केंद्र सरकार पंचगव्यातून घडवणार उद्याचा सुदृढ बुध्दिमान भारत !!!

केंद्र सरकार पंचगव्यातून घडवणार उद्याचा सुदृढ बुध्दिमान भारत !!!

केंद्र सरकार पंचगव्यातून घडवणार उद्याचा सुदृढ बुध्दिमान भारत !!!

ग्रामीण भागात भले रस्ते नसतील, पिण्याच्या पाण्याची सोय नसेल, चांगलं शिक्षण नसेल, पण केद्र सरकार गाईचं मूत्र आणि शेणमिश्रीत औषध गरोदर महिलांपर्यंत पोचवणार आहे‌. शहरातील महिला सरकारच्या या प्रयत्नांना कितपत प्रतिसाद देतील, याबाबत साशंकता असल्याने ग्रामीण भागात अल्पशिक्षित महिलांनाच लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात बहुतेक केंद्र सरकार आहे. प्रत्येक गोष्टीचं धार्मिकीकरण करण्याचा सरकारचा अट्टाहास आता लोकांच्या आरोग्यापर्यंत जाऊन पोचलाय.

राष्ट्रीय कामधेनु आयोग आता पंचगव्य निर्मितीवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. भारतातील ग्रामीण भागात गरोदर महिलांना हे पंचगव्य औषध म्हणून दिलं जाणार आहे, त्यासाठी वैद्यांची नेमणूक सुध्दा करण्यात येणार आहे.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय कामधेनु आयोगाची स्थापना केली होती. गाईंचं संरक्षण व संवर्धन हे या आयोगाचं प्रमुख काम आहे. सरकारने आयोगाच्या कामासाठी ७५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांचा गिनीपीग म्हणून वापर होऊ नये !

भारतातील ग्रामीण भागातील गरोदर स्त्रियांना गरज आहे  मेंदूचे आणि मज्जारज्जूचे व्यंग होऊ नये म्हणून पहिल्या तीन महिन्यात दिल्या जाणाऱ्या फोलिक ऍसिडच्या गोळ्यांची..आणि त्या  गर्भधारणा झाल्यावर लवकरात लवकर सुरू करायला हव्यात,पहिल्या तीन महिन्यात बाळाचे सर्व अवयव तयार होतात तेंव्हा अश्या प्रबोधनाची. भारतातील ग्रामीण भागातील गरोदर स्त्रियांना गरज आहे पुरेश्या लोह , कॅल्शियम,प्रोटीनयुक्त आहाराची.आणि तो त्यांना मिळावा या साठीची समाजव्यवस्था निर्माण होण्याची..भारतातील ग्रामीण भागातील गरोदर स्त्रियांना गरज आहे दर्जेदार सरकारी  रुग्णालयांची जिथे प्रचंड गर्दी, अस्वच्छता, अपुरे डॉक्टर्स आणि कर्मचारी, नित्कृष्ट इंजेक्शने औषधे यामुळे त्यांचा मूलभूत आरोग्य हक्कच त्यांना नाकारला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्राची पदवीधर आणि गेल्या 10 वर्षांपासून स्त्री रोगतज्ञ म्हणून ग्रामीण भागात काम करत असताना हजारो स्त्रियांची सुरक्षित प्रसूती आणि अतिशय सुदृढ बालकांच्या जन्माची साक्षीदार होत असताना पंचगव्य अत्यावश्यक आहे असे मला कुठेही आढळलेले नाही. भारतातील ग्रामीण भागातील गरोदर स्त्रिया आधीच अत्यंत वंचित आणि शोषित आहेत. त्यांना सरकारी प्रणालीतून पंचगव्य खायला देऊन गिनीपिगसारखं वापरलं जाऊ नये ही किमान अपेक्षा आहे.

डाॅ. साधना अमोल पवार स्त्रीरोग तज्ञ

आयोगाचे अध्यक्ष डाॅ. वल्लभभाई काथिरिया गुजरातमधून भाजपाचे खासदार आहेत. पेशाने सर्जन असलेले काथिरिया लहानपणापासून रास्वसंघाचे स्वयंसेवक आहेत. गुजरातेतही त्यांनी गौसेवा आयोगाचं अध्यक्षपद सांभाळलं आहे. त्यांचं आवडतं पुस्तक भगवद्गीता व आवडतं संगीत भक्तीसंगीत आहेत.

पाच हजार शस्त्रक्रिया केल्याचा दावा करणाऱ्या काथिरिया यांनी पदभार घेतल्याबरोबर पंचगव्य निर्मितीला प्राधान्य दिले आहे. गायीचे मूत्र, शेण, दूध तूप आणि दही या पाच घटक पदार्थांपासून पंचगव्याची निर्मिती करण्यात येणार आहे. गरोदर महिलांना ते औषध म्हणून दिल्यास अत्यंत बुद्धिमान आणि सुदृढ बालक जन्माला येतील, असं आपल्या शास्त्रात म्हटलेलं असल्याचा काथिरिया यांचा दावा आहे.

हे औषधी गुण देशी गायींमध्ये असल्याने देशी गायींची वृध्दी करण्यावर सरकारचा जोर असल्याचं काथिरिया यांचं म्हणणं आहे.

ऐका, काय म्हणणं आहे, पंचगव्य चिकित्सेबद्दल डाॅ. वल्लभभाई काथिरिया यांचं

पंचगव्य चिकित्सेची सुरुवात पंचतारांकित रुग्णालयांपासून करायला हवी…

एका चांगल्या बाळंतपणासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांचं काय? रोजगार, पाणी इत्यादीबाबतची महिलांची परवड सरकार आधी थांबवणार आहे की नाही? पंचगव्याचा वापर सरकार नेमका काय म्हणून करू पाहतंय, औषध म्हणून की पूरक आहार म्हणून? ते देताना सरकार जो दावा करतंय, सुदृढ आणि बुध्दिमान बालकं जन्माला येण्याचा, त्याला आधार काय? त्यावर काही संशोधन झालंय का, हा दावा सिध्द झालाय का, तसा दस्तावेजी अहवाल तयार झालाय का, कोणी मान्यता दिलीय त्याला? या दाव्यावर भारतीय संशोधक, विज्ञान परिषद, वैद्यकीय परिषद यांचं काय म्हणणं आहे? भारतीयांकडे अनेक गोष्टींचं पारंपरिक ज्ञान आहे, त्याचं जतन करायला हवं,  त्याचा उपयोगही करायला हवा. पण त्याआधी ते वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध व्हायला हवे. जसं हळदीच्या औषधी गुणधर्मांचं आपण पेटंट घेतलं, तसं जागतिक पातळीवर पंचगव्याचं पेटंट का घेत नाही ? आणि सगळ्यात महत्त्वाचं की इतकंच जर सरकार पंचगव्याच्या उपयुक्ततेबाबत ठाम आहे, तर अंगणवाड्यांऐवजी देशातील पंचतारांकित रूग्णालयांपासून सुरूवात का नाही करत?

संध्या नरे-पवार  (लेखिका / पत्रकार)

वास्तविक, जर्सी गाय मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन देत असल्याने शेतकरी देशी गाय पाळण्यास उत्सुक नसतात. पण देशाला सुदृढ बालकं देण्याचा चंगच सरकारने बांधलेला असल्याने व त्यातून आपण हिंदुत्वच जोपासतो आहोत, हे सरकारला आपल्या मतदारांना भासवायचे असल्याने आता शेतकऱ्यांच्या माथी देशी गायीचे मारल्या जातील, अशी शक्यता आहे.

देशभरातून देशी गायींच्या ४४ जाती संवर्धनासाठी निवडलेल्या गेलेल्या असून, गुजरात ची गिर, कांकरेज, पंजाब ची शाहीवाल, यूपी ची गंगातेरी, लालसिंधी, मध्य प्रदेश ची मालवी, दक्षिण भारता ची कृष्णा वैली, अंगुल और वेचरू प्रमुख आहेत.

पंचगव्याची उपयुक्तता सिध्द झालीय

पंचगव्य हे कॅन्सरवर प्रभावी ठरले आहे, हे शास्त्रीय दृष्ट्या सिध्द झाले आहे. गायीच्या शेणाने सारवलेल्या अंगणात व परिसरात डास, माशा व झुरळे फिरकत नाहीत. गायीच्या शेणाने लेपाचा उपयोग सुलभ प्रसुतीसाठी (विना सिझरींग) केला जातो. करोडो रु.कमविणारया फार्मा कंपन्या व त्यांची भलामण करणारे डॉक्टर पंचगव्याला विरोध करणारच. त्यांचे हितसंबंध या विरोधात गुंतले आहेत. सर्वसामान्यांना स्वस्त व शाश्वत औषधोपचार उपलब्ध होत असतील तर आपले”पुर्वग्रह” बाजूला ठेऊन त्याचे स्वागतच करायला हवे. सद्या गरोदर महिलांना पंचतारांकित हाॅस्पिटल मध्ये दिली जाणारी एलोपेथीक औषधे व टाॅनिक (high nitrate) ही पंचगव्या(low nitrate)पेक्षा कितीतरी पटीने घातक आहेत. पंचतारांकित हाॅस्पिटल ही मल्टिनॅशनल फार्मा कंपन्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी असल्याने त्या पंचगव्य औषधोपचार स्वीकारणार नाहीत. जे सत्य, चांगले व समाजहितासाठी आहे ते कुठल्याही विचारातुन(डाव्या/उजव्या) येवो त्याचे मी स्वागत करतो. गोमुत्र, देशी गायीचे संवर्धन या विषयावर मतप्रदर्शन करण्यापुर्वी त्या विषयाचे सखोल व शास्त्रीय अध्ययन करणे गरजेचे आहे. विरोधासाठी विरोध हे राजकारणात ठिक पण समाजकारणात नव्हे.

गुणवंत पाटील, पर्यावरण तज्ञ

आयुषने आणि सूक्ष्म व लघु उद्योग तसेच पशुपालन मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी पंचगव्य निर्मितीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. लघु उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून पंचगव्याची निर्मिती आणि वितरण केलं जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना पंचगव्याचे सेवन कसे व किती प्रमाणात करावे, याचे मार्गदर्शन करण्यासाठी मान्यताप्राप्त वैद्यांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. वैद्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असून, अंगणवाडीमार्फत ते महिलांशी संवाद साधतील.

बातमीखालील प्रतिक्रिया रकान्यात आपलं मत जरूर नोंदवा.

MediaBharatNews

Related Posts
comments
 • Goraksha Raosaheb chitale

  June 15, 2021 at 2:39 pm

  दिवसेंदिवस पैशासाठी प्रसुती करतांना जाणीवपूर्वक शस्त्रक्रिया करण्यात येत आहे ; पंचगव्य प्राशन केले तर बिना कष्टाने आरामात प्रसुती होते; परंतु यांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून या बातमीने आकसबुद्धीने गाईविषयी विरोधी मत मांडले आहे
  अनुभव घ्या आणि मगच हिंदूंची गाय आणि भाजपचे मतदानासाठी षडयंत्र यावर बोललेले बरे…!

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!