कविवर्य नारायण सुर्वे : माणसांसाठी नि माणसांविषयी लिहिणारा कवि

कविवर्य नारायण सुर्वे : माणसांसाठी नि माणसांविषयी लिहिणारा कवि

कविवर्य नारायण सुर्वे : माणसांसाठी नि माणसांविषयी लिहिणारा कवि

एका बाजुने कवितेचा आजच्या पिढीतील समाजाशी पर्यायाने माणसाशी असलेला संवाद काहिसा हरवत चाललाय. माणसांना कवितेतून मांडतांना सामाजिक बांधिलकी काहिश्या अभावानेच दिसतेय. दुसऱ्या बाजूस साहित्यातून हीच तुटलेली नाळ पुन्हा समाजाशी , माणसांशी  जोडण्याचे काम काही तरुण कवि/ रसिकमंडळी वेगवेगळ्या माध्यमांतून सातत्याने करीतआहेत. अशावेळी जेव्हा माणसांच्या , माणसांसाठीच्या कवितांसंबंधात कुठे चर्चा होते तेव्हा माणसांसाठी नि माणसांविषयी लिहिणारे कविवर्य नारायण सुर्वे हे नाव अधिकच ठळकपणे पुढे येते.

एखादी रुंदावलेली मळवाट अधिक सहजसोपी करणे, सुकर करणे हे जितके सहज असते, तितकेच ती वाट रुंदावतांनाचे त्या वाटेवर कष्टणारे हात उपेक्षित रहातात. पण कविवर्य नारायण सुर्वे हे मात्र अपवाद असावेत. व्यक्तिवादी, सौंदर्यवादी वाटा टाळून त्यांनी मराठी कवितेला सर्वसामान्य माणसाच्या ओठावर आणले. मार्क्सवादाचा प्रभाव जाणवणाऱ्या  त्यांच्या कवितांतून जीवनानुभवाने कष्टकरी वर्गातील माणूस आपल्याला पदोपदी जाणवतो. म्हणूनच त्यांच्याविषयी म्हटले जाते की ‘सुर्व्यांनी कष्टकरी, कामगार तथा सामान्य माणसाच्याच काळजाला हात घातला. त्यांनी आपली कविता खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचवली.

१९६२ साली आलेल्या त्यांच्या ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ या पहिल्या संग्रहास कुसुमाग्रजांची प्रस्तावना लाभली होती. या पहिल्या संग्रहाने व त्यापाठोपाठ १९६६ साली आलेल्या ‘माझे विद्यापीठ’ या संग्रहांनी मराठी कवितेत एक नवी पायवाट चोखळली.

कुसुमाग्रज सुर्वेंच्या कवितेविषयी म्हणतात,  “रोजच्या जीवनात संग्रमासाठी एक पाऊल उंबरठ्याबाहेर  ठेवणारे, प्रस्थापित  जोखड झुगारुन देणारे पण शाश्वत नितिधर्म मानणारे असे हे सांस्कृतिक सरहद्दीवरचे जग नारायण सुर्वे यांच्या कवितेत प्रथमच बोलायला लागले. कामगारांच्या जगाचा संदर्भ त्यांची कविता वाचतांना अगदीच बाजुला ठेवता येत नाही.  परंपरागत साच्यांना बळी न पडता वैशिष्ट्यपूर्ण अनुभवातून मुक्त होणे हे सुर्वे यांच्या कवितेत सतत अनुभवता येते. हे जग कामगारांचे, उपेक्षितांचे, हातावर पोट असणारांचे आहे. या जगात दैन्य आहे , दुःख आहे, सुसंस्कृत पांढरपेशांच्या दृष्टीने ते यातनामय आहे, पण ते असहाय्य नाही. ते लढाऊ आहे. प्रकाशाच्या मार्गावर झेपावणारे आहे.”

म्हणून त्यांच्या कविता आपल्याला कुठेच शब्दबंबाळ होतांना दिसत नाहीत. खरे तर फार अवघड असते साध्या भाषेत लिहिणे, पण सुर्व्यांची कविता याला अपवाद ठरावी कदाचित. त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहातील  “चार शब्द” ही कविता त्यांच्यातील सामान्य माणसाचे प्रश्न तेवढ्याच परखडपणे मांडते .

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे

कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे…

कामगार आहे मी तळपती तलवार आहे

सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा करणार आहे.

ह्या ओळींतूनच ते कवितेची एक नवी वहिवाट चोखळताहेत. पहिल्या दोन्ही ओळींत कामगारवर्गाचे, कधी अपरिहार्यपणे उद्भवणाऱ्या संपलढ्याचे चित्र  डोळ्यांपुढे ऊभे रहातेय, तर पुढच्या ओळींतून आत्मविश्वासपूर्ण आपली ओळख करुन देतांनाच तत्कालीन पांढरपेशा वर्गातील साहित्यिकांपासून आपली कविता ही कशी  वेगळ्या व सर्वसामान्यांच्या जाणिवांची असेल याची चुणूक दाखविली आहे. या ओळींमुळे संपूर्ण कवितेला नवा अर्थ आलाय. कम्युनिष्टांच्या ‘युगांतर’ साप्ताहिकात १९६७ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘मार्क्स’ ही कविता तर त्यांच्यातल्या प्रतिभासामर्थ्याच्या नि आशयघनतेच्या कसोटीवर पूर्णपणे खरी उतरणारी.

दोन दिवस वाट पहाण्यात गेले;

दोन दुःखात गेले ,

हिशोब करतो आहे आहे

किती राहिलेत डोईवर ऊन्हाळे.”

ही कविता म्हणजे त्यांच्या एकूणच सामाजिक कवितांमधील मैलाचा दगड ठरावा.

शालेय अभ्यासक्रमात ही कविता असतांना शिक्षकांनी केलेले रसग्रहण आठवतो तेव्हा पुन्हा पुन्हा सुर्व्यांना या कवितेतून भेटतो. माझंच जगणं ते तेव्हाही जगले असतील किंवा त्यांचंच जगणं मी आजही जगतो आहे हे सतत जाणवत रहातं. सुर्वे आपल्या प्रेमकवितांमधूनही अलिप्त नाहीत हे “गलबलून जातो तेव्हा”, “पुन्हा भेटू सख्ये”, “थरकू नको” अशा कविता यासाठी संदर्भादाखल पाहाता येतात.

शोषणग्रस्त माणसाला केंद्रस्थानी ठेवत सुर्व्यांची कविता पुढेपुढे सरकलेली दिसते. १९६६ साली आलेल्या ‘माझे विद्यापीठ’ या संग्रहातील ‘माझे विद्यापीठ’ ह्या कवितेत त्यांनी त्यांचे पूर्वायुष्य काहिसे चित्रित केल्याचे जाणवते.

ना घर होते ना गणगोत

चालेन तेवढी पायाखालची जमीन होती,

या ओळी वा ,

नाही सापडला खरा माणूस

मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो,


किती वाचलेत चेहरे

किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात,

इथे सत्य एक अनुभव

बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात . “

वास्तवाचे भान असणारा त्यांच्याइतका दुसरा कवि अजूनतरी माझ्या वाचनात नाही. लहानपणापासून कामगार वर्गातल्या जीवनानुभवामुळे सुर्वेंच्या कवितेवर मार्क्सवादाचा पगडा होताच. त्यातूनच मराठी साहित्यात त्याच प्रभावातून शोषितांच्या वेदनेला कवितेतून सामाजिक भान मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

तत्कालीन साहित्यातील, नवकाव्यातील आकुंचित व्यक्तिवाद, सौंदर्यवादास सुर्व्यांनी कवितेतून सामाजिक भूमिका मांडून विरोध केला. आपल्या कवितेला त्यांनी  सौंदर्यवादाकडून जीवनवादाकडे नेले. त्यासाठी लोकभाषेचा सुर्व्यांनी मुक्त वापर केला. मनिऑर्डर , पोर्टरची स्वगते , कुटुंब सारख्या कविता यातून ते स्पष्ट जाणवते.

म्हणूनच त्यांच्या कवितेत

मास्तर माझ्या पोराच्या बापाच्या जागी कनच्याबी देवाचं नाव लिवू नका, तर माणसाचंच नाव लिवा”

असं म्हणणारी वारांगना आपल्याला भेटते. त्यांच्या कवितेतील संदर्भ आजही वेगवेगळ्या रुपाने आपल्याला भेटतात. माणसांसाठी लिहिणारे सुर्वे आयुष्यात प्रत्येक वळणावर भेटत राहतात.

 

———अरुण नाना गवळी———

लेखक कवी आहेत. त्यांचा “काही ऱ्हस्व, काही दीर्घ” नावाचा कवितासंग्रह प्रकाशित आहे.

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!