भारतातला प्रस्तावित एपल प्रकल्प वेंटिलेटरवर !

भारतातला प्रस्तावित एपल प्रकल्प वेंटिलेटरवर !

भारतातला प्रस्तावित एपल प्रकल्प वेंटिलेटरवर !

आज भारताला अमेरिकेकडून वेंटिलेटर्सचं दान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जाहीर झालं.‌ अमेरिका भारताला आता करोना विरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर्स पाठवणार आहे.  ही बातमी कळताच पुन्हा एकदा सोशल मिडिया आणि भारतीय इलेक्ट्रोनिक्स मिडिया मध्ये मोदी आणि ट्रम्पच्या मैत्रीच्या कथा रंगू लागल्या. हाऊडी मोदी आणि नमस्ते ट्रम्पच्या कार्यक्रमाच्या जुन्या क्लिप्स सोशल मिडियावर पुन्हा येऊ लागल्या. दोन नेत्यांमधील मैत्री कशी असावी ह्याबद्दलचे ट्विटस् झळकू लागले. ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटला माननिय मोदीनी रिट्विट करुन अमेरिकेचे आभारही मानले. दोन संकुचित राष्ट्रवादी नेते जेव्हा उदार होऊन एकमेकांना मदत करतात, तेव्हा घडणाऱ्या घटना ह्या वरवर दिसतात तेवढ्या साध्या नसतात. ह्यात एकतर व्यापार दडलेला असतो, नाहीतर आत्मस्तुती !

त्यामुळे घडणाऱ्या घटनेच्या मागची बाजू तपासून पाहणं गरजेच असतं. मदत मिळाली म्हणून आनंद साजरा करणाऱ्या लोकांनी काल घडलेल्या एका घटनेकडे डोळसपणे पहावं तेव्हा त्यांना कळेल की अमेरिका नावाच्या फक्त व्यापारावर सबंध बनवणाऱ्या देशांने भारतीयांच्या डोळ्यात वेंटिलेटर्सची धुळ झोकून भारताच काय नुकसान केलंय !

काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप फॉक्स बिझनेस न्यूजशी बोलताना इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्रातील नामांकित कंपनी एपलला चक्क धमकी देत होते. ह्या धमकीला भारताचा संदर्भ आहे.

न्यूयार्क पोस्टच्या एका बातमीनुसार, एपल कंपनी करोना महामारीच्या फटक्यामुळे चीनची तुटलेली उत्पादन साखळी पाहता, आपल्या उत्पादनातला जवळपास १/५ हिस्सा हा भारतात हलवण्याच्या विचारात होती.

हा १/५ हिस्सा म्हणजे थोडाथोडका नव्हे येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात एपल कंपनी ४० बिलीयनच्या विक्रीच उद्दिष्टे निश्चित करुन आहे आणि वर्तमानाचा विचार केला तर भारतात दरवर्षी एपलचा भारताशी व्यवहार हा १.५ बिलियनचा आहे. त्यापैकी फक्त ५०० मिलीयनच उत्पादन भारतात व्हायचं. जर एपलनी व्यापार चीन मधून कमी करुन भारतात हलवला तर निश्चितच त्याचा मोठा फायदा भारताला होणार होता; कारण हा व्यवहार ७ अब्ज डॉलर ते ९ अब्ज डॉलरच्या घरात जातो त्यादृष्टीने प्राथमिक हालचालीही चालू झाल्या होत्या आणि एपलनी जास्तित जास्त उत्पादन भारतात करावं ही भारताची इच्छाही लपून राहिलेली नव्हती.

डिसेंबर २०१९ मध्येच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एपल, सॕमसंग, लावाच्या वरिष्ठ पदाधिका-यांची भेट घेऊन कंपन्याचं उत्पादन भारतात व्हावं, ह्यावर चर्चा केली आणि ती चर्चा बऱ्यापैकी सकारात्मकही ठरली, कारण मार्च २०२० मध्ये भारत सरकारने मोबाईल फोन निर्मितीला चालना देण्यासाठी ४८००० कोटीच्या तीन योजना जाहिर केल्या.

ह्या सर्व घडामोडीवर अमेरिका अगदी बारकाईने लक्ष ठेऊन होती. भारतातल्या वृत्तपत्रात झळकणाऱ्या बातम्यांवरही लक्ष होतं. अशाच इकाॅनाॅमिक्स टाईम्सच्या लेखाचा दाखला देत ट्रम्प यांना एपलच्या भारतात उत्पादन करण्याच्या बातमीवरुन प्रश्न विचारला गेला होता, तेव्हा ट्रम्प यांनी चक्क एपलला धमकीच दिली.

ते म्हणाले,

एपल भारतात उत्पादन करण्याचा विचार करत असेल तर आम्हाला एपलचा विचार करावा लागेल, एपलच्या करासंबंधी नवे धोरण ठरवावे लागतील, गरज पडलीच तर एपलच्या सीमा अमेरिकेसाठी बंदही कराव्या लागतील.

एपलची कंपनीचं चीनमध्ये असणे हे अमेरिकेला तितकं धोकादायक नाही वाटलं, पण आपल्या मित्राच्या देशात १/५ हिस्सा हलवणार तेव्हा मात्र ट्रम्पची पोटदुखी सुरु झाली. इथे जर ट्रम्प खरंच भारताचे इतके चांगले मित्र असते तर त्यांनी मोठ्या दिलाने भारतातील एपलच्या आगमनाचं स्वागत केलं असतं; पण असं काहीही झालेलं नाही, उलट त्यांनी भारतीय व्यापाराच्या नाड्याही आपल्याच हातात ठेवण्याचा मनसुबा रचला आणि इतकी साधी गोष्ट भारतीय पंतप्रधानाच्या लक्षात येऊ नये? तेही आत्मस्तुतीत मग्न असावेत?

बरं आपला मित्र ट्रम्प आपल्यावरच उलटण्याची इतक्यातलीच ही दुसरी वेळ आहे. नमस्ते ट्रम्पसाठी १०० कोटी खर्च करून, आपल्याच एका राज्यात तथाकथित विकासाची भिंत बांधूनही अवघ्या काही दिवसात करोनाचा हाहाकार सुरू झाल्यानंतर भारताने हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीन औषधाचा अमेरिकेला पुरवठा करावा असा सज्जड दम त्यांनी भरला आणि त्यांच्या भारतीय मित्राला भारतात तुटवडा असूनही औषधांवरची बंदी उठवावी लागली. आणि त्यानंतर ट्रम्प यांच्या धन्यवादाच्या ट्विटवरही असाच हर्षवायू इथल्या मिडियाला झालेला होता.

व्हाईट हाऊसनेही जोपर्यंत औषधाचा पुरवठा होत नाही तो पर्यंत आपल्या पंतप्रधानांना ट्विटरवर फॉलो करायला सुरुवात केली आणि मोदी समर्थकांना त्यावेळी इतका आनंद झाला की मोदी म्हणजेच जागतिक नेता ! ट्विटरवर फॉलो करणे हा मोदीचा विजय होता आणि अनफॉलो केल्यानंतर ती हार मात्र ‘भारताची’ होती?

ह्या वेंटिलेटर्स मदतीआड एपल भारतात येऊच नये, म्हणून केलेले प्रयत्न झाकण्याचा अमेरिकेचा खेळ मात्र पूर्णतः यशस्वी झाला कारण आपल्या पंतप्रधानांनी अमेरिकेचे आभार मानले म्हणजे आपण परत एकदा तोंडावर पडलोय !

दोन प्रखर राष्ट्रवादी नेते जेव्हा अशी उदारता दाखवातात त्या आड बरच काही शिजत असतं. अमेरिकेत करोनाचा हाहाकार भारतापेक्षा अधिक आहे. मूळात अमेरिकेतच वेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा आहे आणि न्यूयार्कच्या महापौर बिल द ब्लासी यांनी ती कमतरता जाहिर बोलूनही दाखवली होती. आपल्याच देशात वेंटिलेटर्सची कमतरता असताना भारताला वेंटिलेटर्सची मदत करण्यामागची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे.

हे म्हणजे अगदी तसंच आहे. भारतात हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीनची कमतरता असतानाही आपण त्यांना मदत केली होती. ह्यात दोन्ही देशातील नेत्यांना फक्त आत्मस्तुती मिरवायची आहे, अन्यथा दोन्ही नेते कथित राष्ट्रवादी आहेत. येणाऱ्या काळात वेंटिलेटर्सच्या आड भारताचा व्यापार गुदमरून मरणार आहे हे निश्चित आणि श्वास घेणार आहे फक्त मोदींची स्तुती आणि ह्याचा फटका बसणार आहे संपूर्ण भारत देशाला.


– अंकुश हंबर्डे पाटील

लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे नांदेड जिल्हा समन्वयक आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!