NEET साठी योग्य रोडमॅप हवा !

NEET साठी योग्य रोडमॅप हवा !

NEET साठी योग्य रोडमॅप हवा !

२०१३ पासून NEET परिक्षेचा प्रवास पाहिजे तितका सुकर झाला नाही. २०१८-२०१९ पर्यंत कशीतरी NEET परिक्षा रुळावर येत असतांना कोरोनाच्या संकटात पुन्हा एकदा रुतून बसलीय.१३ सप्टेंबर २०२० पर्यंत म्हणजेच प्रस्तावित तारखेच्या (3 मे 2020) पासून ही परिक्षा तब्बल १२७ दिवस लांबणीवर टाकावी लागली.

परीक्षा पुढे ढकलणे साहाजिक होते ; कारण राष्ट्रीय स्तरावर कोणतीही यंत्रणा एवढी सक्षम नाही की ही परिक्षा ऑनलाईन मोडमध्ये घेतली जाईल.

आपण २०२० च्या परीक्षेसाठी आवेदन भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केल्यास तब्बल १७ लाख विद्यार्थी या परीक्षेस सामोरे गेले. महाराष्ट्रात हा आकडा २.५ लाखाच्या घरात होता. या विश्लेषणावरून विचार केल्यास भारतात सर्वाधिक विद्यार्थी या परिक्षेस सामोरे जातात.

आता जाहीर झालेल्या १ ऑगस्ट २०२१ या तारखेचा विचार केल्यास येऊ घातलेली NEET ही परिक्षा विद्यार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण करते आहे. सदर परीक्षेची तारीख ही नियोजित वेळेच्या खूप पुढे ढकललेली आहे.

दरवर्षी साधारणपणे १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरच्या कालावधीत परिक्षेसाठी आवेदन पत्रं मागवली जातात. त्यानंतर जानेवारी १५ ते ३१ जानेवारी भरलेले अर्ज दुरस्तीसाठी उपलब्ध करून दिले जायचे. साधारणपणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश पत्र उपलब्ध करुन दिले जायचे आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील रविवारी ही परिक्षा देशभरात आयोजित केली जायची. हाच नियोजित कार्यक्रम NEET साठी २०१३ पासून आखलेला होता.

 

 

 

 

 

 

आवेदन पत्र सादर करण्याच्या तारखेपासून साधारणतः सहा महिन्याच्या कालावधीत ही परिक्षा पार पडते. हा अलिखित नियम पूर्वी CBSE आणि आता नॕशनल टेस्टिंग एजंसी अर्थात NTA नी अंमलात आणला. याच नियमांत २०१९ पर्यंत कोणताही खंड पडला नाही. मात्र कोरोनामुळे २०२० ला हे नियोजन पूर्णपणे ढासळले.

२०२१ मध्ये होणारी परिक्षा १ ऑगस्ट रोजी होणार असेल तर आज रोजी पासून साधारणपणे २ महिन्यांचा कालावधी आवेदन पत्र भरुन घेण्यापासून ते परिक्षा पार पाडण्यासाठी NTA कडे आहे.

परंतु, येथे बारावीच्या परिक्षेबाबतच मोठा संभ्रम आहे. दहावीच्या परिक्षा जवळजवळ रद्दच झाल्या आहेत. बारावीच्या परिक्षेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सर्व राज्याचे शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव यांच्या समवेत एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यात परिक्षा घेतली जावी असा प्रस्ताव मांडण्यात आला खरा, पण महाराष्ट्र आणि दिल्लीच्या शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण पार पाडून परिक्षा घ्यावी असा सल्ला दिलाय.

 

 

 

 

 

 

आधीच लसीचा तुटवडा असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण पार पाडून परिक्षेच्या तारखा कधी जाहीर करायच्या हाही मोठा प्रश्न आहे. १० वी १२ वीच्या परीक्षा त्या त्या राज्यातील परिस्थितीनुसार राज्यपातळीवर घेतल्या जाऊ शकतात ; पण NEET बाबतीत असे करणे शक्य नाही ; कारण ही परीक्षा घेतली तर संपूर्ण देशभरातच एकाच वेळी घ्यावी लागेल. त्यासाठी देशपातळीवर मोठ्या नियोजनाची गरज आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेने सध्या देशभरात धुमाकूळ घातला आहे. तिसऱ्या लाटेचाही इशारा तज्ञांनी दिलाय, ज्यात सर्वाधिक धोका लहान मुलांना तसेच २० वर्षाखालील मुलांना होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यात ही परीक्षा घेतलीच आणि कोरोनामुळे एखादा विद्यार्थी या परिक्षेस मुकला तर, त्या बाबतीत शासन काय निर्णय घेणार हे ही तितकेच महत्वाचे आहे.

एखाद्या विद्यार्थ्याला कोरोना होऊन गेलेला असला तरी आता बुरशीजन्य संसर्गाची लाट आहे. ब्लैक फंगस आणि व्हाईट फंगसने डोके वर काढले आहे ; त्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या नियोजनाची गरज आहे आणि हे सगळे धोके लक्षात घेऊन व्यवस्थापन आणि नियोजन करण्यासाठी NTA कडे केवळ दोन महिन्याचा कालावधी आहे.

 

 

 

 

 

 

अजून परीक्षेचे फॉर्म उपलब्ध झालेले नाहीत. गेल्या महिन्याभरात NTA कडून परिक्षेबाबत कोणत्याही निर्णयाची अधिकृत घोषणा नाही. आधीच JEE चार वेळा घोषित करुन मध्येच रद्द करावी लागली. त्याचा पसाराही NTA ला आवरावा लागणार आहे आणि NEET चे नियोजन करावे लागणार आहे.

NEET परिक्षा रद्द करण्याची दूर दूर पर्यंत शक्यता नाही. कारण ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि प्रतिष्ठेचीही आहे. जर ही परिक्षा रद्द केली तर देशाच्या शिक्षण मंत्रालयावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. त्यामुळे ही परिक्षा सरकारला घ्यावीच लागेल, पण त्यासाठी योग्य रोडमॕपची आवश्यकता आहे ; कारण परीक्षा महत्वाची आहेच, त्यापेक्षा विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा आणि कर्मचारी वर्गाचा जीवही तितकाच महत्वाचा आहे.

 

 

 

 

 

 

                      गजानन गोराडे

(औरंगाबाद)

NEET परिक्षा तसेच वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेचे मार्गदर्शक तथा नीट मंत्राचे संचालक | ९५६१९५८०६१

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!