद्धाचे ढग जमा झालेले होते. त्याच काळात विमानसेवांचे दर दुप्पट तिप्पट करण्यात आले. युक्रेनमधून बाहेर पडू पाहणारी मुलं त्यामुळे माघारी फिरली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याही काळात भारतातून युक्रेनमध्ये मुलं गेलीयेत. त्यांच्या विद्यापीठांमध्ये मुलाखती झाल्यायंत, प्रवेश झालेत, करार झालेत. जर परिस्थिती गंभीर होती तर ही मुलं भारतीय दुतावासाने तिकडे जाऊ कशी दिली? अनेक प्रश्न आहेत.

रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमधील सर्वाधिक असुरक्षित ठिकाणं कुठली असतील तर ती कीव आणि खारकीव अशी रशियन सीमेजवळची ठिकाणं आहेत. तिथे भारताची कुठूनही कसलीही प्रत्यक्ष मदत पोचलेली नाही. भारतीय वृत्तवाहिन्या पुतीन घुसकर मारता है, म्हणून उथळ भडक वृत्तांकन करतात ; पण रशिया आपला मित्र असताना भारताने आपलं 'विश्वगुरू' वजन वापरून त्या बाजूने मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, हा प्रश्न वृत्तवाहिन्यांना पडत नाही. उलट, मुलं आपली व्यथा मांडताच कॅमेरा दुसरीकडे वळतो, हे पाहिल्यावर कोणते पालक सरकारच्या भरवश्यावर राहतील?

सरकार आत येऊन काहीच उपाययोजना करत नाहीये आणि उंटावरून शेळ्या हाकतंय, हे बघून मुलांनी आता मदतीची वाट न पाहता स्वत:च परिस्थितीला तोंड द्यायचा निर्णय घेतलाय. बंकर्समध्ये किती दिवस राहायचं ? आणि समजा संकट कोसळलंच तर ? त्यापेक्षा बाहेरच का पडू नये, असा निर्धार करून मुलं विद्यापीठाच्या प्रांगणातून बाहेर पडलीत. मेट्रो स्टेशनकडे गेलीत. त्यांच्याकडे किती पैसे आहेत, साधनं काय उपलब्ध आहेत, खातील काय, पीतील काय, थंडीचा मुकाबला कसा करतील, झोपेचं काय, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. पालकांना खूप बोलायचंय. मन मोकळं करायचंय. पण ते संयम राखून आहेत. मुलं घरी परतल्यावरच ते बोलणार आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!