मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
नाशिक जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मकापीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते . यावर्षी मात्र , कोरोनाच्या भीषण संकटात मका खरेदीलाही मोठं ग्रहण लागलंय. कधी गोदामं उपलब्ध नाही तर मका साठवणुकीसाठी शासनाकडून होणारा बारदान पुरवठा ठप्प ! या कैचीत सापडलेला शेतकरी शासनाच्या नाकर्तेपणामुळे पुरता भरडला गेलाय..
दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खळ्यात आणि दारात काढून ठेवलेला मका हा खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. पावसाळा सुरु झाल्याने तो आता सडण्याच्या मार्गावर पडलाय. मायबाप सरकार तो खरेदी करेल, यासाठी शेतकरी खरेदीच्या दिशेने डोळे लावून बसलाय. परंतु, कधी गोदामं नाहीत तर कधी मका साठवणीकरीता बारदानच उपलब्ध नाहीत, अशा सबबी सांगून शासनाने शेतकऱ्यांची चेष्टा केलीय.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, शेतकरी हिताकरिता आधारभूत किमतीत मका खरेदी करण्याचे शासनास निर्देश आहेत..त्यासाठी पणन विभागाच्या अन्नपुरवठा नागरी विभागामार्फत आधारभूत किंमतीअंतर्गत मका खरेदी केला जात आहे.
मका साठविण्यासाठी बारदान उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही शासनाचीच आहे . परंतु या कोरोनाच्या काळात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून हा बारदानपुरवठा कासवगतीने होतोय, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा समन्वयक कुबेर जाधव दिली आहे.
परिणामी, हजारो क्विंटल मका शेतकऱ्यांच्या खळ्यात आणि दारात पडून आहे. पाऊस पडल्यामुळे तो घरात ठेवण्याचेही आता अडचणीचे ठरत आहे. घरात ठेवून अडचण करून घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शासनाने नाशिक जिल्ह्याकडून २५ हजार मका खरेदीची करण्याची घोषणा झाली, तेव्हापासून बागलाण, देवळा, कळवण तालुक्यातुन ऑनलाईन नोंदणी झालीय परंतु, अन्न पुरवठा विभागाकडून होणाऱ्या तुटपुंज्या बारदानामुळे मका खरेदी संथगतीने होत असल्याचे सोसायटी पदाधिकाऱ्यां कडून सांगितले जाते.
शासनाने घोषणा न करता तातडीने बारदान उपलब्ध करून शेतकऱ्यांकडून मका खरेदीचा वेग वाढवावा, अशी मागणी कुबेर जाधव यांनी केली आहे.
News by Praful Kedare
पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक.
बातमी संबंधित विडियो :