“रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे ! “

“रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे ! “

“रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे ! “

नारायण गंगाराम सुर्वे जन्म १५ ऑक्टोबर १९२६. जन्मदात्यांनी लहानशा बाळाला रस्त्यावर सोडून दिलं होतं. जन्मतः अनाथ असलेल्या या बाळाला मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार असणाऱ्या ‘गंगाराम कुशाजी सुर्वे’ व त्यांची कामगार पत्‍नी ‘काशीबाई’ यांनी माय-बापाची माया दिली. ‘नारायण गंगाराम सुर्वे’ हे नाव दिलं. वडिलांनी चौथीपर्यंत शिक्षण दिलं पण पुढच्या शिक्षणाचा पाया नारायण सुर्वे यांनी स्वतः रचला. कामगारांचा नेता म्हणून वर्चस्व गाजवणारे नारायण सुर्वे, गिरणी कामगार असताना लेखणीच्या जीवावर त्यांनी कवी समुदायावर आपल्या शब्दांची छाप सोडली. मराठी साहित्यात त्यांचा ‘तळपती तलवार’ असा उल्लेख केला जातो.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमरशेख, गंगाराम गव्हाणे, आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत नारायण सुर्वे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

डोंगरी शेत माझं ग । मी बेनू किती
आलं वरीस राबून । मी मरू किती

नारायण सुर्वे यांच्या या गाण्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला तेव्हा धार आली होती.

कामगारांचे प्रश्न, चळवळी/आंदोलने, यासाठी लागणारे ‘पोस्टर’ बनवणारे तरूण, शोषित, वेश्या व्यवसाय करणारी स्त्री, त्यांचं जगणं नारायण सुर्वे यांनी पहिल्यांदा मराठी कवितेत आणलं. ज्या व्यक्तींना आजवर साहित्यात स्थान नव्हतं, अशा समाज घटकांना नारायण सुर्वेंनी आपल्या कवितेतून आवाज दिला.

आंदोलनामध्ये झेंडा धरून उभा असलेला कार्यकर्ता कोणाच्याच खिजगणतीत नसतो. नारायण सुर्वे यांनी अशा कार्यकर्त्याला आपल्या कवितेच्या पानावर सन्मानानं बसवलं. त्यांच्या कवितेत कायम सामाजिक संदर्भ दडलेला असतो. तो संदर्भच वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालतो.

नारायण सुर्वेंनी नेहमीच कामगार म्हणून कामगारांच्या परिस्थितीचा विचार केला. कामगारांच्या हक्काची जाणीव त्यांनी कवितेतून कामगारांच्या हृदयात जागवली. व्यवस्थेच्या समोर आणली. परंतु आजचा कामगार काय करतोय ? अर्थार्जनासाठी मिळेल ते काम पत्करतोय. अन्यायाविरुद्ध आणि स्वतःच्या हक्कासाठी तोंड वर करून बोलण्याची हिंमत आज कामगारांत नाही. लेखणी तर दूरच !

आज कामगारांच्या प्रश्नांवर लवकर तोडगा निघत नाही, कामगारांची होणारी दमछाक पाहून मनात येतं, आज नारायण सुर्वे असते तर कदाचित कामगार वर्गाला पुन्हा कवितेतून बोलायला भाग पाडलं असतं. “रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे” असं म्हणणारे नारायण सुर्वे आज आमच्यासारख्या तरूणांसाठी जगण्याचं विद्यापीठ उभं करतात.

कॉलेजची पायरी न चढलेल्या या कवीचे शब्द विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात रूजले. याचं कारण नारायण सुर्वे नुसते कामगारांचे कवी नव्हते. त्यांची कविता माणसांची कविता आहे. म्हणूनच परभणीच्या अ.भा.सा.सं.अध्यक्ष असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य माणूस सामान्यांच्या ‘सेलिब्रेटी’चं दर्शन मिळावं म्हणून एकवटला होता.

समाजातील शोषितांचे जीवन आपल्या कवितेतून जगासमोर मांडणारे, समाजभान, मानवननिष्ठ जाणिवांचा सहज व प्रभावी अविष्कार कवितेतून करणारे कविवर्य नारायण सुर्वे यांचा आज स्मृतिदिन ! विनम्र अभिवादन !

 

कपिल खंडागळे

उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयाचा पदवीचा विद्यार्थी. संविधानिक मार्गाचा पुरस्कर्ता. कायद्याने वागा लोकचळवळीचा विद्यार्थी प्रतिनिधी.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!