लतादिदी तू गेलीस अन् सारं जगच जणू दुःखात बुडालं. खूप हळहळ वाटली ग् तुझी बातमी ऐकून. तू लहान मोठ्या सर्वांची लाडकी लता दिदी होतीस. सगळीकडे तुझ्याच बातम्या, तुझीच चर्चा. असं कुणीच नव्हतं की त्यांना ही बातमी समजली नाही. एक तूच अशी होतीस की स्वतःच्या मरणाची बातमी दुसऱ्याकडून ऐकायला जिवंत नव्हतीस.
कितीतरी पुरस्कारांनी सन्मानित झालेलं तुझ छानसं, हसरं व्यक्तिमत्व. सर्वांनी तुला दिलेला बहुमान. सर्वांच्या मनात घर करुन राहिलेली तू. गोमंतक मराठा समाजातील एक लाडकी पोर. सुंदर, सोज्ज्वळ गानकोकिळा. साक्षात तूच तर सुरांची सरस्वती ! तिनेच तर तुला आशीर्वाद दिला.

अशीच एक जुनी क्लिप व्हॉट्सॲपवर फिरत होती. ज्यात प्रिया तेंडुलकर तुझी मुलाखत घेत होती. मी ती क्लिप बघितली. तुझ्या त्या उत्तराने मन थोड बैचेन झालं. प्रियाने तुला प्रश्न विचारला की पुढचा जन्म मिळाला तर पुन्हा लता मंगेशकर व्हायला आवडेल का? पण तू चक्क नाही म्हणून सांगितलस. किती ठामपणे उत्तर दिलंस.

प्रियाचा पुन्हा प्रश्न, असं का? त्यावर तू प्रांजळपणे, दिलखुलासपणे म्हणाली, लता मंगेशकर होणं तितकं सोप्प नाही. फार खडतर प्रवास आहे तो.
मला माहितीय तू खूप साऱ्या गोष्टींचा त्यागही केला आहेस. मी मात्र तुझ्या या नाहींने शांतपणे विचार करू लागले. इतकं सारं काही मिळालेलं असताना तू असं का म्हणतेस? इतकी प्रसिद्धी, इतकं वैभव, लोकांकडून मिळणारं प्रेम लाभूनही तुला पुन्हा लता का नाही व्हायला आवडणार?

तुझ्या अंतर्मनात नेमकं काय सुरू होतं कुणास ठाऊक? गायनाची ही सिध्दी प्राप्त करून घेण्यासाठी तू किती अपार कष्ट घेतलेस? हे तुझ्या इतकं परिपूर्ण कोण बरं सांगू शकणार?
सारं काही तर होतं तुझ्याकडे. पण तरीही तू असं म्हणावं? अर्थात स्त्रीसुलभ भावना तुझ्याही असतीलच ना ग्. तू इतकी प्रसिद्धीची उंची गाठलेली. या सर्व सुखांच्या पलीकडे गेलेली. साक्षात सरस्वतीलाच तू वरलेलं. तरीही या भावना कधीतरी, कुठेतरी डोकं वर काढतातच.
संसार करणं, त्यात थोडंसं रमणं, होणारा त्रास, पडणारे कष्ट जोडीदाराशी शेयर करावेत, आपली मुलं, आपला जोडीदार यांच्यासोबत कधी हसावं, कधी मनसोक्त रडावं, तर कधी खोटं खोटं भांडणही करावं. कोणीतरी आपला रुसवा काढावा, कधी आपण त्यांचा रुसवा काढावा. असंही कधीतरी तुला वाटलंच असेल ना.
स्वर्गसुख पायाशी लोळण घेत असलं तरी सामान्य लोकांसारखं आपलंही थोडं जग असावं असं वाटलंच असेल ना तुला. पण तू खूप समजूतदार होतीस ना. स्वतः आनंदी राहून इतरांना गाण्याच्या स्वरूपात आनंद देत राहिलीस.

कित्येक भाषेतून, कित्येक भावभावनांची तुझी गाणी अजरामर झाली. तू गायलेलं प्रत्येक गाणं सर्वांच्या मनात घर करुन राहिलं. ती गाणी ऐकत ऐकतच आम्ही मोठे झालो. तरीही ती अवीट गोडी आजही तशीच आहे.
तू लताच्या जन्माला नाही म्हणालीस आणि बघ माझ्या मनात किती विचार येऊन गेले... अशी लता दिदी पुन्हा होणे नाही.
रहे ना रहे हम, महका करेंगे.... तुझ्या बाबतीत हेच खरं...!
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com