अज्ञानात सुख…!

आज बसस्टॉपवर स्वतः वरच भलतीच खुश असलेली एक बाई पाहिली. एकटीच बसली होती. वेडी असावी बहुतेक ! तिच्या जवळ जायला कुणीच तयार नव्हतं. काहीतरी बडबडत होती, हसत होती. मधेच कधीतरी समोरच्याला न्याहाळत होती. तिला काय वाटत होतं माहित नव्हतं. तिचा विनाकारण झालेला आनंद पाहता, मनात तिचा हेवा वाटत होता.

कपडे फाटके, मळके, न जाणो, किती दिवस ते धुतलेले नसतील. केसात जटा झालेल्या, अंगभर मळ. पण ती मात्र भलतीच खुश. कशाचा आनंद तिला झालेला होता? मधेच शीळ घालीत होती ; तर कधी, काहीतरी गुणगुणत होती.

अशी अवस्था असताना तिचं हे खुश असणं, याला कारण ती स्वतःच. बर्‍याच गोष्टींबाबत तीचं असलेलं अज्ञान. तिला वेड जरी लागलेलं असलं तरी, तिच्या विश्वात ती रममाण होऊन खूप खुश होती. तिला कसलंही भान नव्हतं.

आपल्यासारखी माणसं पहा, विनोद घडला तरी चेहरा चौकोनीच ठेवणारी, कायम गंभीर असणारी. नेमका आनंद कशात आहे हे कधीच लक्षात न घेणारी, जणूकाही सर्वच जबाबदारी आपल्यावर आहे अशा आविर्भावात असणारी माणसे खरोखरीच जीवन जगतात का हो?

अज्ञानातसुद्धा खूप सुख असतं. घरात साठवून ठेवलेले पैसे चोरी झाले तर खूप दुःख होईल पण ते आपल्याला समजलंच नाही तर? दुःख होणारच नाही. उलट ते सुरक्षित आहेत या आविर्भावातच आपण मस्त जगत राहू.

एखादा खुप मोठा आजार आपल्याला झाला आहे पण त्या आजाराचं नाव माहीत नसतानाही त्याचा इलाज सुरू ठेवला, डॉ. च्या आधाराच्या शब्दाखातर आपले शरीर औषधांना चांगला प्रतिसाद देऊ लागते. ही असते जादू अज्ञानातली.

बिल्डिंगचा वॉचमन कडा पहारा देतोय हा विश्वास आपल्यात निर्माण झालेला असतो म्हणून तर आपण घरात बिनधास्तपणे वावरतो, झोपतो. बर्‍याचदा तो गेट सोडून इतरही कामे करायला गेलेला असतो, कधी तोही बिनधास्त झोपा काढतो. तरीसुद्धा आपण तो गेटवरच आहे या भावनेने स्वतःला सुरक्षित समजतो. तो आहे या अज्ञानात आपल्याला सुख मिळते.

"वासरात लंगडी गाय शहाणी " अस म्हणतात. अर्थात कमी शहाण्या माणसांमध्ये जेव्हा एखादा थोडा शहाणा माणूस येतो तेव्हा त्याला आपण खूप हुशार असल्याचं जाणवतं, ते का माहीत आहे? कारण माझ्यापेक्षा आणखीनही कोणी हुशार आहे हे अज्ञान त्याला काही सुचू देत नाही. किंबहुना तो खूप आनंदी आणि उत्साही असतो की आपण यांच्यापेक्षा ही दोन पावलं पुढे आहोत.

एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी जर माहीत नसेल तर आपण त्याच्याशी बोलताना खूप अदबीने बोलतो, योग्य तो सन्मान देतो. कधी कधी हे उलटही होतं. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींशीही आपण खूप सहज सार्‍या गप्पा मारत बसतो.

प्रथेचे आपल्याकडे खूप स्तोम माजवले जाते. भीती तेव्हा वाटते, जेव्हा त्या माहित असताना आपण त्या पाळत नाहीत. पण ज्या प्रथा माहीतच नाही, त्यांच काय? वाटते का त्यांची भीती? मुळीच नाही.  जे माहित नाही ते मनोभावे आपण आपल्या श्रद्धेप्रमाणे करत राहतो. त्यातही समाधान मिळते. अर्थात अज्ञानात सुख मिळते.

कधीतरी वेडं होऊन जगण्यातसुद्धा खूप मौज असते. "आहे मजा जगण्यात या." अज्ञानात सुख आहे पण शोधेल त्यालाच.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षक आहेत.

gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!