गिरीश कर्नाडांचं समाजभान प्रत्येक कला साहित्य निर्मितीकारास येवो !

गिरीश कर्नाडांचं समाजभान प्रत्येक कला साहित्य निर्मितीकारास येवो !

गिरीश कर्नाडांचं समाजभान प्रत्येक कला साहित्य निर्मितीकारास येवो !

अफाट वाचन, चिंतन आणि प्रयोगशीलता ही डॉ. गिरीश कर्नाड यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या साहित्य व नाट्यकृतीतून त्यांची ही सर्जकता सतत प्रतिबिंबित होत राहिली. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरानमधला त्यांचा जन्म. आज त्यांचा जन्मदिवस ! त्या निमित्ताने लिहिताहेत, युवा संगीतकार आशुतोष वाघमारे !

तीन वर्षांपूर्वी म्हैसूर येथील नाट्य मोहोत्सवात मध्ये आमचे मित्र डॉ अरुण मिरजकर लिखित “एका धोतराची गोष्ट”चा प्रयोग केला होता. कलाकार,साहित्यिक, लेखक यांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्यावर भाष्य करणारे अप्रतिम नाटक अरुण मिरजकरांनी लिहिले आहे. डॉ.मिलिंद इनामदारांनी तितक्याच ताकदीने त्याचे दिगदर्शन केले आहे. लेखक,साहित्यिक, कलाकार यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करणारे हे नाटक आहे.

सध्याच्या काळात आपण काय लिहितो, काय वाचतो, आपल्या घरात कोणत्या लेखकांची पुस्तकं आहेत यावरून आपली राजकीय भूमिका कोणती यावर बारीक लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे. काही साहित्यिक कलाकार ह्याला भीक घालत नाहीत ते बेदरकारपणे वास्तव मांडत राहतात. काही मात्र सत्तादारांचे आश्रितच होतात. एका धोतराची गोष्ट अशाच एका विद्रोही लोककलावंताची कहाणी आहे.

कॉलेज मध्ये असताना INT करिता आमचा मित्र दीपक भागवत ने एकांकिका बसवलेली,”म्हातारी आणि काळूची कथा”

इथे मला माझ्यातला संगीतकार सापडला. कौस्तुभ सावरकर ने यातील गाणी लिहिली होती. ही एकांकिका गिरीश कर्नाड यांच्या नागमंडल कादंबरीवर आधारित होती. मंथन, निशांत, स्वामी, आनंदभैरवी, सूर संगम, उंबरठा हे सिनेमे मी पूर्वी पाहिले होते. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूपच आदर आणि प्रेम होते.

उंच,देखणा,रुबाबदार नटाचा कानडी, हिंदी,मराठी मध्ये चौफेर वावर. आपल्या आवडत्या नटाच्या लेखणीतून आलेल्या कादंबरीवर आधारित नाटकातून माझा संगीतमय प्रवास सुरु झाला ह्याचा आज अभिमान वाटतो.

म्हैसूर मधील नाट्य महोत्सवात आलो होतो, तेव्हा माझं आणि कर्नाडजींचं फोनवर बोलणं झालं होतं. दीपक भागवत च्या एकांकिकेची आठवण काढून बोललो. त्यांनी कौतुक केलं. कबीर कलामंच च्या गाण्याच्या सीडी चे उदघाटन प्रसंगी केलेल्या भाषणाची त्यांना आठवण सांगितली, तेव्हा ते खुश झाले.

म्हैसूरला कसं येणं केलंत? हे विचारल्यावर आपण येथील नाट्य महोत्सवात नाटकाचा प्रयोग करण्याकरिता आलो आहोत. आपण नाटकाला यावे, अशा विनंतीकरिता फोन केला आहे.

एका धोतराची गोष्ट नाटकाचा विषय जाणून घेतल्यावर त्यांनी लेखक, दिगदर्शन कोण याबद्दल देखील विचारपूस केली. अशा नाटकांची विचारांची गरज आहे. तुम्ही छानच करत असणार अशी आशा आहे. फोनवरची ती पंधरा मिनिटं माझ्या आयुष्याचा अविस्मरणीय भाग आहे.

“वाघमारे, आता मी बंगळुरू ला असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने नाटकाचा विषय मला सांगितलात, मला बघण्याची खूपच उत्सुकता आहे. असे विषय तुम्ही तरुण मंडळी धाडसाने मांडत आहात. तुमचं कौतुक आहे, सध्याची राजकीय परिस्थिती गंभीर आहे ! तुम्ही काळजी घ्या.

मी सध्या एकटा बाहेर येऊ शकत नाही. नाकात नळी आणि सोबत सिलेंडर्स असतात. दोन माणसं लागतात मदतीला. मी प्रयोगाला येऊ शकणार नाही, पण मला स्क्रिप्ट आणि सबंध नाटक पाठवा. मी ते बघेन आणि त्यावर नक्की लिहीन आणि तुमच्याशी पुन्हा बोलेन. प्रयोगासाठी माझ्या सदिच्छा आणि पुन्हा कधी आलात बंगळुरूला तर नक्की भेटून जायचं. बोलताना धाप लागते म्हणून ठेवतो फोन.भेटू लवकर! माझा इ मेल मी तुम्हाला पाठवतो. अच्छा!”

असं म्हणून फोन ठेवला.

आमचे सर्व संभाषण मराठीतच झाले. फोन ठेवल्यावर माझं मलाच कळेना की एवढा मोठा नट माझ्याशी किती आपुलकीने बोलला. नवी पिढी देखील त्याच तळमळीने कलाकृतीतून सामाजिक भूमिका घेत आहे, याचे कदाचित त्यांना कौतुक वाटलं असेल. माझा दिवस सार्थकी लागला. त्यांनी मला त्यांचा इमेल देखील पाठवला.

मुंबईत परतल्यावर पुन्हा इथल्या प्रयोगाची लगबग सुरूच राहिली. नंतर काही महिन्यांनी गिरीश कर्नाड गेल्याची बातमी टीव्ही वर धडकली आणि मला संभाषण आठवलं. रडू आलं नाही पण ब्लॅंक झालो.

बराच वेळ शांत राहून एक विचार आला. कर्नाड फक्त शरीराने गेलेत. त्यांनी केलेली कलाकृती,साहित्य, भाषणांतून त्यांचे परखड, ठाम विचार कायम माझ्यासारख्या असंख्य कलाकारांच्या सोबत आहेत. हे विचारच आपल्याला सामाजिक राजकीय भूमिका घ्यायला कायम प्रेरणा देतील.

तत्क्षणी मला कबीर कला मंचाच्या सी.डी उदघाटन प्रसंगीचं तुमचं वाक्य आठवलं “विद्रोह हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे, तसा माझाही आहेच”.

तुम्ही कायमच आमच्या सोबत राहणार आहात. तुमच्या सारखं निर्भीड, विद्रोही आणि समाजभान नव्या पिढीतील प्रत्येक कला-साहित्य निर्मितीकारास येवो. तुमच्या स्मृतींना अभिवादन सर !

 

 

 

आशुतोष मा.वि.वाघमारेे

+91 95948 51656/ashutoshtaal@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!