बळीचं राज्य येणारंच !!!

बळीचं राज्य येणारंच !!!

बळीचं राज्य येणारंच !!!

भारतीयांच्या ज्या ज्या काही धर्मश्रध्दा आहेत, त्यात विष्णूला मोठी मान्यता आहे. ज्या ज्या वेळी धर्मावर संकट आलं, तेव्हा विष्णूने वेगवेगळे अवतार घेऊन ते दूर केलं, असं मानलं जातं. त्यातलाच एक अवतार, वामनावतार. त्याने कोणाला संपवलं, तर महाबलीला, म्हणजेच आपल्या बळीराजाला.

वामन आजही वर्तमानात बळीराजाला पाताळात ढकलू पाहतोय. सोप्या भाषेत सांगायचं तर जमीनीत गाडू पाहतोय. पण बळीराजा मोठा हट्टी आहे. तो आपलं डोकं वर काढतोच.‌ हे कसं शक्य आहे? जर हा हजारो वर्ष हिंदूंचा देश आहे आणि धार्मिक मान्यतांनुसार, विष्णू हा हिंदूंचा देव आहे, तर ईडा पीडा जाओ आणि बळीचं राज्य येवो, असं म्हणणारे लोक कुठल्या धर्माचे आहेत? ते इतकी वर्ष हिंदूंच्यात देशात बळीला कसे काय पुजताहेत? केरळाचं नवं वर्षच बळीच्या पुजनाने सुरू होतं.

हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूभक्त होता म्हणे. हिरण्यकश्यपूला ते आवडत नव्हतं, म्हणून म्हणे त्याने चक्क आपल्या बहिणीच्या मदतीने प्रल्हादला जाळून मारायचा कट रचला, पण त्यात तीच जळून मेली. ही सगळी देवकृपा. म्हणजे आजच्या भाषेत कटकारस्थानं. प्रल्हादच्या काकांचा विष्णूने वराह अवतारात काटा काढला म्हणे आणि बापाचा नरसिंह अवतारात. ‌पुन्हा प्रल्हादच्या नातवाच्या म्हणजे महाबलीचा अर्थात, बळीराजाचाही काटा वामनावतारात काढला गेला. एका राक्षस कुटुंबातल्या पिढ्या नामशेष करण्यासाठी विष्णूने तीन अवतार घेतले, तरीही आज हजारों वर्षांनंतरही ओणमच्या निमित्ताने बळीराजा पुजला जातोय.

बळीने आपल्या पराक्रमाने स्वर्गही जिंकला होता, असं म्हटलं जातं. विवेकाने विचार केला तर हिमालयाच्या माथ्यापर्यंत बळींची सत्ता होती, असं आपण तर्काने म्हणू शकतो. त्याला ढकलला नरकात. वामनाने तीन पावलं भूमी मागितली. एकात स्वर्ग पादाक्रांत केला, दुसऱ्यात पृथ्वी आणि तिसरं बळीच्या डोक्यावर ठेवलं. ‌बळीच्या डोक्यावर पाऊल ठेवल्याशिवाय पृथ्वी पादाक्रांत करणं कसं शक्य आहे? आपण हो म्हणायचं आणि पुढे सरकायचं. आपला विवेक वापरायचा. जे प्रत्यक्षात घडू शकतं, त्याचाच विचार करायचा.

बळीला कपटाने कंगाल केल्यावर त्याला देवांनी नरकात म्हणजे दक्षिणेकडे ढकलला असल्याचा अंदाज आपण बांधू शकतो. भारताचा नकाशा डोळ्यासमोर धरला तर स्वर्ग कुठे, तर वर, म्हणजेच उत्तरेकडे आणि नरक कुठे, तर खाली, म्हणजेच दक्षिणेकडे !!! बळी दक्षिणेत स्थिरावला, समतेचं, धनधान्यांनी विपुल लोकाभिमुख राज्य त्याने प्रस्थापित केलं, म्हणून तो दक्षिणेकडे आजही पूज्य आहे. आजही लोकांना वाटतं, बळीचं राज्य येवो.

बळी उत्तरेकडे नाही. उत्तरेत राम, कृष्ण आहेत. त्यांच्या संदर्भाने वापरले जाणारे रामभरोसे, कृष्णकृत्य या शब्दांचा बोलीभाषेतील वापर नकारात्मक अर्थाचा आहे. गरीबांना, पिडीतांना, शेतकऱ्यांना, महिलांना कोणी वाली नाही, हे मात्र सकारात्मक अर्थाने बोललं जातं. आधीच मर्कट हेही नकारात्मक अर्थाचं आहे. ज्यांच्याकडे लेखणीचा अधिकार होता, त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन स्वत:ची भलामण करणाऱ्या, उदात्तीकरण करणाऱ्या कथा रचल्या, मिथकं रचली, पण ज्यांना लेखणीचा अधिकारच नव्हता, बोलावाचायची मुभा नव्हती, त्यांनी बोलाचालीतूनच आपला इतिहास जपला. ज्ञानार्जनाची संधी मिळताच त्याचं दस्तावेजीकरण केलं. तो ठोस संदर्भांनी सिध्द केला. तोच दडपण्याचा वामनी खटाटोप पुन्हा सुरू झालाय. पण आता धर्माच्या नावावर शोषण करणं तितकं सोपं राहिलेलं नाही. पलटवार होणारच आणि बळीचं राज्य येणारच.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!