पोर्तुगीजांनी मुंबई प्रथम राणी लक्ष्मीबाईकडून घेतली !

पोर्तुगीजांनी मुंबई प्रथम राणी लक्ष्मीबाईकडून घेतली !

पोर्तुगीजांनी मुंबई प्रथम राणी लक्ष्मीबाईकडून घेतली !

भारतात राज्यांची प्रांतवार रचना सुरू असतानाच्या प्रक्रियेवेळी मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रस्तावही पुढे केला गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला कडाडून विरोध केला होता. १ मे १९५६ रोजी राज्यसभेतील अभ्यासपूर्ण भाषणाने आंबेडकरांनी केंद्राचा मनसुबा उधळून लावला होता. त्या भाषणाचाच हा अंश …


मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. असा निर्णय घेण्यासाठी, सरकारपाशी, अत्यंत प्रभावी व बिनतोड कारणे असतील, असे समजावयास हरकत नाही. मुंबई शहरावर हक्क सांगणारे काही तथाकथित हक्कदार पुढे सरसावले आहेत.

मराठी भाषिक म्हणतात, मुंबईचे मालक आम्ही; आणि गुजराथी भाषिक म्हणतात, मुंबईचे मालक आम्ही. गुजराथी मित्र, कोणत्या आधारावर आपला हक्क सांगत आहेत, हे नीटसे समजत नाही. कदाचित ते वहिवाटीच्या आधारावर हक्क सांगत असावे. गुजराथी मित्रांचे म्हणणे असे आहे की, महाराष्ट्रीयांच्या ताब्यात मुंबई शहर आम्ही जाऊ देणार नाही आणि हा तंटा चालू आहे.

श्री. मोरारजी देसाई यांनी मुंबई महाराष्ट्रीयांची असल्याचे मान्य केले आहे. गुजराथ महाप्रदेश काँग्रेसच्या बैठकीमध्ये श्री. मोरारजी देसाई यांनी केलेले भाषण मी वाचले आहे; आणि त्या भाषणात, मुंबई महाराष्ट्रीयांची असल्याचे विधान त्यांनी केले आहे. हे जर सत्य असेल तर मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करण्यात कोणती अडचण आहे?

ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात, भारतातील कोणताही नागरिक भारताच्या कोणत्याही भागामध्ये जाऊन राहात असे; आणि त्याकाळी स्थानिक लोकांचा त्यास आक्षेप नसे. त्यामुळे, निरनिराळ्या प्रकारचे लोक येऊन राहिले आहेत. निरनिराळ्या प्रांतातील निरनिराळ्या शहरात असे निरनिराळे लोक येऊन, पिढ्यान पिढ्या राहिले व त्यांनी आपले उद्योगधंदे सुरू केले; व हितसंबंध प्रस्थापित केले; परंतु, आता राज्यपुनर्रचनेच्या निमित्ताने चाललेल्या फेर वाटणीत, बिगर मद्रासी लोकांनी, मद्रास शहराचा समावेश तामिळनाडूमध्ये करण्यास विरोध केला आहे, असे दिसून येत नाही.

कलकत्ता शहर विविध लोकांचे आहे. मी जेव्हा मजूरमंत्री होतो त्यावेळी मला अनेक वेळा कलकत्त्यास जावे लागत असे. कलकत्ता शहरात राहाणारे लोक स्वतःला बंगाली समजत नाहीत. ते स्वतःला कलकत्तीय समजतात. याचा अर्थ हा की, कलकत्ता शहरातील लोक स्वतःला बंगाली लोकांपैकी मानत नाहीत. ही लोकसंख्या फारच मोठी आहे.

अशाप्रकारे कलकत्त्याचे लोक स्वतः स बंगाली समजत नसताही, काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी कलकत्याचा समावेश बंगालमध्ये करण्यास कधी आक्षेप घेतला नाही की, ‘कलकत्तावाल्या’ लोकांनी देखील कलकत्ता शहराचा समावेश बंगालमध्ये करण्यास कधी विरोध केलेला नाही. म्हणून माझे मा. मित्र श्री. पंत यांना माझा पहिला प्रश्न असा आहे की, जर मद्रास शहर तामिळ प्रांतात जाऊ शकते; कलकत्ता शहर बंगालमध्ये जाऊ शकते, तर मुंबई शहराचा समावेश महाराष्ट्र राज्यात करण्यास कोणता आक्षेप असू शकतो?

श्री. पंतांनी या मूलभूत प्रश्नाचे उत्तर देऊन, महाराष्ट्रीयांचे समाधान केले पाहिजे. मुंबई शहरात गुजराथी लोकसंख्या १५ टक्क्याहून अधिक असून, महाराष्ट्रीयांची संख्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी आहे, असे सांगितले जाते. महाराष्ट्रीयांचा मुंबई शहरावरील हक्क नाकारला जातो, त्याचे हे टक्केवारी लोकवस्तीचे कारण दिले जाते.

दुसऱ्या भाषिकांची वस्ती १५ टक्क्यापर्यंत असलेली दुसरी शहरे नाहीत असे नाही आणि मुंबई शहरात १५ टक्क्यावर गुजराथ्यांची लोकसंख्या आहे, ही गोष्ट काही जगाआगळी आहे, असे मानण्याचे कारण नाही. ही टक्केवारी जगावेगळी कशी मानता येईल?

भारतातील बहुतेक शहरे, मिश्र भाषिकांची आहेत, याची मी अनेक उदाहरणे देऊ शकतो. फक्त एक भाषिकाचीच वस्ती असलेले एकही शहर दाखविता येणार नाही. असे असले तरी जर, कलकत्त्यावर बंगाल्यांचा व मद्रासवर तामिळांचा हक्क पोहोचतो, तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क कां पोहचू शकत नाही, हे मला तरी समजू शकत नाही.

मुंबई महाराष्ट्राची कधीच नव्हती, असेही म्हणणारे काही हरीचे लाल आहेत. अशा लोकांच्या ज्ञानाकडे पाहिल्यानंतर मला कमालीचे आश्चर्य वाटते.

मुंबई शहराचे मूळचे लोक कोण? मुंबईचे मूळ लोक कोळी. मासे पकडणारे. हे कोळी लोक असे म्हणतात काय की ते महाराष्ट्रीयन नाहीत? कोळी लोकांकडे कोणीही जावे; आणि त्यांचे मत काय आहे, ते विचारावे.

मुंबई शहराबाबत, ज्या ज्या बऱ्याच स्त्री पुरुषांनी, महाराष्ट्रीयाविरुद्ध भरकटलेले विचार मांडलेले आहेत, त्यांना मुंबईच्या मूळ स्वरुपाबद्दलचे ज्ञान हवे असल्यास ती माहिती मी द्यावयास तयार आहे.

पोर्तुगीजांनीही मुंबई घेण्यापूर्वी मुंबई कशी होती? पोर्तुगीजांनी ती कशी घतली? कोणाकडून घेतली? पोर्तुगीजांनी मुंबई प्रथम राणी लक्ष्मीबाईकडून घेतली.

राणी लक्ष्मीबाई विधवा होती. परंतु मोठी वजनदार होती. सदर विधवा राणीपासून पोर्तुगीजांनी मुंबई भाडेपट्ट्याने घेतली; आणि तशीच लाटली. विधवा राणी लक्ष्मीबाई बिचारी काही करू शकली नाही. ब्रिटिश राजा, दुसरा चार्लस याच्या राणीस हुंडा म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली. हुंडा १० पौंडापेक्षा अधिक नव्हता. एवढ्या हुंड्यापायी देण्यात आलेली मुंबई केवढी तरी चिमुकली होती. कारण त्यावेळी मुंबईत फक्त कोळी लोकांचीच वस्ती होती.

पोर्तुगीजांनी मूळची मुंबई ब्रिटिशाकडे ज्या कागदपत्राद्वारे दिली. त्या कागदपत्राची छापील प्रत मजकडे आहे. तेव्हा ऐतिहासिक दृष्टीने, भौगोलिक दृष्टीने, अगर तार्किक दृष्टीने देखील महाराष्ट्रात मुंबईचा समावेश करण्याबाबत कोणास कसल्याही तऱ्हेचा वाद कसा घालता येईल हे मला तरी समजत नाही.

इतर महाराष्ट्रीय लोकांच्या व माझ्या मतात पुष्कळच भेद आहेत. इतर महाराष्ट्रीयांना मुंबई संयुक्त महाराष्ट्रात हवी आहे. मला हे समजत नाही की, महाराष्ट्रीयांना संयुक्त महाराष्ट्र का हवा? भविष्यात, उत्तर प्रदेशाशी, अगर राजस्थानशी, महाराष्ट्राला युद्ध खेळावयाचे आहे, असे नाही, याची मला खात्री आहे. मग संयुक्त महाराष्ट्र कां हवा?

मुंबई महाराष्ट्रीयांची आहे, या मुद्यावर मी त्यांच्याशी सहमत आहे. त्या मुद्यावर आम्ही असे लढू की, आकाशपाताळ एक करू. त्याबाबतीत कोणाच्याही मनात कसलीच शंका नको. म्हणून मी असे सुचवित आहे की, मुंबई ही महाराष्ट्रीयांची आहे हे मान्य करून मुंबई शहराला, शहर राज्याचा दर्जा देऊन, त्यास महाराष्ट्र शहर राज्य असे संबोधावे. त्यामुळे मुंबई शहर महाराष्ट्राचे आहे असे ठरेल, त्याचप्रमाणे मुंबई शहराचे राज्य बनेल. परंतु, सरकारने मुंबई शहराला अंदमान निकोबारच्या दर्जाला खाली फरफटत ओढले आहे.

सरकारची काय कारणे असतील ती सरकारलाच माहीत म्हणून मी सरकारला आताच स्पष्ट सांगू इच्छितो की, जर सरकार हाच निर्णय लादणार असेल तर आमची भूमिका बदलू व सर्व महाराष्ट्रीयाबरोबर एकजुटीने आम्ही लढू.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!