भाऊबीजेच्या दिवशी अचानक संध्याकाळी ठरलं की दुसऱ्या दिवशी हरिश्चंद्रगडावर फिरायला जायचं. मी तर अवाकच झाले. इतक्या अचानकच ठरवून जाता येतं का पिकनिकला ? पण माझा हा विचार अत्यंत चुकीचा ठरला .
दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही आंबेगव्हाणला पोचलो. आम्हाला पाहून सर्वांना हुरुप आला. आधी नाही नाही म्हणत होते, ते सर्वच पटापट पिकनिकला यायला तयार झाले. भराभर तिथलं आवरून आम्ही सोळा जण पिकअप मधून निघालो. आमची स्वारी पिकअपच्या धाड्धाड् खाड्खाड्मध्येही खूप आनंद घेत होती.

मजा - मस्करी , गाण्यांच्या भेंड्या काही जोक्स असं करता - करता आमचा तीन तासांचा प्रवास कसा संपला ते कळलंच नाही. हरिश्चंद्राच्या पायथ्याशी आलो तर खरं, पण इतका उंच गड पाहून सर्वांची छाती दडपली होती ; तरीही प्रत्येक जण एकमेकांना आधार देत होते .
काही नाही ? हे तर आपण असंच सहज जाऊ चालत - चालत, असं एकमेकांना म्हणत होतो. गाडीतच दिवाळीचा फराळ खाल्ला आणि आम्ही गड चढण्यास सज्ज झालो.
आमच्यात सर्वात जास्त वयस्कर असणाऱ्या इंदुबाईसुद्धा काठीचा आधार घेऊन गड चढू लागल्या. येणारा जाणारा जो - तो त्यांचं कौतुक करत होता. आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा मिळत होती.
गप्पाटप्पा करत - करत आम्ही जवळजवळ अडीच तास गड चढत होतो. बाजूला दुतर्फा झाडी! भर उन्हातही शीतल गारवा त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला. गारवा गडाला बिलगूनच होता. भर उन्हात ही बोचरी थंडी नवलाईची होती.

नितळ पाण्याचे ओहळ पाऱ्यासारखे चमकत होते. अशा असंख्य झऱ्यांच्या माळा हरिश्चंद्राने परिधान केल्या होत्या. गवत कमरेला टेकलेले होते. लाल माती पायांना गोड वाटत होती . हरिश्चंद्रांची ती लाल माती म्हणजे त्याने कपाळाला लावलेला अष्टींगध होता.
या उंच शिखरावर पावसाचा जोर तसा अधिकच. त्यामुळे मोठमोठ्या दगडांच्या गोल गोल गारगोट्या झाल्या होत्या. पावसाने जणू हे दगड घडवले होते. उंच सखल भाग दगडगोटे यावरून आम्ही तोल सावरत चालत होतो. मधेच धावत होतो. भान हरपले होते. सगळेच बेभान करणारे होते.
सर्वजण खूप थकलो होतो. आता थोडंच राहिलं , थोडंच राहिलं म्हणत वरवर जाऊ लागलो आणि वर आल्यावर जे डोळ्यांना दिसलं , ते खरंच शब्दांत वर्णन करण्यासारखं नव्हतं . खूप मोठे - मोठे शब्दसुद्धा त्याला पुरेसे पडणार नाहीत, इतकं नयनरम्य दृश्य डोळ्यांना दिसू लागलं.
डोळ्यांचे पारणे फिटावे , अगदी तसंच प्रत्येकजण लहान-मोठे मंत्रमुग्ध होऊन ते दृश्य डोळ्यात , मनात , डोक्यातच साठवू लागला .

अतिप्राचीन मंदिर , दगडातील सर्व बांधकाम . एकाच सलग मोठ्या पाषाणात मुर्त्या घडवलेल्या . ठिकठिकाणी गडावर तलाव. ते पूर्ण दगडातच कोरलेले. थंडगार पाणी त्यात मस्ती करत आहे असं वाटत होतं.
प्रचंड शिवलिंग तेही पाण्यात संपूर्ण दगडातच ते काम केलेलं . भरपूर पाणी आणि बरोब्बर मधोमध भव्य शिवलिंग ! बरं पाण्याचा वेग असा की पाण्यात उतरावं तर बरोबर शिवलिंगाच्या भोवती गोल गोल फिरल्याचा भास होतो ! पाणी आपल्या कंबरेच्या वर आणि प्रचंड थंडगार .

स्वर्गीय सुख अनुभवायला मिळावं ही अपेक्षा इथे पूर्णत्वास जाते . वरून खाली बघितलं की खूप खोलवर दरी, छोटी छोटी घरे , प्रचंड झाडी यांचे दर्शन होतं. उन्हात चांदणं भिजून जावं त्याचा हा गोड अनुभव दर्शन झाल्याबरोबर आला.
एक गोष्ट मात्र खटकली. मुख्य मंदिराच्या भोवती कोरीव तपसाधनेच्या ज्या लेण्या होत्या त्यात मुक्कामी लोकांच्या दारुपार्ट्या रंगल्या होत्या. ते मंदिराच्या गाभाऱ्यात बसले नव्हते हेच नशीब म्हणायचे.
एक अनोळखी गृहस्थ आम्हाला बोलावून जेवायला घेऊन गेले . दुपारच्या जेवणाची वेळ होती. खूप भूकसुद्धा लागली होती. अशात आम्हाला ध्यानीमनी नसताना गरमागरम पिठलं भात मिळावा ही खरंच काही साधी गोष्ट नव्हती. प्रत्यक्ष देवच पावल्याची प्रचिती होती.
त्या गृहस्थानेच आम्हाला ताट , पाणी यांची व्यवस्था करून दिली . मग आम्ही मन तृप्त होईपर्यंत जेवलो . गरमागरम पिठलं भात आणि थंडगार पाणी पिऊन प्रत्येकाच्या मुखातून अन्नदाता सुखी भव असाच जणूकाही आशीर्वाद निघत होता .
जेवण झाल्यावर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तोही खूप सुरेख झाला. मन मोहून टाकणाऱ्या त्या वाटा, प्रचंड वेड लावणारी ती झाडी , ठिकठिकाणी नितळ , निर्मळ पाण्याची तळी , तिथले काळे कुळकुळीत कातळ सर्व सर्व मनातल्या घरात साठवून , आम्ही परतीचा प्रवास करत होतो .
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com
प्रदीप वसंत औटी
शब्दात मांडलं तुम्ही पण फिरून आल्याचा आनंद आम्ही ही घेतला़़़़़़ फार सुंदर अप्रतिम🙏🙏🙏