फिल्मी दबंगगिरी पोलिसाला पडली महागात !

फिल्मी दबंगगिरी पोलिसाला पडली महागात !

फिल्मी दबंगगिरी पोलिसाला पडली महागात !

टिकटाॅकने जगाला काही सेकंदांचे डबिंग विडिओज बनवायचं वेड लावलं. भारतात टिकटाॅक बंद झालं तरी ते खूळ काही लोकांच्या डोक्यातून गेलं नाही. नवनवीन ॲप शोधत लोकांनी आपला शौक सुरूच ठेवला. हिरोगिरी करणाऱ्यांनी तर उच्छाद मांडला. कधी गाणं, कधी विनोद तर कधी फिल्मी डायलाॅगबाजी ! पण हा स्टंट एका महाराष्ट्र पोलिसाला महागात पडलाय. हातात रिव्हाॅल्वर घेऊन छछोरगिरी करणारा विडिओ या पोलिसाच्या निलंबनास कारणीभूत ठरलाय.

महेश मुरलीधरराव काळे त्याचं नाव. अमरावती ग्रामीणमधील चांदूरबाजार पोलिस ठाण्यातला शिपाई ! याचा एक विडिओ समाजमाध्यमात पसरलाय. एखाद्या सिनेनायकाने गुंडांसमोर डायलाॅगबाजी करावी, तशा आविर्भावात महेश काळेने विडिओत दबंगगिरी करण्याचा प्रयत्न केलाय.

अमरावती जिल्ह्यात पाय ठेवताना भाईगिरी, दादागिरी दहा किलोमीटर लांबच ठेवून यायचं भाऊ ! अमरावतीमध्ये जो कायद्यात राहणार, तोच फायद्यात राहणार ! कारण कस आहे ना…कायद्याचा बालेकिल्ला, म्हणजे अमरावती जिल्हा…असं म्हणत डोळ्यावर गाॅगर चढवलेला महेश काळे हातातलं रिव्हाॅल्वर उंचावताना दिसतो आणि मग ढॅणढॅण संगीताच्या पार्श्वभूमीवर त्याचं स्लो मोशन वाॅकिंग !

हा विडिओ अमरावतीकरांना आवडलाही असेल. त्यांनी तो स्थानिक अस्मितेपोटी डोक्यावर घेतलाही असेल. पण, ‘ सरदार खूस होगा, शाबासी देगा, ही महेश काळेची अपेक्षा मात्र फोल ठरली. विडिओतून इतरांना कायद्यात राहा म्हणून सांगण्यासाठी वापरलेला महेश काळेचा मार्ग पोलिसी नजरेतून बेशिस्त ठरलीय. अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी काळेला ताबडतोब निलंबित केलंय.

पोलीस शिपाई/२४१३ महेश मुरलीधरराव काळे, नेमणुक पोलीस स्टेशन चांदुर बाजार यांनी शासकीय गणवेषामध्ये हातात पिस्टलसारख्या शस्त्राचा वापर करुन व्हिडीओ तयार केला. तसंच सदरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. यातून आपण शासकीय गणवेषावर शस्त्राचा धाक दाखवल्याचे निश्पन्न होत आहे.. शासकीय गणवेषाचा आणि शस्त्राचा चुकीचा गैरउपयोग करून सोशल मिडीयावर व्हिडीओ प्रसिद्ध केला, असा आरोप काळेवर आहे.

आपल्या या कृत्यामुळे पोलीस दलाची जनमानसात बदनामी होऊन पोलीसांची प्रतिमा मलीन झाली आहे. आपल्या कृतीचा इतर पोलीस कर्मचारी व सामान्य नागरीक यांच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही. आपण आपल्या कर्तव्यामध्ये अत्यंत बेशिस्त, बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा केलेला असल्यामुळे आपणास मुंबई पोलीस (शिक्षा व अपिल ) नियम १९५६ मधील नियम ३(१)(अ-२) मधील तरतुदीनुसार व पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २५ (ख) नुसार आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पासुन निलंबीत करण्यांत येत आहे, असं हा आदेश म्हणतो.

डॉ. हरी बालाजी एन, पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण

महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वियेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने ) नियम १९८१ चे नियम ६८ नुसार निलंबनाचा आदेश अस्तिवात असे पर्यंत आपणास अर्धपगारी वेतनाइतका उदरनिर्वाह व त्यावर मिळणारे इतर वेतन भत्ते अनुज्ञेय राहतील. निलंबनाचा आदेश अस्तिवात असेपर्यंत आपणास कोणत्याही प्रकारचा खाजगी उद्योग अथवा नोकरी करता येणार नाही. त्याबाबतचे निलंबन कालावधीमध्ये प्रत्येक महिन्यात तसे प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करावे लागेल. जर या कालावधीत कोणत्याही प्रकारचा खाजगी उद्योग आणी नोकरी केल्याचे निदर्शनास आल्यास आपणा विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणुक) नियम १९७९ च्या अंतर्गत शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र राहाल, असंही काळेला बजावण्यात आलं आहे.

संबंधित विडिओ इथे पाहा :

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!