मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
शरद पवार आणि पप्पू कालानी हे अतूट नातं आहे. असं सांगितलं जातं की सुधारकराव नाईकांनी पोलिसांमार्फत खूप प्रयत्न केला की कालानीने पवारांचं नाव घ्यावं. पण कालानीने दाद दिली नाही. त्याची जाणीव ठेवून पुढे पवारांनी पप्पू कालानीला एकतर्फी पाठबळ दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली, तेव्हा पप्पू जेलमध्ये होता. त्यावेळी उल्हासनगरात पक्ष आणण्याचं, चालवण्याचं, वाढवण्याचं काम पवारांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलं. २००२ मध्ये कालानी जामीनावर बाहेर येताच पवारांनी एका रात्रीत तो पक्ष कालानीला आंदण दिला. पक्ष रूजवणाऱ्या मेहनती कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. पुढे उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे कालानी परिवाराची प्रायवेट लिमिटेड कंपनी झाली.
अनेकांनी कालानीच्या नेतृत्वाला आव्हान दिलं, पक्षात फाटाफूट झाली, पण पवारांनी कालानीच्या डोक्यावरचा हात काढला नाही. किती तरी वेळा पक्षातील इतर नेत्यांनी आर आर, पिचड, गुरूनाथ कुलकर्णी यांनी कालानीला दुखावणारे निर्णय पक्षहितातून घेतले, पवारांनी ते फिरवले. पवारकार्डपुढे कालानीविरोधक नेहमीच नामोहरम झाले. काँग्रेस, नेटिव पीपल्स पार्टी, उल्हासनगर पीपल्स पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…पक्ष कुठलाही असो, कालानीचा नेता पवारच; म्हणूनच पप्पू जेलमध्ये गेल्यावर पक्षाने आमदारकी ज्योती कालानींकडे सोपवली.
२०१७ च्या उल्हासनगर मनपा निवडणुकीत पप्पू कालानीचा मुलगा ओमी अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेऊन भाजपासोबत गेला. भाजपातही तो टीम ओमी कालानी नावाने वेगळा गट करून आहे. विधानपरिषद निवडणुकीत त्याने राष्ट्रवादी विरोधात काम केलं. भाजपाचा मेळावा असला की तिथे ताकद दाखवतो, राष्ट्रवादीचा मेळावा असला की तीच माणसं पाठवून आईची पत राखतो. उल्हासनगरात राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहेत. ते चारही भारत राजवानीच्या पॅनल प्रभागातील आहेत. सगळे कालानी समर्थक भाजपात गेल्याने भारत राजवानीने जिल्हाध्यक्ष पद मागितलं होतं, पण राष्ट्रवादीने ते ज्योती कालानींकडेच ठेवलं. अर्थात, हा पवार करिश्माच आहे.
आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्योती कालानींच्या भाजपा प्रवेशाची चर्चा आहे. पण त्या बहुतेक पक्षांतर करणार नाहीत. सून पंचम कालानी भाजपातून महापौर आहेत, ज्योती कालानी राष्ट्रवादीकडून आमदार. दोन्ही पक्ष त्यांनी अडवून ठेवलेत. जो पक्ष विधानसभेचं तिकीट देईल, त्या पक्षाशी अंतिम घरोबा. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष कालानी परिवारावर गळ टाकून आहेत.
पक्षाची ध्येयधोरणं, तथाकथित पुरोगामीत्व, पक्षनिष्ठा किंवा पक्षशिस्त नावाचा प्रकारच इथे अस्तित्वात नाही. राजकारणाच्या या उल्हासनगरी माॅडेलच्या पार्श्वभूमीवर सद्याची पक्षांतरं तपासून पाहिली पाहिजेत.
– किरण सोनावणे
(लेखक पत्रकार, सामाजिक जाणकार व राजकीय अभ्यासक आहेत.)