…आईच्या खुनाचं साक्षीदार असणं लहानग्या कल्पेशला घातक ठरलं !

…आईच्या खुनाचं साक्षीदार असणं लहानग्या कल्पेशला घातक ठरलं !

…आईच्या खुनाचं साक्षीदार असणं लहानग्या कल्पेशला घातक ठरलं !

संशयाने पछाडलेल्या संतोषने आपल्या पत्नीला कायमचं संपविण्याचं ठरवलं होतं. पूर्वनियोजित आखणीप्रमाणे, तो मोठ्या मुलाला मयुरेशला घेऊन बहिणीकडे राहायला गेला. रात्री अचानक तो बहिणीच्या घरातून बाहेर पडला. आपल्या घरी आला आणि मुलांच्या खेळण्याच्या लाकडी बॅटने फटक्याने व डोक्यात दगड घालून पत्नी संगीताला संपवलं. पाठोपाठ मधल्या मुलांचा खून केला. आपल्या आईच्या आणि भावाच्या खुनाचा अवघा सात वर्षांचा लहानगा कल्पेश साक्षीदार होता. संतोषने त्याच्याही डोक्यात बॅट घातली. बेशुद्धावस्थेत गेलेल्या मुलाला अत्यंत क्रूरपणे ड्रममध्ये पाण्यात बुडवून ठेवलं. बीडमधील तिहेरी हत्याकांडातील सत्य बाहेर आलं, तेव्हा पोलिसही हादरून गेले होते.

शहरातील शुक्रवार पेठ बीड भागात रविवारी उघडकीस आलेल्या भीषण तिहेरी हत्याकांडात संशयाने पछाडलेली माणसं किती क्रूर वागू शकतात, ते पुन्हा एकदा समोर आलं. आधीच बीडमधल्या पारधी हत्याकांडाची पार्श्वभूमी होती. त्यात नवी घटना पोलिसांसाठी डोकेदुखी होती. कुठल्या घटनेला कधी राजकीय रंग मिळून विस्फोट होईल, याची खात्री नसलेला सद्याचा सोशल नेटवर्किंगचा काळ ! पोलिस तणावाखाली होते. स्वत: बीड एसपी हर्ष पोद्दार घटनास्थळी पोहोचून मागोवा घेत होते आणि आरोपी शांतपणे मिसींगची तक्रार घेऊन पोलिस ठाण्यातच बसलेला होता.

मजुरी काम करणाऱ्या संतोष कोकणेचं संगीतासोबत लग्न होऊन १६ वर्ष उलटली होती. मयुरेश, सिद्धेश्वर आणि कल्पेश ही तीन मुलं. पण अलिकडे दोघांत सतत खटके उडत होते. संगीताच्या चारित्र्यावर संतोषला संशय होता. संतोषच्या सततच्या मानसिक छळामुळे काही दिवसांपूर्वी संगीता घर सोडूनही निघून गेली होती.दोन महिन्यांपासून त्यांच्यातले वाद वाढले होते. इतके की संतोषने पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला होता.

रात्री बहिणीकडे गेलेला संतोष पहाटे परतला. लगटलेलं दार ढकलून घरात शिरला, तेव्हा पत्नी व दोन मुलं गाढ झोपेत होते. संतोषने आधी संगीता व नंतर मधला मुलगा सिद्धेश्वर याचा खून केला. आपला बाप हे सगळं करत असताना लहानग्या कल्पेशने हे सगळं भेदरलेल्या नजरेने पाहिलं. तो पोलिसांना सांगेल, या भीतीपोटी संतोषने कल्पेशलाही ठार केलं.

त्यानंतर जणू काही घडलेच नाही, या आविर्भावात त्याने बहिणीच्या घरी जाऊन निवांत झोप काढली. सकाळी पेठ बीड पोलिस आत जाऊन त्याने पत्नी गायब झाल्याची तक्रार दिली अन् दुपारपर्यंत तो ठाण्यामध्ये बसून राहिला. पण तोवर एक महिला आणि दोन मुलांची हत्या झाली असल्याचा काॅल पोलिसांना आलेला होता. तो संतोषशी संबंधित असल्याचं कळल्यावर पोलिसांनी त्याचीच उलटतपासणी घेतली आणि पोलिसांची खात्री पटली की खून संतोषनेच केलेत.

“संगीताचा खून केल्यावर जागी झालेली दोन्ही मुलं शिवीगाळ करून लागली, म्हणून रागाच्या भरात त्यांना मारलं”, असं संतोष सांगत होता, पण पोलिसांचा त्याच्यावर विश्वास नाही. साक्षीदार नकोत म्हणूनच मुलांचा नाहक बळी गेला, असंच पोलिसांचं मत आहे.

पेठ बीड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विश्वास पाटील या घटनेचा तपास करत आहेत.

News by Jitendra Shirsath ( Beed )


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!