जस्टीस लोयांनंतर आणखी एका न्यायाधीशांची हत्या !

जस्टीस लोयांनंतर आणखी एका न्यायाधीशांची हत्या !

जस्टीस लोयांनंतर आणखी एका न्यायाधीशांची हत्या !

झारखंड राज्यातील धनबाद येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येने न्यायव्यवस्थेत खळबळ माजलीय. स्थानिक वकील संघटनांपासून ते सर्वोच्च न्यायालयातील वकील संघटनांपर्यंत सदर घटनेत आवाज उठवला गेलाय. चिंता व्यक्त केली गेलीय. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेतलीय आणि झारखंड उच्च न्यायालयानेही सदर प्रकरणातील तपासाचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत. पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केलंय आणि दोघां जणांना अटकही केलीय.

न्यायाधीश उत्तम आनंद यांचा सकाळफेरीस जाताना वाहनाने ठोकरून अपघाती मृत्यू झाला, अशी सुरुवातीची शक्यता होती. पण सदर घटनेचं सीसीटीव्ही चित्रण पसरलं आणि पोलिसांची झोप उडाली.

उत्तम आनंद पहाटे साडेपाचच्या सुमारास आपल्या निवासी वसाहतीतून नियमित सकाळफेरीस बाहेर पडले होते. अगदी पाचशे फूटावरच त्यांना वाहनाने ठोकर दिली. उत्तम आनंद रस्त्याच्या डाव्या बाजूने रस्ता सोडून चालत होते. अचानक एका रिक्षा टेम्पोने रस्त्याचा मध्य सोडून त्यांच्या दिशेला मोर्चा वळवला, धडक दिली आणि टेम्पो निघून गेला.

उत्तम आनंद रस्त्यावर कोसळल्यावर कोणीतरी पाहिलं आणि धावाधाव केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं ; परंतु त्यांचा मृत्यू ओढवला.

सीसीटीव्हीतील दृश्य स्पष्ट दर्शवतंय की न्यायाधीश उत्तम आनंद यांची हत्या झालीय. पोलिसांनी वेगाने सूत्रं हालवून टेम्पो शोधून काढलाय. तो आदल्या रात्रीच चोरीला गेला होता आणि सकाळीच हत्येच्या घटनेत त्याचा वापर झाला. लखन वर्मा हा चालक आणि त्याच्या एका सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली. टेम्पोच्या मूळ मालकालाही हुडकण्यात पोलिसांना यश आलंय.

हत्येचं नेमकं कारण आणि सूत्रधार शोधणं हे आता झारखंड पोलिसांसमोरचं आव्हान आहे. या घटनेने न्यायाधीश लोया यांचं हत्या प्रकरण पुन्हा ताजं झालं आहे.

हत्येचा आरोप असलेल्या दोन बड्या धेंडांची प्रकरणं न्यायाधीश उत्तम आनंद यांच्यासमोर होती. दोन गॅंगस्टरांचे जामीन त्यांनी फेटाळलेले होते. कोळशाच्या अवैध वाहतुकीचंही प्रकरण त्यांच्याकडे होतं. त्यांनी जामीन फेटाळलेला एक आरोपी एका राजकीय नेत्याच्या कुटुंबातीलही आहे.

पोलिस सगळ्या शक्यता पडताळून पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयातील वकील संघटनेने सदर घटनेत सीबीआय तपासाची मागणी केलीय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!