सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल अपेक्षित !

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल अपेक्षित !

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल अपेक्षित !

महाराष्ट्र राज्यांच्या आरोग्य विभागामध्ये तब्बल 16,000 पदे रिक्त आहेत. शिवाय वैदयकिय शिक्षण विभागातील 11,000 पदे रिक्त आहेत. (आरोग्यविभागातील 10000 पदांच्या महाभरतीची बातमी नुकतीच वाचनात आली त्याबद्दल शासनाचे अभिनंदन ) आरोग्य विभागात पुरेशा आणि सक्षम वैद्यकीय यंत्रणेचा अभाव दिसतो, त्याला अनेक कारणे आहेत.

वैदयकीय अधिकारी यांचा पगार आणि त्यांची वाढलेली जबाबदारी याचा ताळमेळ कुठंच बसत नाहीत. बहुतांश वैद्यकीय अधिकारी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम करीत असतात. रुग्णसेवा हा मूळ राष्ट्रीय कार्यक्रम सोडून लोकांचे बँक अकौंट, आधार कार्ड ,ऑनलाईन एन्ट्री इ. कामातच त्यांचा वेळ जातोय.

भाग तिसरा

आत्ताच्या कोरोना काळात ही परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. गावगुंड आणि राजकीय हस्तक्षेप ह्यांचा होणारा त्रास वेगळा. मग सरकारी आरोग्य सेवा देण्यासाठी नविन डॉक्टर्स कसे आकर्षित होतील ?

वैद्यकीय अधिकारांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपले तरच आरोग्य व्यवस्थेला लागलेले ग्रहण संपणार आहे. हे कोरोना काळात प्रकर्षाने जाणवत आहे.

दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे. लोकांचे लोंढेच्या लोंढे शहराच्या दिशेने जात आहेत. शहरीकरणाचा वेग वाढला आहे. तेव्हा म्हसवड या शहराचा नव्हेतर साऱ्याच शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात आम्ही मागे गेली कित्येक वर्षे सार्वजनिक आरोग्याला गांभीर्याने घेतले नाही, हे सत्य पुढे आले आहे.

1978 मध्ये कझाकस्तानमधील अलमट्टी शहरात झालेल्या महत्त्वपूर्ण जागतिक आरोग्य परिषदेमध्ये २००० सालापर्यंत सर्वासाठी आरोग्य सेवा हे ध्येय भारताबरोबर जगातील बहुतांश देशांच्या सरकारांनी मान्य केले होते. हे ध्येय गाठण्यासाठी प्राथमिक आरोग्य यावर विशेष भर देण्याचे तसेच यासाठी आवश्यक मनुष्यबळ, निधी उपलब्ध करुन द्यायचे ठरले होते. परंतु 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात नविन आर्थिक सुधारणांचे वारे वाहू लागले. ज्यामध्ये सरकारचा वाटा कमी करण्यात आला आणि खासगी क्षेत्राला अधिकचा वाटा देण्यात आला.. त्याचमुळे 2000 सालापर्यंत सर्वासाठी आरोग्यसेवा हे ध्येय बासनात गुंडाळून ठेवावे लागले.

केवळ सरकारतर्फे घोषित केलेल्या दारिद्ररेषेच्या खाली असणाऱ्या गरीबांनाच आरोग्याच्या कल्याणकारी सेवा मोफत दिल्या गेल्या; जेणेकरून दारिद्रयरेषेवरील लोक या सेवा खासगी क्षेत्राकडून विकत घेतील. यासारख्या तथाकथित सुधारणांमुळे एका बाजूला सार्वजनिक आरोग्यव्यवस्था प्रचंड कमजोर झाली तर दुसऱ्या बाजूला खासगी आरोग्य सेवा क्षेत्राचे मोकाट बाजारीकरण झाले.

आरोग्य सेवेचा खर्च हा सर्वसाधारण महागाईपेक्षा जाम वेगाने वाढला आणि आज ह्या कोरोनाच्या संकटकाळात सामान्य माणूस सरकारी रुग्णालयाची सेवामिळत नाही आणि खासगी रुग्णालये परवडत नाहीत ह्या कात्रीत सापडला.

चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी आणि खाजगी आरोग्यसेवेवर नियंत्रण आणण्यासाठी, सर्वजनिक आरोग्य सेवा ही बळकट आणि दर्जेदार करावी लागेल हे पण आम्हाला कोरानाने दिले आहे हे मान्य करावे लागेल.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सर्व दोष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. बांगलादेश, श्रीलंका या देशात आरोग्याचा खर्च हा आपल्यापेक्षा अधिक आहे. मग आपल्या देशात का नाही ? हा जाब सरकारला विचारण्याचे धाडस आता आपण दाखविले पाहिजे.

सर्वांसाठी आरोग्यसेवा देण्याचे ध्येय जर गाठायचे असेल तर जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार देशाच्या जीडीपीच्या किमान 5% रक्कम ही सार्वजनिक आरोग्यावर खर्च केली पाहिजे.

कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची कमजोर बाजू पुढे आलेली असताना, पुन्हा ही वेळ आपल्यावर येवू नये म्हणून केंद्रसरकाला आणि राज्य सरकारला अनेक दुरुस्त्या कराव्या लागतील.

हा प्रश्न फक्त म्हसवड या माझ्या शहराचा नाही . म्हसवड हे प्रातिनिधिक शहर घेतले आहे. या साऱ्या समस्यांना तुम्हीही तोंड देत असाल ! कोरोना काळात म्हसवड हे ‘क” वर्ग नगरपालिकेतील शहर जर सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी आत्मनिर्भर नसेल तर प्रत्येक शहर / गाव /खेडे यांची अवस्था कमीजास्त प्रमाणात अशीच असेल.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांचे आकडे बघता आणि त्यांची होणारी परवड बघता सरकारी आरोग्य यंत्रणेला वाऱ्यावर सोडून द्यायचे आणि खासगी क्षेत्राला वाव दयायचा यापुढे महाराष्ट्राला तरी परवडणार नाही. यासाठी पुरोगामी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार नक्कीच ठोस भूमिका घेईल.

कोरोनाच्या या कठीण काळात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब ज्यापद्धतीने कोरोनाविरुध्दची लढाई लढत आहेत, धोरणे राबवित आहेत. ते पाहता येणाऱ्या काळात सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत नक्कीच सकारात्मक बदल दिसतील याची खात्री बाळगायला वाव आहे.

नाहीतर मग संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तशी आमची अवस्था होईल

” आपुलीया बुबुळा |
दृष्टी असोनी अखम डोळा
तैसा आत्मज्ञानी दुबळा |

 

 

 

( समाप्त )

 

 

 

 

प्रा. कविता म्हेत्रे

M.sc, M.ed MA ( marathi ), Mj
म्हसवड नगरपालिकेतील माजी सदस्या
सामाजिक-राजकीय अभ्यासक/विश्लेषक/वक्ता

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!