हिताच्या भावचित्रांचा हात सोडू नका !

हिताच्या भावचित्रांचा हात सोडू नका !

हिताच्या भावचित्रांचा हात सोडू नका !

एवढा वेळ रेंगाळणारं मन आज उगीचच हातात पेन धरून लिहू पाहतंय. काय हरवलंय आणि काय शोधायचंय याचाच जणू काही हिशोब करायला बसलंय. अनेक भावभावनांचा कल्लोळ डोक्यात चालू होतो, मग अलगदपणे कागदावर उतरू लागतो.

भावना कागदावर पसरल्या की कशा परीटघडीसारख्या नेटक्या दिसतात. वाऱ्याच्या मंद झुळुकेचा पानांना झालेला स्पर्श पानांना खदखदून हसवतो. भावनांनाही प्रसन्नतेचा स्पर्श झाला की सुखाचा झुला झुलतो. काही भावना खूप आनंद देऊन जातात, तर काही मंद हास्य चेहर्‍यावर उमटवतात. काही सुखद धक्का देतात.

अरेच्या, आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात असं काही घडलं जे उगीचच आपल्याला भाव खायला लावत होतं. स्थिर भावना आपलं नाणं खणखणीत असल्याचा पुरावा देतात. नो घालमेल. शांत शांत . प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, राग, लोभ या कोणत्याच भावना दीर्घकाळ टिकून राहत नाहीत. डुचमळ असतेच. आपण भावनांच्या नावेत बसायचं पण स्वतःला डुचमळू द्यायचं नाही.

क्षणाक्षणाला काही प्रसंगानुरूप या भावना स्वरुप बदलत राहतात. आपलं स्वरूप बदलू द्यायचं नाही. सर्वात प्रेमळ असणारी व्यक्ती आपली आईसुद्धा कधी कधी आपल्यावर रागावते. जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे वागणं बदलते आणि ते बदलणे गरजेचंही आहे. त्या क्षणाला जी भावना आपल्याला एखाद्या बद्दल वाटत असेल तीच भावना दुसर्‍या एखाद्या प्रसंगात बदललेली असेल.

स्वभावाचे अनेक रंग आपल्या आयुष्यात येतात आणि जातात. त्यातले काही गडद असतात तर काही फिके असतात. आपणच ठरवायचं असतं कोणत्या रंगांना गडदपणा द्यायचा आणि कोणते रंग फिके करायचे.

ज्याचा जो गडद रंग तोच त्याचा स्वभावधर्म ओळखला जातो. हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. गडद आणि फिक्या रंगांनीच तर चित्र उठून दिसतं. जिवनाच्या या चित्रात गडद _फिके रंग वापरावेच लागतात.विविध भावनांनी जीवन खरं तर उठावदार होतं.

हिताच्या भावना जपायच्या. अहिताच्या सोडायच्या. तेव्हाच तर आयुष्य उठावदार आणि बहारदार होतं. अगदी आपल्याला हव तसं.

अशी उठावदार भावनांची चित्रे मग एखाद्याचा आदर्श बनू शकतात. काहींना प्रेरणा देऊ शकतात. ह्या प्रेरणा आपल्याला कधी, कोठे, आणि केव्हा मिळतील याचा काही नेम नाही? म्हणून तर अशी भावचित्रे माणसांनी शोधत रहावीत, त्यांचं सान्निध्य मिळवण्यासाठी धडपडत रहावं म्हणजे आपली भावचित्र आकर्षक झाल्याशिवाय राहणार नाहीत.

अनेक आनंदाचे क्षण आपल्या अवतीभवती जमा होतात आयुष्यभर आपली साथ देण्यासाठी..हिताच्या भावचित्रांचा हात सोडू नका.

 

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!