मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
करोना विषाणू रोग संसर्गाला बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याकरता राष्ट्र सेवा दला तर्फे शुक्रवार, ७ मे २०२१ पासून पुढील पाच शुक्रवार ऑनलाईन श्रद्धांजली सभांचं आयोजन करण्यात येणार आहे. धैर्य, एकजूट, आशा, स्वातंत्र्य व समता या मूल्यांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार करण्याचं आवाहन करतानाच पाच शुक्रवारी संध्याकाळी आपल्या घरात एक आंदरांजलीपर दिवा पेटवा, असं आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलंय.
राष्ट्र सेवा दलातर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात कोरोना संसर्गीत रुग्णांना विविध प्रकारे अमूल्य असे साहाय्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दला तर्फे कोरोना साथीला बळी पडलेल्यांचे स्मरण करण्यासाठी ऑन-लाईन श्रद्धांजली व निर्धार सभांचे आयोजन केले जात आहे. यात आपल्याला सोडून गेलेल्यांच्या स्मरणार्थ दोन ते तीन मिनीटांची छोटी भाषणे होतील.
पहिला शुक्रवार दि. 7 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या या ऑनलाईन सभेत देशातील मान्यवर विचारवंत, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सहभागी होतील.
दुसरा शुक्रवार दि. 14 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता देशभरातील कोरोनात बळी गेलेल्या जवळपास 500 (महाराष्ट्रात 124) पत्रकारांना अभिवादन आणि एकजूट. देशातील मान्यवर पत्रकार यात सहभागी होतील.
तिसरा शुक्रवार दि. 21 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता कोरोनात बळी गेलेल्या देशातील फ्रंट लाईन वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस, आशाताई, शिक्षक, कामगार यांच्या बलिदानाला अभिवादन आणि त्यांच्या लढाईला पाठिंबा.
चौथा शुक्रवार दि. 28 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता कोविड विरोधात लढणाऱ्या देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा निर्धार.
पाचवा शुक्रवार, दि. 4 जून, रोजी एक दिवसाचा उपवास.
या अभियानासंदर्भात डॉ. गणेश देवी यांची भूमिका
कोरोना महामारी म्हणजे भारताच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात उद्ध्वस्तकारक आपत्ती आहे. आजपर्यंत या विषाणू संसर्गाने जवळजवळ दोन कोटी नागरिकांना बाधित केले आहे. तर दरदिवशी सुमारे चार लाख नवे संसर्गित रुग्ण आढळत आहेत. मे महिन्याच्या मध्यापर्यंत अशा नव्या बाधित रुग्णांची रोजची संख्या सात आठ लाखांपर्यंत वाढण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्या कोरोना साथीची दुसरी लाट सुरू आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भविष्यात भारतात या साथीची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता आहे. आपण या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचारही केलेला नाही.
आधुनिक भारताच्या इतिहासात आजपर्यंत आलेल्या अन्य कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत बळी पडलेल्या नागरिकांच्या संख्येपेक्षा या साथीत बळी पडलेल्या नागरिकांची संख्या खूप अधिक आहे.
प्रश्न आहे आपण एक समाज म्हणून या जागतिक संकटाला कसे तोंड देणार आहोत? याचा एक मार्ग म्हणजे देशाची आरोग्य व्यवस्था बळकट करणे आणि त्याला मानवी संसाधनांची जोड देणे. कोरोना लस उत्पादन आणि ऑक्सीजन उत्पादनाला गती देणे.
कोरोना संसर्गाच्या फटक्याने आजपर्यंत देशातील कोट्यावधी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या कुटुंबानी आपली जवळच्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत,आपली उपजिविकेची साधने गमावली आहेत, जगण्याची उमेदच गमावली आहे. कोरोना हे एक व्यक्तिगत संकट नाही. ते एक अभूतपूर्व सार्वत्रिक असे जागतिक संकट आहे.
या संकट समयी आपण साथीत विविध प्रकारे बळी ठरलेल्या नागरिकांचे स्मरण करुन त्यांना आपली आदरांजली अर्पण करू. पण त्याच बरोबर द्वेष, आणि अन्याय सहन करत विविध संघर्ष करताना बलिदान करणाऱ्या सर्व धैर्यवान भारतीयांना केलेला तो मानाचा मुजरा असावा.