बालविवाह प्रतिबंधक कायद्यात लग्न करणारे, लावणारे, जमवणारे, प्रोत्साहित करणारे, उपस्थित राहणारे अशा सगळ्यांना समान आरोपी समजण्यात आले असून शिक्षेची तरतूद सारखीच आहे. त्यामुळे केवळ कुटुंबालाच न गोवता बालविवाहात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभागी सगळ्याच घटकांविरोधात गुन्हा दाखल झाल्यास व अशा लोकांना प्रत्यक्ष शिक्षा भोगावी लागल्यास कायद्याची जरब बसू शकेल, अशी मागणी वजा सूचना निर्धार सामाजिक संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल यांनी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील पेनुर गावातील बालविवाह घटनेच्या संदर्भाने सत्यभामा सौंदरमल यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांना ईमेल केलाय. या गावातील एक नऊ वर्षाच्या चिमुरडीचा विवाह कोन्हेरी गावातील अविनाश शेळके या २१ वर्षीय युवकासोबत १ डिसेंबरला झाला. विशेष म्हणजे ३० नोव्हेंबरला हळदीचा कार्यक्रम आणि पुन्हा ७ डिसेंबरला मुलीचं सोळकं (सत्यनारायण) झाल्याचंही वृत्त आहे.

समाजमाध्यमातून ही माहिती मिळाल्यावर सत्यभामा यांनी चाईल्ड लाईनला कळवली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे आणि पोलिसांनी संबंधित गावात जाऊन नवरदेवाला ताब्यात घेतलं, खरं पण संबंधित गावातून मुलगी गायब करण्यात आली असुन मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतं.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल वाघमारे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असल्याने आम्ही लागलीच चाईल्डलाईनचे टीम मेंबर-योगेश रुद्रय्या स्वामी आणि कर्मचारी दत्तात्रय वसंत शिर्के यांना सोबत घेवुन मोहोळ पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण या ठिकाणी आलो. सदर ठिकाणी आम्ही घटनेची माहीती सांगितली. त्यानंतर मोहोळ पोलिसांना घेऊन नवरा मुलाच्या घरी दुपारी दोन वाजता गेलो असता मुलगा व त्याचे वडील दोघे मिळुन आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने मामाच्या ९ वर्षाच्या मुलीसोबत लग्न केल्याचे कबुल केले. त्याच्या मोबाईलमध्ये लग्नाचे फोटोही दिसून आले. मुलीबाबत विचारणा केली असता त्याने, काल कोणीतरी पोलीसांत तक्रार करणार आहे असे समजल्यावर मुलगी आणि तिची आई कुठेतरी निघुन गेले आहेत असे सांगितले. त्यानंतर आम्ही मुलीच्या पेनूर येथील राहते घरी जाऊन पाहीले असता मुलीच्या घरास कुलूप होते व शेजाऱ्यापाजाऱ्यांंनाही काही माहिती नव्हती.
लग्नाचे फोटो, हळदीचे फोटो, मुलाची कबुली सगळं असताना.या मुलीसोबत काहीतरी विपरीत घडलं असण्याची दाट शक्यता असून त्यातूनच सदरील मुलगी गायब असल्याचा बनाव केला गेल्याची भीती सत्यभामा सौंदरमल यांनी व्यक्त केलीय.
पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असून या बालविवाहाबाबत कार्यवाही करताना राज्यातील बालविवाहप्रतिबंधक अधिकारी अर्थात ग्रामसेवक टाळाटाळ करत असल्याने राज्यात बालविवाहप्रतिबंधक कायद्याची प्रभावी अमंलबजावणी होत नाही. यामुळे लाखो मुलींचे बालविवाहामुळे शिक्षण बंद केल्याने आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.
लाॅकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात ७९० बालविवाह रोखल्याची आकडेवारी महिला व बाल विकास मंत्रालयानेच दिली आहे. त्यामुळे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी सौंदरमल यांनी केलीय.
बालविवाह जमवणारे, करणारे, प्रोत्साहन देणारे, उपस्थित राहणारे अशा सगळ्यांसाठीच कायद्यात दोन वर्षांच्या कठोर शिक्षेची व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा आहे. याचा अर्थ कायदा बालविवाहाच्या गुन्ह्यातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग सारख्याच नजरेने पाहतो, याकडे सौंदरमल यांनी लक्ष वेधलंय.
याच, सोबत अशा विवाहातून मुलींनी बाहेर पडण्यासाठी जी २० वर्षांपर्यंतची अट ठेवलीय, ती किमान ३० वर्षांपर्यंत असली पाहिजे. ग्राम बाल संरक्षण समित्यांच्या स्थापनेवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे, असंही सौंदरमल यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.