हिरवे जगू, हिरवे जपू म्हणत भ्रमंती करणारा ‘नितांत’ सायकलवेडा !

हिरवे जगू, हिरवे जपू म्हणत भ्रमंती करणारा ‘नितांत’ सायकलवेडा !

हिरवे जगू, हिरवे जपू म्हणत भ्रमंती करणारा ‘नितांत’ सायकलवेडा !

छोटी छोटी पावलं स्वबळावर चालू लागली तशी लगेचच त्याची सायकलशी मैत्री झाली. घर ते शाळा हे 4 किमीचं अंतर इतर मुलं बस, रिक्षा किंवा घरच्या वाहनाने पार करत असत, तेव्हा इयत्ता तिसरी - चौथी पासूनच त्याने हा आठ किमीचा प्रवास सायकलने करायला सुरुवात केली. सायकल प्रवास त्याच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग बनला आणि सायकलिंग ही पॅशन बनण्याच्या वाटेवर असताना इयत्ता सहावीत त्याने दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रसेवादल आयोजित मिरज - राधानगरी - कणकवली - मालवण - देवगड - वैभववाडी या मार्गावरील सामाजिक सदभावना रॅली मध्ये सहभागी होत ४५० किमी चा प्रवास पाच दिवसांत पूर्ण केला आणि त्याचा आत्मविश्वास दुणावला.

नितांत राजन चव्हाण, राहणार वरवडे , ता कणकवली, जि सिंधुदुर्ग. सायकलसोबतच पर्यावरणाची आत्यंतिक आवड असणारा हा विद्यार्थी त्या सायकल रॅलीनन्तर एकट्यानेच कधी 20 किमी, कधी 30 किमी, कधी 50 तर कधी 100 किमीचा सायकल प्रवास एका दिवसात करू लागला. या साऱ्या प्रवासात त्याचा निसर्गाशी सातत्याने संवाद सुरू असतो.

'हिरवे जगू, हिरवे जपू' हे त्याचं सायकलिंग करतानाचं ब्रीदवाक्य आहे. डांबरी गुळगुळीत रस्त्यांपेक्षा त्याला आडबाजूला असणाऱ्या कच्च्या पायवाटा जास्त खुणावतात. हमरस्ता सोडून झाडीने भरलेल्या दाट वनराईत तो सहज शिरतो.

वर्षभर साठवलेल्या बिया माळरानावर, टेकाडांवर उधळून देतो. झाडा पेडांशी बोलू पाहतो... मोकळं आभाळ आणि सृष्टीची बदलती रुपं न्याहाळतो.

सायकलिंग म्हणजे इंधन बचत पर्यायाने पर्यावरण रक्षण आणि सोबतच निरोगी आयुष्याची हमी या साऱ्याची त्याला लहानपणापासूनच चांगली जाणीव आहे. ही जाणीव त्याने इतरांमध्ये सुद्धा रुजवली. त्याचे अनेक मित्र-मैत्रिणी त्याच्या सोबत सायकल वरून लांब लांब भटकायला जातात. अनेकांची धूळ खात पडलेली सायकल आता निसर्गाच्या तालावर रस्त्यावर भटकू लागलीय. छोटे दोस्त मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडून सिद्धूदादाच्या भरवशावर निसर्गाशी संवाद साधू लागलेत.

कोकणचे वैशिष्ट्य असलेला..दुतर्फा गच्च झाडांनी भरलेला महामार्ग चारपदरी होऊ लागला आणि आजूबाजूचा निसर्ग क्रूरपणे ओरबाडला जाऊ लागला. त्याच्या सायकल प्रवासातील त्याची आवडती, हक्काची विसाव्याची ठिकाणे दिवसागणिक मुळासकट उखडली जाऊ लागली. त्या दिवसांत तो प्रचंड अस्वस्थ असायचा आणि मग वेळ मिळेल तसा आपल्या घराच्या आजूबाजूला त्यानेच रुजवलेल्या, वाढवलेल्या झाडांमध्ये जास्त रमायचा.

तुटून पडणाऱ्या एकेका झाडागणिक अधिकाधिक झाडे लावण्याचा त्याचा निर्धार अधिकच बळकट व्हायचा आणि त्याच्याकडून घरी दारी जिथे जमेल तिथे एकेक नवीन झाड रुजायची सुरुवात व्हायची.

अशातच त्याला कणकवली तील कनक सायकल रायडर्सची साथ मिळाली आणि जिल्ह्यातील सर्वच सायकल राईड्स शना नितांतची उपस्थिती अनिवार्य होऊ लागली.

 

सायकलच्या चाकांसोबत निसर्गाशी गुजगोष्टी करताना त्याच्या मनात अधिक मोठी स्वप्ने आकार घेऊ लागली. आणि एक दिवस... वय वर्षे 14.. एका दिवसात २०० किमीचा सायकल प्रवास करायचं त्याचं स्वप्न त्याने मोठ्या जिद्दीने पूर्ण केलं.

सायकलचा मार्ग होता वरवडे - कणकवली - विजयदुर्ग - कणकवली - पणदूर - कणकवली - वरवडे. त्याच्या या स्वप्नपूर्तीचा दिवस त्याच्यासह तो त्यांचे कुटुंबीय सर्वांसाठीच संस्मरणीय ठरला.

हे सायकलवेड त्याला अनेकार्थाने हवंहवंसं वाटतं. कधी न पाहिलेल्या रस्त्यांवरून एकट्यानेच करायचा प्रवास.. स्वतःशी व निसर्गाशी जवळीक.. कठीण प्रसंगी लागणारा निर्णयक्षमतेचा कस.. ओळखीच्या-अनोळखी लोकांशी होणार मैत्रीपूर्ण संवाद.. निसर्गाची जपणूक करायला हवी ही जाणीव.. निसर्ग व माणसांची वैविध्यपूर्ण रूपे.. या सगळ्याचा तो खूप आनंद लुटतो. त्यामुळे दर सायकल राईड सोबत त्याच्या जगण्याच्या खात्यात माणसांचा बँक बॅलन्स वाढत जातो.

आता त्याच्या स्वप्नांचा परीघ विस्तारु लागलाय.

"सायकलिंग मुळे मला निसर्गाशी जवळून संवाद साधता येतो. सायकल , समृद्ध पर्यावरण आणि सोबत निरोगी आरोग्य हे सुंदर समीकरण आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग बनवायला हवं." असं आवर्जून सांगणाऱ्या नितांतला सायकल वरून राज्य , देश समजून घ्यायचा आहे. संधी मिळालीच तर देशाच्या सीमाही त्याला सायकलच्या चाकांची सोबत घेऊन ओलांडायच्या आहेत.

अशा या नितांतच्या सायकल वेडाची दखल युनिसेफ या मुलांसाठी काम करणाऱ्या जागतिक स्तरावरील संस्थेने घेतली. सन २०२१ मध्ये चरखा-युनिसेफच्या अधिकृत वेबपोर्टलवर स्थान मिळवणारा महाराष्ट्रातील या वर्षीचा अठरा वर्षाखालील एकमेव विद्यार्थी ठरला.

आतापर्यंत .. आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान मुलांसाठी काम करणारी ही एक जागतिक स्तरावरील संस्था आहे.. नितांत चव्हाण हा चरखा #unicef च्या अभिकृत वेबपोर्टलवर स्थान मिळवलेला 2021 यावर्षीचा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी ठरला .

चरखा-युनिसेफ आणि लोकसत्ता लाईव्हने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या सायकल वेड्या आणि निसर्गवेड्या लेकराचा व्हिडीओ प्रसिद्ध केलाय....त्याच्या पर्यावरण पूरक पाच उपक्रमांचा समावेश असलेला व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मिडियाद्वारे विविध प्लॅटफॉर्मवर पब्लिश केलाय. त्याच्या कुटुंबियांसाठी आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच सुहृदयी मित्रपरिवारासाठी ही खूपच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती.

आता १ मे 2022.. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्याने आपल्या सायकल प्रवासाचा पुढील टप्पा सुरू केलाय. 'कणकवली - रत्नागिरी - रायगड - पालघर - ठाणे - मुंबई ( गेट वे ऑफ इंडिया ) - पुणे - सातारा - कराड - कोल्हापूर - गगनबावडा - कणकवली' असा त्याच्या या प्रवासाचा मार्ग आहे. हा सर्व प्रवास तो एकट्याने करतोय.  ५ मे २०२२ रोजी सकाळी तो मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे होता.

नेहमीच 'ना किसींसे कोई ईर्ष्या..ना किसींसे कोई होड.. मेरी अपनी मंजिले.. मेरी अपनी दौड..' या उक्तीला अनुसरून 'हिरवे जगू, हिरवे जपू' हे आपलं पॅशन जपणाऱ्या नितांतला त्याच्या या सायकल प्रवासासाठी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा .

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!