मृत बुद्धीला जिवंत करते माझी सावित्री ; यशोमती ठाकुरांचं ट्वीट जोरदार चर्चेत

मृत बुद्धीला जिवंत करते माझी सावित्री ; यशोमती ठाकुरांचं ट्वीट जोरदार चर्चेत

मृत बुद्धीला जिवंत करते माझी सावित्री ; यशोमती ठाकुरांचं ट्वीट जोरदार चर्चेत

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचं आजचं ट्वीट जोरदार चर्चेत आहे. हे ट्वीट त्यांनी वटसावित्रीच्या निमित्ताने केलं आहे ; मात्र यशोमती ठाकूर यांच्या ट्वीटमधली सावित्री ही सत्यवानाची सावित्री नाही, तर ती स्त्रीयांना अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर काढणारी सावित्री आहे.

आज वटपौर्णिमा ! सत्यवानाच्या सावित्रीची आठवण काढण्याचा दिवस. सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळवले, अशी आख्यायिका आहे ; त्यामुळे वडाला फेर्‍या मारून महिला आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात.

 

शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा आहे. परंतु बदलत्या काळात ती कितपत सुरू ठेवावी, हा प्रश्न आता महिलांना पडू लागला आहे. जन्मोजन्मी हाच पती का मागावा आणि तो कितीही दुर्गुणी किंवा अत्याचारी असला तरी तोच का मागावा, असा प्रश्न आता महिला समाजमाध्यमातून जाहिररित्या विचारू लागल्या आहेत.

दरम्यानच्या काळात स्त्री शिक्षणावर सावित्रीबाई फुले यांनी केलेलं क्रांतिकारक कार्य पुढे आल्यानंतर, महिलांची सावित्री बदलली. सत्यवानाच्या सोशिक सावित्रीपेक्षा ज्योतिबा फुलेंची लढाऊ सावित्री महिलांच्या प्राधान्यावर आलीय. त्याचंच प्रतिबिंब महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ट्वीटमधून उमटलं आहे.

यशोमती ठाकूर यांनी ट्वीटसोबत वापरलेला फोटोही पुरेसा बोलका आहे.

त्या म्हणतात,

ही सावित्री तुम्हाला अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर काढून तुमच्या मृत बुद्धीला पुन्हा जीवंत करण्याचं सामर्थ्य देते. मी या सावित्रीची उपासक आहे. #वट_सावित्री

या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर म्हणतात की भंपक रूढी, परंपरा, प्रथांची वटवट संपुष्टात येवो आणि जगातील समस्त स्त्रीयां धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होवोत.

वडाला फेऱ्या मारून नवरा जिवंत राहत असता तर जगाच्या शब्दकोशात विधवा हा शब्द नसता, असं पत्रकार किरण सोनावणे यांनी यशोमती ठाकुरांचं अभिनंदन करताना म्हटलंय.

महिलांप्रति असलेला दुजाभाव पाहून मन सुन्न होऊन जातं, अशी प्रतिक्रिया नोंदवत सामाजिक कार्यकर्त्या सीमा प्रभावळकर यांनी मंत्रीमहोदयांशी सहमती दर्शवलीय. सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुलेंची सावित्री समाजाला कळाली असती तर देशाचा इतिहास काही वेगळाच असता, असं आतेश कांबळे यांनी ट्वीटला उत्तर दिलंय. मंत्री पदावर असूनही अशी भूमिका घेण्यासाठी धारिष्ट लागतं, असं मत राष्ट्र सेवा दलाचे मुंबई अध्यक्ष शरद कदम यांनी फेहबुकवर नोंदवलंय.

जागल्या भारत या वेबपोर्टलचे संपादक मिलिंद धुमाळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि यशोमती ठाकुरांच्या ट्वीटमधला फरक निदर्शनास आणून दिलाय.

पुरुष हा कमालीचा भित्रा प्राणी आहे. त्याला निर्धोक जगता यावं म्हणून तो स्त्री वर हक्क गाजवतो आणि स्वत:चं आयुष्य वाढावं म्हणून तिला एक दिवस जेवण करू नको म्हणतो. ती बिचारी एक दिवस याच्यासाठी उपाशी बसते. स्त्रियांनी ठरवलं पाहिजे काय करायचं. वरवर पर्यावरण संवर्धनाचा मॅसेज देणारे छुप्या पद्धतीने पुरुष प्रधान संस्कृतीच जपत असतात आणि असे चाळे करण्यात पुरोगामी आधुनिक विचारसरणीचे म्हणवून घेणारेही पुढे असतात. दोन ट्वीटमधून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस मधिल या दोन नेत्यांच्या विचारांचा फरक लक्षात येतो, अशी पोस्ट मिलिंद धुमाळे यांनी फेसबुकवर केली आहे.

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!