कधी तू कधी मी…!!!

समीर आणि मधुरा हे नवीन जोडपं. अतिशय आधुनिक पद्धतीने जगणारं. कधी तू, कधी मी असंच राहणारं. एकमेकांना समजून घेणारं. दोघेही नोकरी करत असल्याने एकमेकांच्या अडचणी लक्षात घेऊन वागत होते. पडेल ते काम दोघेही करत होते. त्यामुळे भांडणाला काही कारणच उरत नव्हतं. सगळं कसं छान आणि सुरळीत.

पण सासूबाईंना ते पटायचं नाही.. सारखी आपली कटकट. "आम्ही नव्हतो बाई आमच्या नवऱ्यांना कामं सांगत." "सगळं कसं आपलं आपणच उरकून ठेवत होतो." "नवऱ्याची तर इतकी ठेप ठेवली."तो म्हणेल तसं आणि तसंच व्हायचं घरात.. पण आताची ही पिढी नवऱ्याला नुसती झुलवतेय. तोही आपला झुलतोय तिच्या मागे.

अशी ही रोजची कटकट ऐकून शेवटी मधुराने आईंना एकदा सुनावलेच. तेही अतिशय लाघवी आणि प्रेमळ भाषेत. हे पहा आई, पहिल्यासारखे आता राहिले नाही. आताचा आमचा संसार म्हणजे कधी तू, कधी मी असाच राहणार. ते तुम्हीच आता अंगवळणी पाडून घेतलं पाहिजे..

सासूबाई अवाक् होऊन म्हणाल्या , कधी तू, कधी मी म्हणजे ग काय? उगीच काहीही बोलू नकोस? संसार म्हणजे नाटक नव्हे कधी तू, कधी मी करायला. हे पहा आई, आताच्या जमान्यात अनेक क्षेत्रात मुली सुध्दा अग्रेसर आहेत. कामाचा ताणसुध्दा मुलांइतकाच मुलींनाही सहन करावा लागतो. दिवसभर ऑफिसची कामं करून जीव थकायला होतो.

मुलांइतकाच पैसा जर त्याही घरात आणत असतील तर नको का त्यांचाही सन्मान व्हायला. विचार करा, जर घरातूनच त्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळत नसेल, तर त्यांनी इतरांकडून काय अपेक्षा करावी. जेव्हा म्हंटल जातं मुलगा मुलगी समान, मग नको त्यानेही घरातली कामे करायला? अर्थात ज्याला त्याला वेळ मिळेल तसा हातभार लावावा घरच्या कामांना.

सगळच त्याचं बरोबर आणि तिचं नेहमीच चूक, असं नाही ना होत . ती सुध्दा बरोबर असते ! तिलाही काळजी असते स्वतःच्या संसाराची. तिलाही कळतं तो काम करून थकलाय . पण त्याचवेळेस ती सुध्दा तर थकलेलीच असते. पण तरीही काहीही कुरबुर न करता, करतेच ना सगळं. मग त्यात त्याला स्वतःलाच जर वाटत असेल तर केलीच त्याने काही कामात मदत तर अडलं कुठे? वाद तर होत नाहीत.

मला सांगा आई, तुम्हाला नाही को हो वाटलं,असं एकदा तरी की बाबांनी तुम्हाला थोडी तरी मदत करावी. की तुम्हालाही त्यांचाच पुरुषी अहंकार जपायचा होता. जेव्हा दोन्ही चाकं कोणतीही कुरबुर न करता चालतील तेव्हाच तर इच्छित स्थळी पोहचण्याचं काम व्यवस्थित होईल. हा आता,थोडेसे उन्नीस-बिस होत राहते. त्याच्याशिवाय का गोडी आहे संसाराला? कधी आंबट, कधी गोड, कधी तिखट हवंच की!

मधुराचे हे शब्द ऐकून सासूबाई छान गालात हसल्या. कुठे ग शिकता हे समजून सांगण्याचं तंत्र? बरोबर आहे तुझं ! मी नुसतीच सतत खपत राहिले संसारासाठी. पण कधी बोललेच नाही ह्यांना मला होणाऱ्या त्रासाबद्दल. कधी हिंमतच झाली नाही. त्यामुळे, ना कधी स्वतःच्या आवडत्या गोष्टी करता आल्या आणि ना कधी कोणाला काही सांगता आलं.

चुकलंच नाही का थोडं माझं. आताची ही पिढी असा विचार करून छान संसार करणारी आहे हे मला कसं कळलं नाही? असेच मुक्त बहरत रहा आणि कधी तू, कधी मी असाच संसार करा.."love you beta" असं म्हणून मधुराला एक छानसं आलिंगन दिल. एकटक तिच्या पाणीदार आणि स्वाभिमानी डोळ्यात पाहत राहिल्या. न बोलताच डोळ्यांनीच हितगुज करत राहिल्या.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

comments
 • सौ उज्वला राजेंद्र डूंबरे

  July 18, 2022 at 3:25 pm

  खूपच छान व ह्दयस्पर्शी लेखन नंदा गवांदे

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!